रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

व्यसनमुक्ती केंद्र !


जागतिक आरोग्य संघटनेने निर्देशित केलेल्या काही सूचनां नुसारच व्यसनमुक्ती केंद्रे चालवली जावीत असे अभिप्रेत असते ..व्यसनाधीनता या मनो - शारीरिक आजारावर आजवर जेव्हढे संशोधन झालेले आहे त्या वरून व्यसनी व्यक्तीला शारीरिक व मुख्यतः मानसिक सुधारणेसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी व्यसनमुक्ती केंद्रात असल्या पाहिजेत ...तरच योग्य शास्त्रीय उपचार होतोय असे म्हणता येईल ..व्यसनमुक्ती केंद्रांना पुनर्वसन केंद्र ( रिहँबिलीटेशन सेंटर ) असेही म्हणतात ..म्हणजेच बिघडलेल्या सवयी ..बिघडलेले वेळापत्रक ..व्यसनामुळे झालेले नुकसान ..जीवनात आलेली अस्ताव्यस्तता ..गमावलेले मानसिक संतुलन ..आरोग्य हे सर्व पुन्हा जागेवर आणण्यासाठी पुन:प्रस्थापित करण्यासाठी तसेच भविष्यकाळात पुन्हा व्यसन न करता आपले कुटुंबीय ..समाज ..नोकरी ..व्यवसाय या सर्व ठिकाणी पुन्हा आत्मविश्वासाने वावरण्यासाठी केलेली मदत असे म्हणता येईल . मात्र मागील भागात उल्लेख केल्याप्रमाणे केवळ शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी जी व्यसनमुक्ती केंद्रे चालवली जातात तेथे अशा सुविधा असत नाहीत ..त्यामुळे अशा केंद्रात उपचार देवून व्यसनी व्यक्तीला फारसा फायदा होत नाही .. अशा गल्लाभरू व्यसनमुक्ती केंद्रांमुळे चांगले व प्रामाणिकपणे काम करणारी व्यसनमुक्ती केंद्रे देखील बदनाम होत असतात .जेव्हा एखाद्या व्यसनी व्यक्तीला कुटुंबीय एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवू इच्छितात त्या वेळी ..त्या व्यसनमुक्ती केंद्रात योग्य शास्त्रीय उपचार दिले जात आहेत किवा नाहीत याची खात्री करूनच तेथे दाखल करणे हितावह ठरेल ...


शारीरिक उपचार____

वारंवार व्यसन केल्यामुळे व्यसनी व्यक्तीच्या शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण झालेल्या असू शकतात ..ज्यात रक्तदाब ..मधुमेह ..लिव्हरची घसरलेली कार्यक्षमता ..कावीळ..स्नायूंचा कमकुवतपणा ..संकोच पावलेल्या रक्तवाहिन्या .. शिवाय आम्लपित्त ...पचनक्रिया मंदावणे ..निस्तेज त्वचा ..भूक न लागणे ..घश्यात जखमा ..असे अनेक प्रकारचे होते ..वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांमध्ये होणारे नुकसान होत असते ..एकंदरीत असे शारीरिक नुकसान झालेल्या व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यावर प्रथम तेथील फिजिशियन त्या व्यक्तीला तपासून ..आवश्यक त्या तपासण्या करून घेवून ..औषधे सुचवीत असतात ..त्या नुसार ती औषधे पुरवली गेल्यास व्यसनी व्यक्तीची शारीरिक स्थिती चांगली होण्यास मदत मिळते ..काही वेळा व्यसनी व्यक्तीचे इतके नुकसान झालेले असते की व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर देखील व्यसनी व्यक्तीला दीर्घकाळ अशी औषधे घ्यावी लागू शकतात .या सर्व कालावधीत पालकांनी वेळोवेळी संबंधित लोकांशी संपर्क करून त्यांना योग्य ते सहकार्य करणे अपेक्षित असते व्यसनीला त्यापूर्वी दिलेल्या उपचारांची संबधित कागदपत्रे जर व्यसनमुक्ती केंद्रात सा दर केली गेली तर योग्य ठरते ....अनेकदा पालक व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले की आता आपली जवाबदारी संपली अशा अविर्भावात असतात ..व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे इस्पितळ नव्हे ..त्यामुळे काही वेळा जास्त नुकसान झालेल्या एखाद्या व्यसनीला काही काळ एखाद्या इस्पितळात ठेवण्याची देखील गरज भासू शकते ..अशा वेळी पालकांनाच तो इस्पितळाचा खर्च करावा लागतो ..अनेक पालकांना याची कल्पना नसते त्यामुळे ते इस्पितळाचा खर्च करण्यास माघार घेवू शकतात किवा इस्पिताळात दाखल केल्यावर तेथे रुग्णाची देखभाल करण्यास तयार नसतात असा अनुभव आहे .

मानसिक उपचार ___

शारीरक आरोग्य सुधारत असतानाच मानसिक उपचारांची सुरवात होत असते ..यात मुख्यतः व्यसनी व्यक्तीला तू बरा होणार आहेस असा विश्वास देणे आवश्यक असते ..त्याच प्रमाणे सुधारणेसाठी आवश्यक असणारी मनोभूमिका तयार करण्यासाठी त्याला वेळोवेळी समुपदेशन केला गेले पाहिजे ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करताना पालकांनी जर व्यसनी व्यसनी व्यक्तीचा स्वभाव ..त्याचे गुण अथवा चांगला क्षमता ..त्याच्या स्वभावातील जाणवणारे दोष ..लहानपणापासूनचे वर्तन ..व्यसनामुळे त्याने स्वतचे व कुटुंबियांचे केलेले नुकसान ..वैवाहिक समस्या ..वगैरे बद्दल त्यांना असलेली खरीखुरी माहिती लेखी स्वरुपात व्यसनमुक्ती केंद्रात दिली पाहिजे ..म्हणजे समुपदेशकाला त्या माहितीचा उपयोग करून व्यसनी व्यक्तीला योग्य समुपदेशन करता येते ..व्यसनी व्यक्ती स्वतः अशी सगळी माहिती खरी देईलच याची खात्री नसते ..उलट खोटे बोलण्याच्या सवयीमुळे तो समुपदेशकाशी देखील खोटे बोलू शकतो..माझे फारसे नुकसान झालेले नाहीय असाच त्याचा अविर्भाव असतो त्यामुळे अनेक गोष्टी तो लपवतो ..अनेकदा पालकही काही गोष्टी लपवू इच्छितात ..अशी लपवाछपवी फायदेशीर असत नाही ...मानसिक उपचारात ..समूह उपचार ..डायरी लिहिणे ..व्यक्तिगत समुपदेशन ..समूह चर्चा किवा गटचर्चा अशा विविध गोष्टी येतात .

( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा