रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

मर्डर ....? ?? ( भाग एक )


" हॅलो ..व्यसनमुक्ती आश्रम ..साहब आपल जल्दी यहाँपे आईये ..नही तो किसी का मर्डर होगा .." रवीने फोन जरा वेगळा आणि संशयास्पद वाटला म्हणून माझ्या हाती दिला ..तर फोन कट झाला ..आम्ही बुचकळ्यात पडलो ..फोन करणारी एक बाई होती असे रवी म्हणाला ..पुन्हा पाच मिनिटांनी तोच फोन आला .." आप निकाल गये क्या ? जल्दी आईये ..बहोत मारामारी हो रही है.." " आप कौन बात कर रही हो ? ..क्या हुवा जरा विस्तार से बताईये.." असे रवीने म्हणताच ..पुन्हा फोन कट झाला ..कोणतातरी बोगस फोन असावा असे मी रवीला म्हणालो ..एक दोन वेळा आम्हाला असा अनुभव आलाय ..आमच्याकडे राहून गेलेला एखादा मित्र दारू पिणे परत सुरु झाले की..आमच्यावर राग काढण्यासाठी असा खोटा फोन करून आम्हाला फोन करून सांगतो की दारू पिणाऱ्याला उपचारांसाठी दाखल करायचे आहे ..तुम्ही लौकर येवून त्याला घेवून जा ..तो स्वतःहून यायला तयार नाहीय ..." मग तो एखादा खोटा पत्ता देतो ..तेथे गेल्यावर आम्हाला समजते की बोगस फोन होता म्हणून ..तसलाच प्रकार असावा हा असे मला वाटले ..पुन्हा पाच मिनिटांनी तोच फोन " साहेब ..आप कब पहुचेंगे ? जरा जल्दी .." रवीने त्यांना पत्ता विचारला ..घाईत त्या बाईने पत्ता सांगितला ..पलीकडून खूप गोंधळ आणि आरडाओरडा एकू येत होता असे रवीने सांगितले ..काय करावे काही कळेना ..पण पलीकडच्या बाईचा आवाज खूप घाबरलेला होता ..शिवाय बायका बहुधा असा खोटा फोन करत नाहीत असा आमचा अनुभव होता .शेवटी बघू तर खरी काय भानगड आहे ते ..म्हणून आम्ही चार कार्यकर्ते घेवून निघालो ..दारुडा नागपूरचाच होता ...सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होता पत्ता सांगितलेला भाग ..आम्ही त्या भागात पोचेपर्यंत पुन्हा दोन वेळा फोन येवून गेला ...तसाच घाबरलेला आवाज ..लवकर या नाहीतर मर्डर होईल अशी घाई करणारा ..
चौकशी करत एका गल्लीत शिरलो ..समोरा समोर बैठे बंगले असलेली ती गल्ली ..गल्लीत शिरताच जाणवले ..येथे काहीतरी घडतेय ..कारण प्रत्येक बंगल्याच्या गेट बाहेर त्या बंगल्यातील माणसे उभी होती ..गाडी पुढे जाऊ लागली तशी अजून गर्दी जाणवली ..अगदी कोपर्यातल्या बंगल्याकडे सगळी गर्दी पाहत होती ..आमची गाडी दिसताच ...त्या शेवटच्या बंगल्यासमोर उभी असलेली एक प्रौढ स्त्री मोठ्याने ओरडत गाडीसमोर आली..ती रडत होती ..केस मोकळे सुटलेले ..कपाळावरचे कुंकू विस्कटलेले ..आम्ही गाडी थांबवून खाली उतरताच ..ती हात जोडू लागली ..पायाजवळ वाकू लागली .." जल्दी अंदर जाईये ..जल्दी ." .तिची घाई सुरूच होती ..बंगल्याचे गेट सताड उघडेच ..दारही उघडे ..आम्ही घाईने घरात शिरलो ..तर समोरच दिवाणावर एक तरुणी उताणी पडलेली होती ...तिचे डोळे खोबणीतून बाहेर पडल्या सारखे उघडे ..मोठ्याने श्वास घेत ..अर्धमेल्या अवस्थेत पडून होती ..तिच्याजवळ जावून आम्ही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला ..पण ती काहीच प्रतिक्रिया देईना ..तिचे डोळे ऊर्ध्व लागलेले ..तितक्यात आतल्या खोलीतून एका माणसाचा शिव्या देण्याचा आवाज ऐकू आला ..मग जमिनीवर काहीतरी आपटल्याचा आवाज ..आम्ही पळतच आतल्या खोलीत गेलो ..पाहतो तर त्या छोट्याश्या बेडरूम मध्ये ..खाली जमिनीवर रक्ताचे थारोळे ..आणि काचांचे तुकडे विखुरलेले ..दोन जणांची एकमेकांशी झटापट चाललेली ..तेथेच एक काठी पडलेली ..आम्ही ते पाहून आरडाओरडा केला ..तेव्हा त्यांची झटापट थांबली ..त्यांच्या पैकी एकाचे डोके फुटलेले असावे बहुधा ..त्याच्या डोक्यातून निघणाऱ्या रक्ताचे ओघळ त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले ..अत्यंत भेसूर चेहरा दिसत होता त्याचा ..त्या खोलीतील्या दुसऱ्या माणसाने .." इसको लेकर जावो साले को " असे आम्हाला ओरडून सांगितले .. खोलीत एकदम चारपाच जण शिरलेले पाहून तो भेसूर दिसणारा तरुण भांबावला ..त्याचा आवेश थंडावला . ..लवकर या असा फोन करणारी ती प्रौढ स्त्री बाई देखील रडत रडत त्या बेडरूम मध्ये आली " चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ येवून भेसूर दिसणाऱ्या तरूणाकडे बोट दाखवून ..याला ताबडतोब घेवून जा म्हणाली ..आम्हाला कळले की हाच व्यसनी असावा ..बेडरूम मधील कपाटाचा आरसा फुटून त्याच्या काचा सगळी कडे विखुरलेल्या आहेत हे दिसले .आम्ही चौघांनी त्याला धरले ..त्याला घेवून बाहेर आलो ..बाहेरच्या खोलीत दिवाणावर उताण्या पडलेल्या त्या तरुणी भोवती आता गर्दी जमलेली होती ..; यांना ताबडतोब दवाखान्यात न्या ..अशी सूचना देवून आम्ही बाहेर पडलो . त्या तरुणाला घेवून गाडीत बसलो .. ..त्याला गाडीत बसवतच देशी दारूचा भपकारा पसरला सगळ्या गाडीत पसरला ..तो आता शांत झाला होता ..मनातून घाबरला देखील असावा ..तो आम्हाला पोलीस समजत होता ....
सेंटरला आल्यावर ..त्या तरुणाला आधी अंघोळ घालून त्याचे कपडे बदलले ..त्याच्या कपाळाच्या वर डोक्याच्या भागात जखम झाली होती ..त्या जखमेचे ओघळ त्याच्या चेहऱ्यावर आले होते मघा.. अगदी टाके घालण्याईतकी मोठी जखम नव्हती ..मात्र खोल खोक पडली होती ..आम्ही त्याला मलमपट्टी केली ...त्याची विचारपूस सुरु केली ..हे कोणी मारले विचारले ..तर म्हणाला की मोठ्या भावाशी झटापट करताना ..माझे डोके कपाटाच्या आरशावर आपटून ..आरसा फुटला त्याची काच लागलीय डोक्याला .. काय घडले ते नीट सविस्तर सांग म्हणाल्यावर ..चूप झाला ..मग हुंदके देत रडू लागला..आता तो काही सांगण्याच्या अवस्थेत नाही हे जाणवले आम्हाला ..त्याला ग्लुकोज पाजून गुंगीचे औषध दिले ..मग तो रडत रडतच झोपला ..सुमारे तासाभराने ती प्रौढ बाई ..त्याचा मोठा भाऊ ..त्याचे कपडे घेवून सेंटरला आले ..अॅडमिशन फॉर्मवर त्यांच्या सह्या घेतल्या..नेमका काय प्रकार घडला ते भावाला विचारले ..तेव्हा भावाने सांगितले ..कि हा गेल्या दोन वर्षांपासून रोज रात्री दारू पितोय ..खूप समजावून सांगितले .पण कोणाचे ऐकत नव्हता ..म्हणून शेवटी लग्न झाले की सुधारेल असे वाटल्याने याचे लग्न करून दिले चार महिन्यापूर्वी .. मामाचीच मुलगी केली ..लग्न झाल्यावर जेमतेम आठवडाभर चांगला राहिला ..नंतर परत पिणे सुरु केले ..याच्या बायकोला याचे पिणे अजिबात आवडत नाही ..हा पिवून आला कि ती कटकट करते ..बडबड करते ..मला फसवले तुम्ही लोकांनी म्हणून आमच्याशी देखील भांडते ..ते याला सहन होत नाही . बायकोने बडबड केली ..की हा तिला एकदोन थपडा मारतो ..गप्प बस म्हणून ओरडतो ..रोजचा घरात हा तमाशा सुरु आहे ..गेल्या महिन्यापासून याने दिवसा देखील दारू पिणे सुरु केलेय .
( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा