मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१३

आजाराची वैशिष्ट्ये ...!

एकदा व्यसनाची मानसिक व शारीरिक गुलामी सुरु झाली की मग व्यसनी व्यक्ती कशालाही आणि कोणालाही न जुमानता व्यसन करत जातो ..जणू ' व्यसन करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ' या तालावर त्याचे जगणे सुरु होते ...व्यसनाचे समर्थन करण्यासाठी त्याच्याकडे हजारो कारणे असतात ..स्वतच्या शारीरिक शक्तीचा . ..मानसिक शक्तीचा ..बुद्धीचा ..आणि सर्व प्रकारच्या क्षमतांचा वापर करून व्यसन करत जातो ..स्वतचा तो उत्तम वकील झालेला असतो ..व्यसन करण्यामागील त्याचे युक्तिवाद इतरांना कितीही मूर्खपणाचे वाटले तरी त्याला त्याची पर्वा नसते ..फार थोडे भाग्यवान लोक असे आहेत की.. प्रिय व्यक्तीची शपथ .. एखाद्या देवाची शपथ किवा देवाच्या नावाने घातलेली माळ ..आयुष्यात व्यसनामुळे घडलेली एखादी दुर्घटना .. वगैरेमुळे ते एका फटक्यात कायमचे व्यसन सोडू शकतात .. बाकी बहुसंख्य व्यसनी व्यक्तींवर शपथ -वचने , देव -धर्म , मंत्र -तंत्र , याचा दीर्घकाळ परिणाम होत नाही ..काही दिवस रेस्ट घेतल्यासारखे ते व्यसन बंद करतात ..आणि अनपेक्षितपणे केव्हाही पूर्वीच्याच जोमाने पुन्हा व्यसन सुरु करतात ..कायमची व्यसनमुक्ती त्यांच्या बाबतीत अवघड होऊन बसते ...अश्या लोकांच्या बाबतीत काही निरीक्षणांच्या आधारे या भयावह आजाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगितली जातात .


धूर्त किवा कावेबाज आजार --

१) व्यसनी व्यक्तीच्या मनात व्यसनाचे आकर्षण वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच तयार असते ..काही काळ तो एकदम चमत्कार झाल्यासारखा व्यसन बंद करू शकतो ... व त्याला स्वतःलाच असे वाटते की ..आपण पाहिजे तेव्हा बंद करू शकतो म्हणजे आपण व्यसनी झालेलो नाही ...पुन्हा कधी तरी मर्यादित प्रमाणात आपण पिऊ शकू .

२) आसपासच्या व्यसनींचे होणारे नुकसान पाहूनही .. प्रत्येक व्यक्तीला माझ्या बाबतीत अशी वेळ किवा असे नुकसान कधीच घडू शकणार नाही असे प्रामाणिक पणे वाटत राहते..मी काही तेव्हढा पीत नाही .. मी तितका मूर्ख नाही .. असे स्वतःला बजावतच तो व्यसन करत राहतो .

३) व्यसनामुळे झालेल्या नुकसानाला तो आपल्या व्यसनामुळे हे नुकसान होतेय असे न मानता जीवनातील इतर अडचणी ..समस्या ..संकटे .. दुर्घटना किवा आसपासच्या लोकांना जवाबदार धरतो ..त्यामुळे त्याच्या जीवनातील समस्यांवर व्यसन सोडणे हा काही उपाय नाही असे त्याला मनापासून वाटते .

४) जगात कोण पीत नाही ? मी प्यायलो तर त्याचा लोकांनी इतका बाऊ करण्याची काय गरज ?. मी तर फक्त व्यसन करतो ..जगात अनेक लोक माझ्यापेक्षा जास्त अप्रामाणिक आहेत ..चोऱ्या करतात ..भ्रष्टाचार करतात ..खून-दरोडे ..बलात्कार अशी पापे करतात ..त्यांच्या तुलनेत मी तर फक्त व्यसन करतो अशी व्यसनाला समर्थन देणारी विचारसरणी तयार होते . म्हणजे ' I am not as bad ' अथवा मी काही तेव्हढा वाईट नाही असे त्याला वाटते .

५) मी व्यसन करून फक्त माझेच नुकसान करतोय ..इतरांनी त्याकडे दुर्लक्ष करावे ..मी कधीच कोणाचे वाईट चिंतले नाही ..माझ्या व्यसनामुळे कोणालाच काहीच त्रास होत नाहीय ..कधी कधी भांडणे होत असतील ..नुकसान होत असेल ..मात्र त्याचे कारण व्यसन नाहीय तर परिस्थिती .. लोकांचे वर्तन ..त्यास कारणीभूत असते असे त्याचे ठाम मत बनते .

६) जगातला सगळ्यात दुर्दैवी ..फसवला गेलेला .. दुखी: ..कमनशिबी ..अन्यायग्रस्त असा व्यक्ती मी आहे असे वाटून माझ्या जीवनातील सर्व समस्या ..संकटे ..अडचणी या वर व्यसन हा एकमात्र उपाय आहे अशी त्याची श्रद्धा असते .

७) काही काळ व्यसन बंद केल्यावर ..आपले व्यसन कायमचे सुटले अशा अविर्भात तो वावरतो ..आणि व्यसन सोडले की लगेचच लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा ..व्यसनामुळे झालेले सारे नुकसान लगेच भरून निघावे .. मला पूर्वीसारखाच मन सन्मान ..पैसा ..मिळावा .. सर्व काही माझ्या मनासारखे सुरळीत घडावे असे वाटून जर तसे घडले नाही तर तो पुन्हा व्यसन सुरु करतो ..व्यसन सोडूनही काही फायदा नाही असे म्हणत राहतो .

( बाकी पुढील भागात )

३ टिप्पण्या:

 1. मी वयाच्या १४ वर्षापासून ते १९ वर्षापर्यंत खूप व्यसने केलीत . मर्यादे पेक्षाही जास्तच ! अक्षरश: माझे सर्व जवळचे मित्र वा नातेवाईकांनी सुद्धा मला दूर केले होते. पण जेव्हा मला या सर्व व्यसनेच्या गंभीर परिणामा बद्दल जाणीव झाली तेव्हापासून मी कधीच व्यसनेच्या आहारी गेलोलो नाही आणि माझ्या मनाच्या स्थिरतेमुळे वा प्रबळ मनामुळे कधी जाणार ही नाही . आता तर मला कुठल्याही प्रकारचे व्यसन नाहीत, even चहा , कॅाफी चे। ही नाही.

  उत्तर द्याहटवा
 2. SUBHASH SAO,

  वेळच्यावेळी व्यसन सोडल्याबद्दल अभिनंदन! तुमची इच्छाशक्ती अपवादात्मक रीत्या बळकट आहे. इतरांची तशी नसते.

  तशेच तरुण वयात शरीर साथ देते. जसजसे वय वाढ जाते तसतसे व्यसन सोडणे अवघड होऊन बसते.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  उत्तर द्याहटवा
 3. मन सन्मान बदल - मान सन्मान कर.

  धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा