सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

वाढत जाणारा आजार !


सर्व प्रकारच्या दुर्धर आजारात हे वैशिष्ट्य आहे की योग्य वेळी लक्षात येवून उपचार झाले नाहीत तर आजार वाढत जातो ..व्यसनाधीनतेचा आजार देखील त्याच प्रकारचा आहे .. हा मनोशारीरिक आजार वाढत जाणारा आजार आहे असे म्हंटले जाते याचा अर्थ असा आहे की सेवन करण्याऱ्या व्यक्तीचे व्यसनाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत जाते ..पहिल्या वेळी सेवन केल्यावर .... ' मजा आया ' ही भावना तयार होण्यासाठी जितका डोस लागला होता ..त्यापेक्षा जास्त डोस पुढच्या वेळी ' मजा आया ' चा अनुभव घेण्यासाठी लागू शकतो .. नंतर नंतर या डोसचे प्रमाण वाढतच जाते .. केवळ डोसच वाढतो असे नव्हे तर जसे जसे डोस वाढत जातो तसे तसे सेवन करणाऱ्या व्यक्तीचे मानसिक ..शारीरिक .आर्थिक ..कौटुंबिक ..सामाजिक आणि नैतिक पातळीवरील नुकसान देखील वाढत जाते ..प्रत्येक व्यक्तीचा डोस वाढवण्याचा वेग निरनिराळा असू शकतो ..मात्र डोस आणि नुकसान यात वाढ होत जाते हे निखळ सत्य आहे . या वरून या आजाराच्या इतर दुर्धर आजारांप्रमाणे तीन स्टेजेस करता येतील .


१) पहिल्या स्टेज मध्ये ..व्यसनी व्यक्ती नियमित सेवन न करता वर्ष सहा महिन्यातून जे पिण्याचे प्रमाण होते ते पंधरा दिवसातून एकदा किवा आठवड्यातून एकदा करतो .. स्वाभाविक व्यसनावर होणारा त्याचा खर्च वाढतो ..मी रोज घेत नाही असे तो इतरांना आवर्जून सांगत जातो ..पत्नी किवा कुटुंबीयांनी त्याच्या या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली अथवा त्याला उपदेशाचे चार शब्द सांगितले तर तो पार्टी ..जुना मित्र भेटला .. आज जरा जास्त ताण होता अशी विविध कारणे सांगत जातो ..व्यसन केले आहे हे लपवायला खोटे बोलणे... आदळ आपट सुरु करतो .. दारू सोबत कधी कधी झोपेच्या गोळ्या .ताडी ..अथवा गांजा सारखे इतर मादक पदार्थ देखील प्रयोग म्हणून सेवन केले जाऊ शकतात ..घरात किरकोळ खटके उडतात .

२) आठवड्यातून तीन चार वेळा किवा नियमित सेवन केले जाते ..राजरोस पिणे सुरु होते ...चिडचिड वाढते ... व्यसनाच्या वाढत्या प्रमाणाबरोबर .. कामावरील सुट्यांचे प्रमाण वाढते ..कारण रात्री जास्त झाल्याने ..दुसऱ्या दिवशी कामावर जावेसे वाटत नाही ..आळस वाढतो .. दैनंदिन कौटुंबिक जवाबद-या कडे दुर्लक्ष होते .लैंगिक संबंधातील रुची नष्ट होते किवा संबंध ठेवणे जमत नाही ....पूर्वी कुटुंबियांचा उपदेश शांतपणे एकूण घेतला जाई.. आता उलट उत्तरे देणे सुरु होते ....विवाहित असल्यास पत्नीशी आर्थिक व इतर कारणांवरून होणारी भांडणे वाढतात ..कुटुंबीय देखील बाहेरच्या लोकांना उगाच शोभा नको म्हणून नमते घ्यायला सुरवात करतात ..घरातील लोक त्याच्या व्यसनासाठी एकमेकांना जवाबदार धरू लागतात ..किवा घरात दोन गट पडतात ..विवाहित असल्यास एका बाजूला पत्नी असते तर दुसऱ्या बाजूला व्यसनी व त्याचे कुटुंबीय जे व्यसनीच्या पत्नीला सबुरीने घ्यायला सांगतात किवा तिने उगाच कटकट करू नये म्हणून तीला बजावतात ..यात त्यांचा हेतू कितीही चांगला असला तरी व्यसनी व्यक्तीच्या वर्तनाला खतपाणी मिळत जाते ..कमीच मोठा भाग व्यसनावर खर्च होऊ लागतो ..ज्यामुळे घरात पैश्यांची चणचण भासू लागते ..कुटुंबीय कसे तारे सारे निभावून नेवू लागतात ..क्वचित घरात शिवीगाळ ..भांडणे होतात ..पत्नी घर सोडून जाण्याच्या धमक्या देवू लागते ..खाजगी नोकरी असल्यास नोकरी जाऊ शकते .. सरकारी नोकरीत मेमो मिळतात ..रजेचे कारण म्हणून डॉक्टरची खोटी प्रमाणपत्रे कचेरीत दिली जातात ..व्यवसाय डबघाईस येतो ....व्यसनीचे जेवण घटते तर कुटुंबियांना त्याच्या चिंतेने जेवण गोड लागत नाही ..व्यसनी व्यक्ती जास्तीत जास्त एकटा राहू लागतो ..एकलकोंडेपणा वाढतो ..लग्नकार्ये व इतर सामाजिक समारंभात जाणे टाळू लागतो ..कुटुंबियांना देखील शेजाऱ्या पाजा-यांच्या ..नातलगांच्या अवघड प्रश्नांचा सामना करावा लागतो .. अधून मधून व्यसन सोडण्यासाठी शपथ घेतली जाते ..वचने दिली जातात मात्र व्यसनी व्यक्ती योग्य समर्थांना सह शपथा ..वचने मोडू लागतो . घरातील लहान मुले भांबावून जातात .. व्यसनी व्यक्तीला ती घाबरू लागतात ..त्यांच्या आभ्यासावर परिणाम दिसू लागतो .एकदोन किरकोळ अपघात घडू शकतात ..क्वचित पत्त्नीला किवा व्यसनाच्या आड येणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ ..मारझोड सुरु होऊ शकते ..या स्टेज मध्ये कुटुंबीय ..उपास तपास ..नवस -सायास ..अंगारे ..धुपारे पत्रिका ..जोतिषी असे विविध उपाय योजण्याचा प्रयत्न करतात . काही केसेस मध्ये जनरल फिजिशियन कडून औषध उपचार होतात ..काही दिवस बरे जातात ..पुन्हा तेच सुरु होते एव्हाना व्यसनावर उडवलेला किवा व्यसनामुळे खर्च झालेला पैसा लाखोंच्या घरात जातो त्यामुळे परवडेल तशी हलक्या दर्जाची दारू सेवन केली जाते .

३) सकाळ ..संध्याकाळ ..किवा दिवसातून वाटेल त्या वेळा व्यसन केले जाते ..घरात भांडणे रोजची होतात ..शेवटी रोज मरे त्याला कोण रडे अश्या अविर्भावात घरचे स्वतची सहन शक्ती वाढवतात .. व्यसनी आता सरळ सरळ स्वतच्या व्यसनाला इतरांना जवाबदार धरू लागतो ..कुटुंबीयांवर बेछूट आरोप करणे सुरु होते .. अगदी पत्नीच्या चारित्र्यावर देखील संशय व्यक्त करू लागतो ..आपल्या व्यसनाच्या मध्ये कोणी बोलू नये म्हणून तो घरच्या मंडळींच्या मनात दहशत माजवतो ..पत्नी दोन तीन वेळा रागाने माहेरी गेलेली असते ..व्यसनीने पुन्हा तिच्याशी गोड बोलून भूलथापा देवून परत आणलेले असते ..कुटुंबियांची निराशा वाढत जाते .. पत्नीच्या मनात आत्महत्येचे विचार येतात ..परंतु केवळ मुलाकडे पाहून तिचे तसे धाडस होत नाही ..घरात व्यसनी व्यक्ती स्वतचा हिस्सा वाटा आई वडील व भावंडे यांच्याकडे मागू लागतो ..काही ठिकाणी उगाच डोक्याला ताप नको म्हणून व्यसनी व्यक्तीला वेगळे घर करून दिले जाते ..आर्थिक मदत करणे कुटुंबीय बंद करतात किवा नाकारतात व नाईलाजाने मदत करतात . याच काळात ' हा मेला तर एकदाचे सुटू ' असे विचारही त्यांच्या मनात येवू लागतात ...उधार उसनवारी .कर्जे वाढू लागतात . विविध शारीरिक आजार जडू शकतात .. घरच्या गोष्टी चव्हाट्या वर येण्याची कुटुंबियांची भीती हळू हळू नष्ट होऊ शकते ..कसेही करून याला आवर घातला पाहिजे असे वाटून काही कडक मात्र अशास्त्रीय उपाय योजले जाऊ शकतात .

वर वाढत जाणाऱ्या आजाराचे तीन स्टेजेस मध्ये सर्वसाधारण असे वर्णन केले आहे .. काही सन्माननीय अपवाद असू शकतात .. ज्यांच्याकडे या बद्दल योग्य युक्तिवाद असेल ...काही लोक व्यसनाच्या बाबतीत इतके संवेदनशील असतात की त्यांच्या बाबतीत एकदम पहिली आणि तिसरी स्टेज येवू शकते .. तर दारू सोडून इतर मादक पदार्थांच्या बाबतीत अश्या स्टेजेस एकदम वेगाने येतात ..काही केसेस मध्ये व्यसनी वर्ष सहा महिने व्यसन बंद करतो मात्र जेव्हा पुन्हा सुरु होते तेव्हा सगळी भरपाई करून दुप्पट वेगाने पितो व नुकसान देखील वेगाने होते .यातील कोणत्याही स्टेज मध्ये व्यसानीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यास बरेच नुकसान टळू शकते . 

( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा