शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

अनामिक मित्रा ... पत्र १


प्रिय ...
अनामिक मित्रा ...


सप्रेम नमस्कार ...



असे जाहीर पत्र लिहायची आता गरज वाटतेय मला ...कदाचित मी तुझ्या भानगडीत नाक खुपसतोय असे वाटून तू मनातल्या मनात माझा निषेधही करशील ..मग निषेध साजरा करायला एकदोन पेग मारशील ..मला तुझी ही सवय माहित आहे ..कसलाही ..कशाचाही निषेध ..आनंद ..राग ..द्वेष ..या साऱ्या आणि इतर अनेक प्रकारच्या भावनाचे प्रकटीकरण करण्याचा तुझा हा खास मार्ग आहे ..पेग मारल्याशिवाय तुला योग्य जोर चढत नाही ..खरेतर तुला मी पूर्वीच सावध केले होते ..क्वचित पिणारा तू आता ..सराईत होत चालला आहेस असे सांगितले होते ..त्यावर तुझी अनेक समर्थने ..कारणे ..देणे सगळ्या जगाला दोष देणे ..गरीब बिच्चारा मी ... बंडखोर पुरोगामी मी ..आनंदाच्या वाटेवरचा पथिक मी ...मौजमस्तीचा माहोल मी ...कर्तुत्ववान मी ..समर्थ मी ...कधी असहाय हतबल मी ..असे अनेक ' मी 'लावून तू पुढे चालतच राहिलास ..तुला ज्यांनी ज्यांनी याची जाणीव करून दिली त्यांना तू सहजपणे शत्रूंच्या यादीत टाकलेस किवा ते तुझ्यावर जळतात ..तुला मागे खेचू पाहतात ..तुझे भले त्यांना पाहवत नाही असे वाटून तू ' भाड मे जाये दुनिया ' हे स्वतःला सांगत अधिकच बेधडक बनलास ...तुला खात्री होती तुझ्या विजयाची ..तुझ्याजवळ तसा आत्मविश्वासही होता आभाळ पेलण्याचा ..
तू खरोखर अनभिज्ञ होतास ..परिणामांबाबत बेफिकीर होतास ..तुला अजूनही भरवसा असेल स्वतःवर ..मी त्यातला नाही म्हणून तू स्वत:ची तुलना रस्त्यावर पडलेल्या भणंग दारूड्याशी करून ..' स्कॉच ' चा पेग रिपीट करत असशील ....पासबुकातील तगडा बँलंस...क्रेडीट कार्ड ..पासपोर्ट ...तुझे पँकेज ...चारचाकी ....बाहुलीसारखी सुंदर पत्नी ....तुझे राजकुमार ..राजकन्या ..हे सारे सारे तुला ग्वाही देतील ...तू त्यातला नाहीस याची ...तुला देशी दारूचा ..गावठी दारूचा तिटकारा आहे हे पण मी जाणतो ..तू दिवसा दारू पिणा-यांना तुच्छ समजतोस ...तू कदाचित अनेकांना संकटात तारणहार झाला असशील ..कुटुंबियांच्या ' आंखो का तारा ' असशील ...तू घरी मित्रांना पार्टी देताना कदाचित आई बाबा धन्य होत असतील तुझे वैभव पाहून ..पत्नी सर्व मित्रांच्या सरबराईत तुला मदत करत असेल .. मला सगळे मान्य आहे ..मलाही कौतुक आहेच रे तुझ्या कर्तुत्वाचे ...पण ..पण ..

मित्रा तुझ्यासारखे अनेक पाहिलेत मी त्या प्याल्यात हळू हळू बुडतांना..सर्वस्व गमावताना ..देशोधडीला लागताना ....त्यांचा स्वतःला वाचविण्याचा आकांतही अनुभवला आहे जवळून ...एकाच वेळी पश्चाताप ..खेद ..अपराधीपणा ..झाकोळून टाकणारी निराशा..व्यसन बंद करण्याच्या शपथा आणि त्याच वेळी ती पहिल्या पेगची व्याकूळ करणारी अनिवार ओढ देखील मी पहात आलोय ...फक्त आजच ..एकदाच ..थोडेसेच असे स्वतःला बजावत होश जाईपर्यंत ढोसणारे मला नवीन नाहीत ...मित्रा तुला सावध करण्याचा हा जाहीर पत्राचा मार्ग तुला एखादेवेळी उपरती देईल अशी आशा आहे ...सावध झाला नाहीस तर नाहीस पुढचे सगळे मला माहितच आहे ...कदाचित सर्वातून तावून सुलाखून बाहेर पडशील असा दावा करत असशील तू ..तर लक्षात ठेव सर्व दावे ..वचने ..शपथा ..नेहमीच फोल ठरल्या आहेत अनेकांच्या बाबतीत ..सर्व गमावल्या नंतर जरी तू भानावर आलास तरी हरकत नाही ..पण भानावर ये ...प्राण गमावण्याची वाट पाहू नकोस ..अरे अनेकदा हे जीवन व्यर्थ आहे ..कुचकामी आहे ..जगण्यात काही राम राहिला नाही असेही तुला वाटेल ..तरीही एक गोष्ट विसरू नकोस ..तुला निसर्गाने अत्यंत उत्तम असा जन्म दिलाय ..सर्व प्राण्यांच्या पेक्षा श्रेष्ठ ... स्वतच्या कर्मांनी स्वतःला कनिष्ठ करू नकोस ...तुझी अभिरुची अतिशय उच्च आहे याबाबत मला यात्किंत्चींतही संशय नाही ..तुझी समाजासाठी ..कुटुंबासाठी असलेली तळमळ देखील आधीचीच आहे ....तू कधीच कोणाचेही वाईट चिंतले नसशील .....तरीही ...तू स्वतःला आनंद देण्याचा मार्ग मात्र चूकीचा निवडला आहेस हे मी छातीठोक पणे सांगतो ...कधी कधी तुझ्यावर अन्याय झालाही असेल ..कधीतरी कोणी अपमानित केले असेल ..कोणी विश्वास घात केला असेल तुझा ..तुला धोका देवून जखमी केले असेल ...विरहात जाळले असेल ..मात्र यावर मलमपट्टी म्हणून तू विषांचा उपयोग करतो आहेस हे तुला कधी समजणार ? 

असो मित्रा ..एक निश्चय कर ..हा मानवजन्म व्यर्थ जाता कामा नये ..एकदाच मिळतो म्हणे ..तेव्हा जन्माचे सार्थक करायचे ठरव ..आनंद देणाऱ्या खूप गोष्टी आहेत जगात ..एकाद्याचे अश्रू पुसताना देखील आनंद मिळतो ..चिमुकल्या बाळाच्या निरागस मुद्रेकडे पाहून देखील मन भरून येते ...कुत्र्याची पिल्ले खूप मनमोहक मुद्रा करून मन रिझवतात ..झालेच तर कविता ..संगीत ...कलांचे विविध प्रकार ...मिष्टान्ने ..सगळ्यात महत्वाचे म्हणजे निसर्गाचे रंग निरखणे ..झाडे ..वेली ..फुले ....पर्वतरांगा ...खळखळ करत उंचावरून उडी घेणारे धबधबे ...उरत धडकी भरवणारा प्रपात ...उगवत्या सूर्याचे मंगल आगमन ...सूर्यास्ताच्या वेळी सुरक्षित ठिकाणी परतणारे ..पक्षी ..प्राणी ..पिलाच्या ओढीने हंबरणारी गाय ... तू परतल्यावर पत्नीच्या चेहऱ्यावर उमटणारे स्मित ..वाटेकडे डोळे लावून बसलेली आई ..बाबा म्हणून बिलगणारे रेशमी बंधन ..सगळे सगळे अतिशय आनंददायी असते ...मित्रा तू हे सगळे भंकस आहे म्हणत नव्याने स्वतःला चार्ज करायला बसशील किवा उद्यापासून बंद असे ठरवशील किवा नेहमीप्रमाणेच स्वताशी हसून मला दादही देशील ..एक विसरू नकोस तुझी दाद मिळावी म्हणून मी हे लिहिले नाहीय ..माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली ही कळकळ तू समजून घेशील तर अधिक बरे वाटेल मला ..कारण मुळात तू आणि मी वेगळे नाहीच आहोत ..,,तुझ्यासारखाच मी देखील कधी तरी या वाटेवर चाललो होतो ..बिनधास्त ..बेमुर्वतखोर धाडसाने ...मात्र अनेक वळणे घेत ..पडत धडपडत ..रांगत ..सरपटत एकदाचा मी चालू लागलोय सुरक्षित हमरस्त्यावर ..तू ही कधीतरी येशीलच सोबत या विश्वासाने ..

तुझाच आगावू मित्र !

तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा