सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

नेमके व शास्त्रीय उपचार !


आजार जितका जास्त गंभीर ..जीवघेणा ..तितकेच त्याचे उपचार अधिक अधिक गुंतागुंतीचे असतात ..व्यसनाधीनता या आजाराचे अनेक पैलू असे आहेत ज्यामुळे हा आजारच गुंतागुंतीचा बनलाय...सर्व उपचारांना पुरून उरलेले अनेक व्यसनी मला ठावूक आहेत ..आपला जन्मच जणू व्यसने करण्यासाठी झालाय आणि त्यातच संपायचे असे ठरवल्या सारखे ते वर्तन करतात व शेवटी मृत्यू पत्करतात .. व्यसनमुक्ती साध्य करणे त्यांना शक्य होत नाही ..अर्थात हे प्रमाण जरी लक्षणीय असले तरी सुधारणाऱ्या व्यसनींची संख्या देखील मोठी आहे ..आणि याच आशेने जगभर व्यसनी व्यक्तींना शरीरिक व मानसिक अश्या दोन्ही प्रकारचे उपचार देण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे कार्यरत आहेत ..जेथे निवासी उपचारांचे आयोजन केले जाते ..व्यसनी व्यक्तीला काही दिवस तेथे रहावे लागते .. त्याची शारीरिक व मानसिक गुलामी काढून टाकण्यासाठी विविध उपचार त्याला दिले जातात .. त्याच प्रमाणे व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर ..बाहरेच्या जगात व्यसनमुक्त कसे रहाता येईल याचे प्रशिक्षण देण्यात येते .. व्यसनमुक्ती केंद्राची कार्यपद्धती नेमकी कशी असते हे नीट समजून घेतले तर नक्कीच व्यसनी व त्याचे नातलग व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेवून समर्थपणे या आजाराचा सामना करू शकतील 


व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी दाखल होणे ही फार कठीण प्रक्रिया नाही ..परंतु व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होण्यासाठी व्यसनी व्यक्तीला तयार करणे ..पालकांची तशी मानसिकता बनणे..हे कदाचित कठीण ठरू शकते ..व्यसनमुक्ती केंद्राबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत ..त्यातील प्रमुख गैरसमज असा की अगदी टोकाचे नुकसान झाल्यावरच व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे ..अनेक पालक आमच्याकडे व्यसनी व्यक्तीला दाखल करताना ..तो तसा फार घेत नाही अशीच बोलण्याची सुरवात करतात ...खरे तर जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत पालक पोचतात तेव्हाच आम्हाला खात्री असते की आता प्रमाण जास्त होतेय ..कुटुंबियांना त्रास होण्याचे ..नुकसान होण्याचे प्रमाण वाढलेय ...कारण त्या खेरीज पालक व्यसनमुक्ती केंद्रात येतच नाहीत ..दुसरा गैरसमज असा की व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या व्यक्तीला मारहाण करतात ..बांधून ठेवतात ..वगैरे ..या बाबतीत देखील मी स्पष्ट करू इच्छितो की बांधून ठेवणे ..मारहाण करणे हे काही व्यसनमुक्ती केंद्रातील उपचार नव्हेत ..अगदी तुरळक केसेस मध्ये जेथे व्यसनी व्यक्तीचे व्यसन न मिळाल्यामुळे वर्तन बेफाम होते ..त्याच्या वर्तनामुळे त्याच्या आणि इतरांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो ..अशा केसेस मध्ये काही काळ सुरक्षिततेच्या कारणामुळे व्यसनी व्यक्तीला बांधून ठेवावे लागते ..मात्र मारहाण अजिबात होत नाही ...ज्या व्यसनमुक्ती केंद्रात वारंवार बांधावे लागते किवा मारहाण होते ..अशी व्यसनमुक्ती केंद्रे असतील तर ती नक्कीच शास्त्रीय उपचार देत नाहीयेत असे मी खात्रीने सांगू शकतो ...वरील प्रमुख गैरसमज अनेकदा उपचारांच्या आड येतात .

व्यसनमुक्ती केंद्रे बहुधा सामाजिक संस्था चालवीत असतात ..केंद्र शासनाचे किवा राज्य शासनाचे एखादे अनुदान देखील अशा सामाजिक संस्थाना मिळू शकते .. म्हणून कदाचित या क्षेत्रात देखील केवळ अनुदान मिळवण्याच्या हेतूने काही स्वार्थी किवा लबाड लोक शिरले असावेत ..जगात सर्वत्रच शिक्षण ..अध्यात्म ..व इतर अनेक सामाजिक क्षेत्रात असे लबाड लोक शिरले आहेत जे केवळ पैसा मिळविणे हा एकमात्र हेतू मनी बाळगून लोकांच्या व सरकारच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत असतात ...अशा सामाजिक अथवा शैक्षणिक संस्थावर नियंत्रण ठेवण्याची जवाबदारी असलेले सरकारी अधिकारीही या लाबडीत सामील असतात म्हणूनच हे होऊ शकते ..अशा लोकांना व्यसनाधीनता हा एक गंभीर मनो - शारीरिक आजार आहे हे देखील ठावूक नसते ..ते फक्त अनुदान मिळविण्यासाठीच कार्य करतात ..त्यांना व्यसनी व्यक्तींना उपचार देण्यात काही स्वारस्य नसते ... केवळ व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनीला भरती करून घेणे ..त्याला जेवण ..चहा ..नाश्ता ..मनोरंजन या सुविधा पुरविणे इतकेच काम त्यांना समजते ..माझ्या माहितीत अशी अनेक केंद्रे आहेत जेथे केवळ अनुदान मिळविणे हाच प्रमुख हेतू असतो ..या प्रकारच्या व्यसनमुक्ती केंद्रात योग्य उपचार मिळत नाहीत ..

( योग्य मानसिक उपचार देणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रांच्या कार्यपद्धतीबद्दल पुढील भागात वाचा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा