रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

शक्तिमान आजार !


या आजाराचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे हा आजार अतिशय शक्तिमान मानला जातो ..व्यसनी व्यक्तीच्याच सर्व प्रकारच्या शक्तींचा वापर करून हा आजार त्यालाच नेस्तनाबूत करण्याचे काम करतो ..व्यसन बिनदिक्कत करता यावे म्हणून व्यसनी व्यक्ती निकराने लढतो .. आपल्या व्यसनाच्या आड येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली शत्रू आहे आहे असे त्याला प्रामाणिकपणे वाटत असते..अशा काल्पनिक शत्रूंचा बिमोड करण्यासाठी तो झुंजत राहतो ..स्वतच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचे काम तो अतिशय बुद्धीमत्तेने ..चातुर्याने आणि कौशल्याने करतो ..स्वतःचेच नुकसान करून घेतो ..मात्र ते कबुल न करता ..झालेल्या नुकसानाला इतरांना जवाबदार ठरवतो ..कुटुंबीय उगाच कटकट करतात ..माझ्यावर लोक जळतात ..माझे सुख यांना पाहवत नाही वगैरे अविवेकी विचार त्याच्या मनात घर करून असतात .' मी व्यसनाचा गुलाम झालोय ' ही गोष्ट ते प्राणांतिकपणे नाकारतात .किवा जर मान्य केलेच तर उपचार घेणे टाळतात .. अनेक समर्थने अनेक करणे उपचाराच्या आड उभी करतात . स्वतचा घेतलेल्या किवा इतरानी घातलेल्या शपथा ..वचने... ते बेमालूमपणे मोडतात..काही वेळा व्यसनामुळे होत असणा-या त्रासामुळे ते एखाद्या फिजिशियन कडे अथवा मानसोपचार तज्ञाकडे स्वतःहून जातात देखील ..मात्र तेथे नेमके किती व्यसन करतो ते काही खरे सांगत नाहीत ..अथवा डॉक्टरनी सांगितलेली औषधे नीट घेत नाहीत ..आणि सर्वात प्रमुख पथ्य म्हणजे दारू न पिणे किवा व्यसन न करणे हे अजिबात पाळत नाहीत ... औषधे आणि व्यसने दोन्हीही सुरु राहतात . या आजाराच्या शक्तिमान पणाची काही उदाहरणे खाली देत आहे .

१) जेथे जेथे त्यांना उपचारांसाठी दाखल केले जाते ...तेथे तेथे चोरून लपून व्यसन करण्याची त्यांची मनापासून इच्छा असते .. 

२) बहुधा व्यसनी व्यक्ती व्यसनमुक्ती उपचार घेण्यास सहजासहजी तयार होत नाही ..मात्र फक्त दोन तीन दिवस एखाद्या खाजगी इस्पितळात दाखल होण्यास तयार होतो ..याचे कारण तेथून त्याला बाहेर पडणे सोपे असते ..किवा व्यसनामुळे खूप शारीरिक त्रास असूनही खाजगी इस्पितळात तो गुपचूप दारू पितो ..भेटायला येणाऱ्या मित्रांकडून दारू मागवतो ..किवा जवळ पैसे असतील तर वार्डाबॉयला लाच देवून आपला कार्यभाग पूर्ण करतो ..कोणाला समजू नये म्हणून शहाळ्यात ( नारळाचे पाणी )दारू टाकून मित्रांनी आणून दिल्याची उदाहरणे मला माहित आहेत 

३) हॉस्पिटल मधून पळून जाणे ..व्यसनमुक्ती केंद्रातून पळून जाणे .. घरात जरी कोंडून ठवले तर दारे खिडक्या तोडून पळून जाणे ..असे व्यसनीच्या बाबतीत घडू शकते .

४) व्यसनमुक्ती केंद्रात स्वतःहून किवा दबाव टाकून दाखल केल्यावर व्यसनी तेथून बाहेर पडण्याचे निकराचे प्रयत्न करतो .. त्यात कुटुंबीय भेटायला आल्यावर त्यांना खूप तक्रारी सांगणे .. येथून लवकर बाहेर काढा नाहीतर बाहेर पडल्यावर जास्त व्यसन करीन अशा धमक्या देणे ..पत्नीला घटस्फोटाच्या धमक्या देणे ..आणि कसेही करून उपचार अपूर्ण सोडल्याची किवा समुपदेशक सांगतील त्याप्रमाणे न वागता डिस्चार्ज घेल्याची अनेक उदाहरणे मला माहित आहेत .

( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा