बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

गंडे ..दोरे ...अंगठ्या ..मंत्र ..तंत्र !


एकदा व्यसनाधीनता या आजाराच्या विनाशाला सुरवात झाली की ..कधी कधी घेतो ..आजकाल सगळेच घेतात ..असे म्हणणारे कुटुंबीय सावध होतात .. व्यसनी व्यक्तीचे दिवसेंदिवस होत जाणारे नुकसान पाहून ..सर्वात आधी घराची पहिली स्त्री म्हणजे पत्नी किवा व्यासनीची आई असेल ती ..मनातल्या मनात एखाद्या देवाला नवस करते .. एखादा कडक उपास करते ..तिला भाबडीला उगाचच वाटते की घरात काही तरी देवधर्म केला तर नक्की याच्यावर देवाची कृपा होऊन याला चांगली बुद्धी मिळेल व याचे व्यसन थांबेल ..त्याचाही परिणाम होत नाही म्हंटल्यावर एखाद्या देवाच्या नावाने किवा एखाद्या बाबाने मंत्रवून दिलेला गंडा अथवा काळा दोरा व्यसनीच्या गळ्यात ..मनगटावर ..दंडाला बांधला जावू शकतो किवा एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाचा अंगारा टाकून ताईत बनवून दिला जातो .. पुढची पायरी असते ती जोतीष्याची .. कुटुंबियांच्या ग्रहांवरील संशयाला जोतिषी पुष्टी देतो ....आकाशातील ग्रह तारे आपापल्या गतीने नियमित भ्रमण करत असतात त्यापैकी एखादा उपद्रवी ग्रह याच्या पत्रिकेत ठाण मांडून बसला असावा असा निष्कर्ष काढतो ..या बाबतीत राहू.. केतू . शनी हे बदनाम आहेतच ..दशा ..महादशेचा शोध घेतला जातो आणि एखाद्या ग्रहाची अंगठी व्यसनीला घालायला सांगितली जाते ..किवा ग्रहाची शांती वगैरे करण्याचे उपाय सुचवले जातात ..


काही वेळा .त्रिपिंडी ..कालसर्पयोग ..नारायण नागबळी नावाचा विधी करायला सांगितला जातो ..हा विधी फक्त त्र्यंबकेश्वर येथेच होतो ..अनेक लोक हा विधी करतात .. माझ्या एकदोन मित्रांना त्यांच्या कुटुंबीयांनी नेले होते त्र्यंबकेश्वरला .. तिथे तीन दिवसांचा विधी करावा लागला ..कडक नियम असतात ..मुख्य म्हणजे या तीन दिवसात पूजा करणार्यांनी कोणतेही व्यसन करता कामा नये असा दंडक आहे ..मात्र माझे मित्र गुपचूप सर्वांचा डोळा चुकुवून रोज रात्री व्यसन करत गेले ..म्हणजे विधी देखील नीट झाला नाही ..तर काही तीन दिवस कसेतरी कळ काढतात .. आणि नंतर लगेच चौथ्या दिवशी व्यसन करतात ..वाट पाहतात की आता हा धार्मिक विधी केलाय त्याच्या कृपेने आपोआप व्यसन सुटेल . धार्मिकतेच्या या सर्व गोष्टी कुटुंबीय अतिशय भक्तिभावाने करतात ..मात्र ज्याच्यासाठी हे सगळे चालले असेल तो मात्र अगदी तटस्थ असतो ..त्याचा योग्य असा सहभाग नसतोच ..त्यामुळे या विधींचा फायदा होत नाही ..जर व्यसनी व्यक्तीची एखाद्या देवावर ....धर्मावर ..खरी श्रद्धा असेल तर तो कदाचित या श्रद्धेमुळे व्यसनातून बाहेर पडू शकतो ..मात्र खरी श्रद्धा न ठेवता अर्धश्रद्धा किवा अंधश्रद्धा उपयोगी ठरत नाही ..एखाद्याच्या सांगण्यावरून पंढरपूरला वारीला जावून गळ्यात तुळशीची माळ घालून व्यसन कायमचे बंद केलेली उदाहरणे मला माहित आहेत .. अगदी चमत्कार झाल्यासारखे वाटते हे ..पण त्यामागे खेळ असतो श्रद्धेचा .. अशीही उदाहरणे माहित आहेत ज्यांनी तुळशीची माळ तर घातलीय ..पण व्यसनाची ओढ इतकी जबरदस्त असते की ते लोक प्यायच्या वेळी माळ तात्पुरती बाजूला काढून ठेवतात .. 

जर कुटुंबीय विज्ञानवादी असतील तर ते आधी घरातील किवा नातलगामधील .. मोठ्या माननीय ..आदरणीय व्यक्तीला व्यसनी व्यक्तीला समजावून सांगायला लावतात .. काही काळ व्यसनी त्या व्यक्तीचा मान ठेवून लपून छपून व्यसन करतो ..नंतर नंतर तो अश्या आदरणीय व्यक्तीला टाळू लागतो .. नम्रपणे मान हलवत एका कानाने ऐकतो व लगेच दुसऱ्या कानाने सोडूनही देतो ....त्याला एखाद्या फँमिली फिजिशियन कडे नेले जाऊ शकते .. काहीदिवस दवाखान्यात दाखल केले जाते किवा औषधे दिली जातात ..याचाही परिणाम फार काळ टिकतच नाही ..वेगवेगळ्या कारणांनी यथावकाश व्यसन सुरूच राहते ..मग वर्तमान पत्रात येणाऱ्या व्यसनमुक्तीच्या विविध जाहिरातीकडे कुटुंबियांचे लक्ष जाते .. ' व्यसनीला न सांगता त्याची दारू सोडवा ' ही एक अतिशय आकर्षक जाहिरात आहे ..त्या नुसार त्या विशिष्ट व्यक्तीकडून पैसे देवून गोळ्या किवा एखादी पावडर आणली जाते ..ते औषध व्यासानीच्या जेवणातून किवा त्याच्या चहातून दिले जाते ..हे औषध म्हणजे डायसल्फीरीयम नावाच्या केमिकल पासून बनवलेले असते .. या केमिकलचा आणि अल्कोहोलचा ३६ चा आकडा मानला जातो ..म्हणजे जर हि गोळी पोटात असेल आणि त्या चोवीस तासात व्यसनीने दारूचे म्हणजेच अल्कोहोलचे सेवन केले तर त्याला प्रचंड त्रास होतो ..उलट्या होतात ..जिव घाबरतो ..रक्तदाब वाढतो ..व्यसनी घामाघूम होतो ..अगदी आपण मारतो की काय अशी त्याला भीती वाटते काही वेळ ..तर या भीतीने तो व्यसन बंद करेल अशी आशा असते ..

काही तुरळक आणि भाबडे लोक या मुळे तात्पुरते व्यसन बंद करतात ..ही गोळी व्यसन बंद असतानाही नियमित दिली गेली तर पुन्हा काही दिवसांनी तो जेव्हा व्यसन करायला जातो तेव्हा पुन्हा उलट्या ..त्रास ..मग घाबरून तो व्यसन कायमचा सोडण्याची शक्यता असते ..आणि जर त्याला समजले की घरची मंडळी जेवणातून काही औषध देत आहेत ..तर तो घरात जेवणे बंद करतो ..किवा जर एखादा हट्टी ..जिद्दी व्यसनी ती गोळी पोटात असताना ..प्रचंड त्रास सहन करतही व्यसन करत गेला तर .. हळू हळू त्या गोळीचा प्रभाव नष्ट होत जातो उलट्या होण्याचे प्रमाण घटत जाते व दारू आणि ती गोळी दोन्हीही पोटात सुखनैव नांदतात . आमच्या व्यसनी मित्रांनी तर यावरही उपाय शोधून काढला आहे ..त्या गोळी वर जर म्हणे आंबट खाल्ले तर गोळीचा प्रभाव होत नाही ..म्हणजेच सगळे मुसळ केरात ..नाशिकला हीच गोळी शरीरात बसविण्याची शस्त्रक्रिया एक महिला डॉक्टर करतात ..रोज आठवणीने गोळी देण्यापेक्षा ही शस्त्रक्रिया बरी वाटते ..सुमारे ७० ००० ते एक लाख रुपये खर्च येतो म्हणे या शस्त्रक्रियेचा ..मात्र पुन्हा तिथेही तोच नियम लागू ..न घाबरता व्यसन करत गेले तर शस्त्रक्रिया शून्य ..किवा आंबट खाल्ले तर येरे माझ्या मागल्या . या गोळीचा एक दुष्परिणाम मात्र होऊ शकतो ..एखाद्या जास्त अशक्त असलेल्या ..रक्तदाब ..हृदयविकार असलेल्या व्यसनीने ही गोळी घेतल्यावर दारू सेवन केली तर त्याच्या जीवावरही बेतू शकते ..तेव्हा असे उपचार तज्ञांच्या देखरेखी खाली केलेले बरे . मुख्य म्हणजे हे औषध फक्त अल्कोहोल बाबतच उपयुक्त ठरू शकते .. इतर मादक पदार्थांना हे लागू होत नाही .

( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा