मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१३

गोंधळात टाकणारा आजार !

मागील भागात आपण व्यसनाधीनता या मनोशारीरिक आजाराची व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेत बदल करणारी धूर्त व कावेबाज पणाची वैशिष्ट्ये पहिली ..त्याच प्रमाणे हा आजार व्यसनी व्यक्ती व त्याचे नातलग यांच्यात एक गोंधळाची विचारसरणी निर्माण करतो ज्या मुळे उपचार व सुधारणा याबाबत त्यांचा नेहमी गोंधळ उडतो ..तो पुढील प्रमाणे !



गोंधळा निर्माण करणारा आजार !



१) दारू अथवा मादक पदार्थांचा व्यसनी म्हंटल्यावर आपल्या सर्वांच्या मनात जी प्रतिमा उभी राहते ती काहीशी अशी असते ..विस्कळीत कपडे .. वाढलेली दाढी ....खंगलेले शरीर .. नोकरी व्यवसाय गेलेला .. उधार पैसे ..कर्जे मागणारा .. घरातून हाकलला गेलेला .. पत्नी मुलांना वाऱ्यावर सोडलेला असा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ... मात्र ही प्रतिमा व्यसनाधीनता या आजाराच्या अंतिम अवस्थेची असते .. प्रत्येक व्यसनी बहुधा स्वतची तुलना अशा प्रतीमेसोबत करून माझी काही तशी अवस्था झालेली नाही .. म्हणजे मी काही व्यसनी झालेलो नाही असे म्हणतो ..नातलगांचा देखील तो तसाच समज करून देतो ... अर्थात तो नकळत त्या प्रतिमेच्या अवस्थेकडे वाटचाल करीत राहतो .

२) इतकी वर्षे चांगला वागणारा ....सर्व गोष्टीत हुशार असणारा ..गुणी असा आपला नातलग असा एकदम काही महिन्यात किवा काही वर्षात व्यसनाच्या आहारी गेलेला पाहून ..तो व्यसनी झालेला आहे व त्याला योग्य असे शास्त्रीय उपचार द्यावे लागतील हे त्याच्या जवळच्या नातलगांना पटणे कठीण असते .. त्यांना वाटते .. याच्या वर काहीतरी करणी झालीय ..कोणीतरी काही तरी खावू घातलेय ..बाहेरचे काहीतरी झालेय ..त्याला एखादे खूप मोठे दुखः झालेय ..किवा ग्रह ..तारे खराब आहेत ..शनी लागलाय मागे ..वगैरे अविवेकी विचार त्यांच्या मनात घर करून राहतात मग पत्रिका ...जोतिषी.. ग्रहांच्या अंगठ्या .. अंगारे धुपारे सुरु होतात .. तर काही ठिकाणी व्यसनी व्यक्तीच्या मनासारखे आपण वागले तर तो बदलेल अशी आशा नातलगाना असते .. म्हणून तो म्हणेल त्या वस्तू त्याला घेवून देणे ..त्याला हवा तो व्यवसाय काढून देणे .. त्याचे लग्न करणे ..घराच्या वाटण्या करून त्याला संपत्तीचा त्याचा हिस्सा देणे ..वगैरे त्याच्या व्यसनाला खतपाणी घालणारे प्रकार केले जातात .

३) व्यसनी व्यक्तीच्या बिघडण्याला घरातील कोणीतरी कारणीभूत आहे ..किवा त्याचे मित्र जवाबदार आहेत ..असे वाटून घरात व्यसनी व्यक्तीच्या बिघडण्यावरून एकमेकात भांडणे होऊ शकतात .. एकमेकात भांडणे ..अबोला व इतर समस्यांमुळे ..घरातील एकोपा संपतो ... पत्नी आणि व्यसनीचे पालक यांच्यात दुरावा निर्माण होतो ... व्यसनीची भावंडे व पालक त्याच्या व्यसनाला पत्नीला किवा पत्नी नवर्याच्या व्यसनाला पालकांना जवाबदार ठरवते..स्वाभाविक व्यसनी व्यक्तीकडे दुर्लक्ष होते ..किवा त्याला व्यसन करायला आणखीन एक नवीन कारण मिळते .

४ ) मी पूर्वी थोडा पीत होतो ...आता माझे पिणे वाढलेय याला कारण व्यसनी व्यक्ती बाहेरच्या परिस्थितीत शोधतो .. किवा पूर्वी मी अनेक वेळा व्यसन बंद केलेय ..म्हणजे मी व्यसनाच्या गुलाम नाही .. कधी कधी जास्त होते इतकेच ..असा विचार करून व्यसनी उपचार घेण्याचे नाकारतो .. आपण आपल्या इच्छाशक्तीवर व्यसन कधीही सोडू शकतो असा खोटा आत्मविश्वास विचारात निर्माण होतो ..मात्र व्यसनामुळे आपल्या इच्छाशक्ती वरच हल्ला केलाय .. विशिष्ट बाबतीत आपली इच्छा शक्ती मदत करू शकणार नाही हे त्यला पटणे कठीण होते .

५) काही जास्त जिद्दी किवा हट्टी लोकांना व्यसनमुक्ती केंद्रात एकापेक्षा जास्त वेळा उपचार घ्यावे लागतात ..अशा वेळी केवळ एकदाच उपचार देवून ..मग त्याचा काही फायदा झाला नाही ..तेव्हा उपचार देणे व्यर्थ आहे ..उगाच पैसा जातो..असा अव्यवहारी विचार पालक करतात .. त्यांच्या हे लक्षात येत नाही की पुन्हा उपचार दिले नाहीत तर हा व्यक्ती असाच पीत जाणार आहे ..अधिक अधिक नुकसान करणार आहे स्वतचे व कुटुंबाचे देखील ..या सर्व कालावधीत तो जे शारीरिक ..मानसिक ..आर्थिक,,व इतर प्रकारचे नुकसान करेल त्याच्या तुलनेत ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा खर्च नक्कीच परवडतो .

६) व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होणे म्हणजे काहीतरी री मोठे पाप आहे असा समज व्यसनी व्यक्ती तसेच कुटुंबियांचा देखील झालेला असतो ..कारण पालक बहुधा व्यसनमुक्ती केंद्रात मुलाला किवा नातलगाला दाखल केलेय असे सांगायला कचरतात .. व्यसनी व्यक्ती देखील तसे बाहेर कोणाला कळू नये याची दक्षता घेतो ..अर्थात त्यामागे हा एक मनो शारीरिक आजार आहे व उपचार घेणे केव्हाही चांगले ही भूमिका असत नाही . त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्राच्या लोकांना पालक सांगितले जाईल तसे सहकार्य करत नाहीत .. तर व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडण्यासाठी आतुर असलेल्या व्यसनी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातो ..अनेकदा व्यसनमुक्ती केंद्रात अर्धवट उपचार दिले जातात ..किवा दीर्घकालीन उपचार देणे टाळले जाते .

७) व्यसनाचा मनावर असलेला पगडा कायमचा रहातो .. त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेवून बाहेर पडताना जी पथ्ये सांगितली जातात ..त्यात समुपदेशकाला नियमित भेटणे ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमस च्या मिटिंगला जाणे ..वगैरे ज्या सूचना दिल्या जातात त्याचे व्यसनी व त्याचे पालक दोघांकडूनही पालन केले जात नाही .

८) व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले म्हणजे आता याचे व्यसन सुटलेच पाहिजे असा समज अनेक पालकांचा होतो..व काही केसेल मध्ये पुन्हा पिणे सुरु झाल्यास ..आजारा ला जवाबदार न मानता पालक व्यसनमुक्ती केंद्राला दोष देतात ...उपचार घेतलेल्या व्यक्तीवर अवास्तव विश्वास ठेवतात .. पालकांनी पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करू नये म्हणून व्यसनी खूप तक्रारी करतो व्यसनमुक्ती केंद्राबद्दल आणि पालक देखील त्याच्या तक्रारींवर विश्वास ठेवून त्याला पुन्हा उपचार देणे टाळतात .

( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा