प्रिय ...
अनामिक
घरातल्या घरातच आपला संवाद तुटलाय आजकाल ...वाद मात्र वाढतच चाललाय ..तुम्हाला काहीही सांगायला गेले तर तुम्ही वस्सकन अंगावर ओरडून मला झटकून टाकता ...किवां सरळ सरळ माझ्या कडे दुर्लक्ष करता ..म्हणून हे पत्र लिहितेय ..किमान पत्र वाचताना तरी शांतपणे माझे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल तुम्हाला ...पत्राचा मायना लिहिताना प्रिय या शब्दाला का कोणजाणे हात जरा थरथरला माझा ...प्रिय असे म्हणण्या सारखे काही शिल्लक ठेवलेय का तुम्ही आपल्या संबंधात ? सतत अप्रिय असे बोलणे ..वागणे ..सुरु असते तुमचे ...लग्नानंतर सुरवातीची काही फुलण्याची वर्षे वगळल्यास... गेल्या १५ वर्षात हळू हळू मी कोमेजत गेले हे तरी तुमच्या लक्षात आलेय की नाही देव जाणे...माझे तुमच्याशी मनाविरुद्ध तर लग्न लावले गेले नसावे ना ? अशी शंका येण्या इतपत तुम्ही माझ्याशी तुसडेपणाने वागत आहात ...तरीही आपला संसार टिकून आहे ..का ? अनेकदा मला प्रश्न पडतो की इतके सगळे सोसून का राहिलेय मी तुमच्या संसारात ...माझे संस्कार ...आपली मुले ..की माझा सौभाग्य टिकवण्याचा अट्टाहास ? लग्नापूर्वी माझ्यावर इतकी असहाय ..हतबल होण्याची वेळ येईल असे कधीच वाटले नव्हते मला ...घरी राजकुमारी सारखी राहणारी मुलगी मी ...प्रेमळ भावू ..जीव लावणारे आईवडील ....माझे घर ....मैत्रिणी ..सगळ्या सगळ्या प्रिय आणि आनंदी क्षणांना दूर सारून .....परीकथेतल्या राजकुमाराच्या संसारातली राणी होईन अशी स्वप्ने बाळगून ...तुमच्या गळ्यात माळ घालताना ...मनातून मोहरून गेले होते मी ...लग्नाच्या वेळचे तुमचे रुपडे डोळ्यात साठवून घेतलेय मी ...तुमच्या चालण्यातील रुबाब ..माझ्याशी बोलतानाचे मृदू आर्जव ...कधी कधी हे सारे आठवत मी आपल्या लग्नाचे जुने अल्बम काढून बसते ...ते फोटो पाहताना नकळत डोळ्यातून पाणी ओघळते ..पूर्वी माझ्या डोळ्यातील पाणी पाहून कासवीस होणारे तुम्ही...आता माझ्या व्याकूळ अश्रुना ढोंग म्हणता ..नाटके म्हणता ..हे तुम्हाला जाणवले आहे का ? लग्नानंतर सुरवातीच्या तीन चार वर्षात मी माहेरी निघाले की अवस्थ होणारे तुम्ही ...जवळ जवळ दररोज मला फोन करून कधी परत येणार अशी विचारणा करायचे ..आणि परवा तुम्ही नशेत निखाऱ्या सारख्या लाल सारखे डोळ्यांनी माझ्यावर ओरडलात ..रहायचे असेल तर रहा नाहीतर जा जिथे जायचे तिथे मला गरज नाही तुझी ...क्षणभर थक्कच झाले हो मी ..वाटले इतकी नावडती झाले मी तुमची..तरीही मी लोचट ..लाचारासारखी तुमच्या संसारात तुकडे तोडतेय ..रात्री तमाशा करायचा ...आरडाओरडा करून मला कोणीच नकोय असे म्हणायचे ..मला न मुलांना जखमी करायचे ..दारूच्या नशेतल्या काल्पनिक जगात झोपी जायचे अन सकाळी उठले की शपथा घ्यायच्या...पुन्हा नाही ..अजिबात नाही ..कधीच नाही ..असे म्हणत माझी मनधरणी करायची हे देखील अंगवळणी पडलेय ..आताशा तर तुम्ही घरात जणू एकटेच राहताय असे वागत असता ..तुमच्या लेखी आमची किंमत भिंती ..कँलेंडर ...फुलदाणी ..टेबल ..खुर्ची ..अश्या निर्जीव वस्तूंसारखी झालीय असे वाटतेय .
आपल्याला पहिली मुलगी झाली तेव्हा तुम्ही कितीही आनंद दर्शवला तरी तुमच्या कपाळावरील सूक्ष्म आठी माझ्या नजरेतून सुटली नव्हती ..त्या नंतर कधी काळी दारू पिणारे तुम्ही बहुतेक रोजच पिणे सुरु केले ..इतका तिटकारा आहे का तुम्हाला मुलीचा ..तिचा सांभाळ ..शिक्षण ..काळजी घेणे ..लग्न जुळवणे ..ठरवणे ..हे सगळे त्रासदायक असते ...त्याचे टेन्शन आहे असेही तुम्ही नंतर बोलून दाखवले होते मला ..तेव्हा मी हादरलेच होते ..तुम्हाला आज पर्यंत निर्व्याज प्रेम देवून तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपणारी तुमची आई ...दर भाऊबीजेला तुम्हाला तुमच्या यश ..दीर्घायुष्यासाठी ओवाळणारी ..भाऊ भाऊ म्हणून तुमच्या अवतीभोवती असणारी तुमची प्रेमळ बहिण...तुम्हाल आनंदी ..सुखी ..तृप्त पाहण्यासाठी तडतड करणारी तुमची पत्नी या देखील सगळ्या मुलीच आहेत की ..तरीही तुम्हाला मुलगी झाली म्हणून टेन्शन आले होते ..की हा बहाणा होता तुमचा निर्विघ्न दारू पिण्यासाठीचा ...पुढे मुलगा झाल्यावर वाटले आता सगळे भरून पावले ..तुम्हाला हवे तसे झाले ..आता तुम्ही पिणे बंद कराल ..पुन्हा पूर्वीसारखे संसार सुरु होईल ..पण तेथेही तुम्ही माझी निराशा केली ..कामावरच्या तक्रारी ...आर्थिक ओढाताण ...बिघडलेला मूड ...काहीतरी कुरबुर ..शेवटी टेन्शन या कारणांनी तुमचे पिणे वाढतच गेलेय ...आताशा तर तुम्ही घरी नसलात की खूप मोकळे वाटते ..तुम्ही घरी आलात की मुले घरात एखादा राक्षस आल्याच्या भीतीने दबकून बसतात ...सतत तुम्ही रागवाल ..ओरडाल या धास्तीत असतात ...तुम्हाला हे देखील माहित नसेल की तुमची मुलगीच रात्री तुम्ही बेहोष सोफ्यावर झोपलेले असताना तुमच्या अंगावर हळूच चादर घालते ...शेवटचे आपण सगळे कुटुंबीय कधी फिरायला गेलो होतो हे देखील आठवत नाहीय मला ...तुम्ही पूर्वी घरी येताना आठवणीने चौकातून गजरा घेवून येत असत माझ्यासाठी ...हल्ली मी गजरा घालणे सोडूनच दिलेय...फुले मला खुप आवडतात म्हणूनच की काय आता काटे नशिबी आलेत माझ्या ..
आपल्या विस्कटलेल्या संसाराची घडी नीट बसावी म्हणून मी काय करू हे तरी एकदा सांगा मला ..हवे तर तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन .... मुलांना घेवून कुठेही ..जरी दोघांची मुले असली तरी मुलांची जवाबदारी शेवटी मलाच घ्यावी लागणार असे दिसतेय ..दर महिन्यात कौटुंबिक गरजांसाठी पैश्यांची जुळवाजुळव करताना मला जीव नकोसा होतोय...माहेरहून पैसे मागायची आता लाज वाटू लागली आहे ..तुमचे आईवडील..भावंडे देखील मलाच दोष देतात तुमच्या दारूसाठी ..म्हणे पूर्वी जास्त पीत नव्हता ...तूच त्याला नीट ताब्यात ठेवले नाहीस..सारखी कटकटी करत असतेस त्याच्या डोक्याशी ..म्हणून पिणे वाढलेय वगैरे आरोप करतात माझ्यावर...घराबाहेर पडायची लाज वाटू लागलीय ..सगळे माझ्याच कडे रोखून पाहत आहेत असा भास होऊ लागलाय ..परवा तर नाक्यावर एक जण लाळघोटे पणे माझ्याकडे पाहून ओळखीचे हसला ...दारुड्याची पत्नी म्हणजे लोकांना पर्वणी वाटते हे कधी समजणार तुम्हाला ...तुम्ही एकदा तरी सगळ्याचा गंभीरपणे विचार करावा ..काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा असे आता वाटतेय ...तुम्हाला आपली वयात येणारी मुलगी घरात बापाचे प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर कुठेतरी चुकीच्या ठिकाणी प्रेम शोधायला गेली तर चालेल का ? तुमचा लाडका मुलगा ..बापा सारखाच सिगरेट ..तंबाखू ..आणि शेवटी वडिलांसारखाच दारू प्यायला लागला तर कसे वाटेल ? ..दारूने पोखरलेले शरीर ..केव्हाही हार्ट अटँक ..कावीळ ..अपघात ग्रस्त झालेले चालेल का ? नाहीतर पक्षाघात होऊन अंथरुणाला खिळून राहणे तुम्हाला आवडेल ? निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे ...मला तर काहीही दोष नसताना तुमच्या जोडीने सगळे भोगावे लागणारच आहे ..लग्नात मी सप्तपदी चाललेय ना तुमच्या जोडीने ...संसाराचे चटके सोसावेच लागणार मला ..किवा अगदी असह्य झाले तर सगळ्याकडे निग्रहाने पाठ फिरवावी लागणार ...पण मला राहायचेय हो तुमच्या संसारात ..मला माहित आहे तुम्ही खूप चांगले आहात मनाने..फक्त तेव्हढी दारू आपल्या संसाराचे वाटोळे करतेय हे समजून घ्या ..इतकेच नाही तर त्यातून कायमचे मुक्त होण्यासाठी निर्वाणीचे प्रयत्न करा ..तुम्हाला नक्की जमेल ..तुमची जिद्द ..हट्टीपणा .मनस्वीपणा सगळे दारू सोडण्यासाठी उपयोगात आणा ...असे झाले तर माझ्यासारखी सुखी दुसरी कोणी नसेल जगाच्या पाठीवर ..कुंकू लावताना माझा उर अभिमानाने भरून येईल .
खूप वर्षांचे साचलेले एकदाच लिहून टाकतेय ...तुम्हाला रागही येईल माझा ..तरीही नेटाने लिहिलेय ..बाकी निर्णय तुमच्या हाती आहे .
सदैव तुमचीच .....
अभागी !
....तुषार नातू !