गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

चार्ल्स शोभराज ! ( भाग २ )

चार्ल्स शोभराज ! ( भाग २ )
त्या दिवशी चौकशीला आलेले ते दोन जण माझ्याशी भांडण करून निघून गेल्यावर दोन महिने निघून गेलेले ..एके दिवशी रविला फोन आला की आम्ही आमच्या मुलाला आपल्या केंद्रात दाखल करण्यासाठी येत आहोत ..त्या नुसार त्या मुलाला दाखल केले गेले ..मी त्याच्या दाखल होण्याच्या वेळी नेमका बाहेर गेलो होतो ..नंतर मला समजले की तो हाच मुलगा आहे ज्याचे पालक माझ्याशी भांडण करून गेले होते ...साधारण तिशीचा मुलगा असेल तो ..याच्यात काय ' स्पेशल ' आहे . हे पाहण्याची उत्सुकता होतीच मला ..त्या नुसार मी त्याचे बारकाईने निरीक्षण करू लागलो ..प्रत्येक व्यसनी व्यक्ती बोलण्यात अतिशय चतुर असतो ..बुद्धिमान असतो ..आपल्या वागण्या बोलण्याने इतरांवर छाप पाडण्यात तसेच इतरांना मॅन्यूप्युलेट करण्यात हुशार असतो ..तसाच हा देखील होता ..तरतरीत ..हे गुण बहुधा सर्व व्यसनी लोकांमध्ये असतातच ..जेव्हा माझ्याशी याची ओळख झाली तेव्हा त्याने स्वतःची ओळख करून देताना इंग्रजी भाषा वापरली .. मी सावध झालो ..महाराष्ट्रात राहणारा ..इंग्रजी ही मातृभाषा नसलेला ..तसेच ज्याच्याशी आपण बोलतोय त्याचीही मातृभाषा इंग्रजी नसताना देखील... जेव्हा संभाषण इंग्रजीत सुरु केले जाते तेव्हा लक्षात येते की आपण खूप शिकलेले आहोत ..तसेच इंग्रजी चांगले बोलू शकतो ..आणि इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचा हा अट्टाहास असतो ..खरेतर ज्या लोकांना लहानपणापासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते त्यांचे इंग्रजी हे ..इतर भाषेत शिक्षण घेतलेल्या इतरांच्या तुलनेत चांगलेच असते .. हल्ली व्यवहारात इंग्रजी भाषा बोलता येणे हे जरी उत्तम मानले गेले असले तरी ..इंग्रजी बोलता न येणे हा काही कमीपणाचा मुद्दा नसतो ..मात्र तरीही अनेकांना आपल्याला इंग्रजी बोलता येते याचा उगाचच अभिमान वाटतो ..ते येता जाता गरज नसतांना इंग्रजी झाडत असतात ..त्या लोकांपैकी हा होता हे उघड झाले ..मी त्याला विचारले " तुझी मातृभाषा इंग्रजी आहे का ? " तो नाही म्हणाला .." मग सरळ हिंदीत किवा मराठीत बोल की तू .." या वर तो खजील झाला ..जेव्हा मी याच्या पालकांनी उपचारांच्या फी चे पैसे पूर्ण भरले आहेत का ? याची माहिती घेतली तेव्हा समजले की त्या लोकांनी चेक दिलेला आहे ..पंधरा दिवसातच तो ' चेक ' बँकेत वठला नाही हे समजले ..मी ताबडतोब रवीला सावध केले ..म्हणालो ' हे लोक फ्राॅड वाटतात ..इतका मोठा बडेजाव दाखवतात मात्र यांचा चेक वठत नाही यातच सर्व आले ..रवीने ताबडतोब त्यांना चेक वठला नाही हे कळवले ..यावर त्याच्या वडिलांनी .." वो अचानक बिझनेस के लिये पैसे निकालने पडे ..इसलिये बँक में बॅलन्स नाही था ..वगैरे मखलाशी केली ..नंतर त्याला भेटायला येईन तेव्हा पूर्ण पैसे भरेन असे आश्वासन दिले ..
जेव्हा ते लोक पालक सभेला व आपल्या मुलाला भेटायला आले ..तेव्हा सर्व पालक बसले आहेत त्या ठिकाणी जावून न बसता ..बाहेर ऑफिसातच थांबले ..मी त्यांना ' आत वार्डमध्ये पालक मिटिंग सुरु आहे ..पालकांसाठी काही सूचना दिल्या जात आहेत ..आपण आत जावून बसा असे सांगताच ..त्यांनी आत जाण्यास नकार दिला ..छान नटून थटून आलेल्या त्या व्यसनीच्या आईने तर चक्क कानाच्या टोकापर्यंत नाक मुरडले ..म्हणाली... हमे वहां जाने के लिये ऑकवर्ड लगता है..आप हमे यही ऑफिस में सूचना दिजीये ..उसको भी यही मिलेंगे..रवीने जास्त विषय न वाढवता ..त्यांना ऑफिसातच बसू दिले ..एक महिना उपचार घेवून डिस्चार्ज झाल्यावर त्या मुलाने रोज सकाळी ' मैत्री ' मध्ये ' डे -केअर ' करिता यायचे ..संध्यकाळी परत घरी जायचे असे ठरले ..त्याची व्यसनमुक्ती बळकट होण्यासाठी हे आवश्यक होते ..त्या दिवशी देखील त्यांनी उपचारांचे पैसे बरोबर आणलेले नव्हतेच ..शेवटी डिस्चार्ज च्या वेळी पैसे भरावे लागले त्यांना ..नंतर तो व्यसनी नियमित ' डे-केअर ' साठी येवू लागला ..तो या पूर्वी मुंबईत दोन ठिकाणी उपचारांना दाखल होता असेही समजले .. तेथून तो पळून आलेला ..आमच्याकडे मात्र आमच्याकडे रमला ..रवी बहुतेक सेंटरची बाहेरची कामे करत असे .. हा बोलायला हुशार म्हणून रवी त्याला आपल्या सोबत नेत असे ..त्यावेळी रवी कडे मोटारसायकल होती ..मोटार सायकल वर रवीच्या मागे बसून हा फिरण्याचे काम करी ..खरे तर तो सेंटरला रोज त्याची व्यसनमुक्ती बळकट करण्यासाठी येत होता ..रवी सोबत मोटार सायकल वर बसून फिरण्यात काही मोठेपणा नसतो ...परंतु आपण नेहमी सेंटरच्या संचालाकांसोबत फिरतो याचा त्याला ' अभिमान ' वाटे ..लवकरच तो आपण कोणीतरी महत्वाचे व्यक्ती आहोत असे भासवू लागला ..इतर ' स्टाफ ' शी ताठ्याने बोलू लागला .. अर्थात माझ्याशी नम्रपणे बोले ..कारण त्यानेही हे पाणी वेगळे आहे हे जोखले असावे ..एकदा त्याचे वडील रवी कडून जरा बिझनेस मध्ये अडचण आहे म्हणून उसने पंधरा हजार रुपये घेवून गेले हे मला नंतर रवी कडून समजले ..त्याच्या वडिल प्राॅपर्टी एजंट म्हणून तसेह एल आय सी एजंट म्हणून काम करत असत ..भावाचा कोणतातरी व्यवसाय होता ..भावाचे लग्न होऊन भावू वेगळा राहत होता ..तर व्यसनीचे ' लव्ह मॅरेज ' होऊन .नंतर याच्या व्यसनाधीनते मुळे ' घटस्फोट ' देखील झालेला ..सुमारे आठ महिने तो नियमित डे-केअर ला येई ..रवी सोबत फिरत असल्याने ..तो कार्यकर्त्याच्या अविर्भावातच वावरत असे ..दहा दिवसात परत देतो पैसे म्हणून त्याच्या वडिलांनी रवी कडून उसने नेलेले पैसे अजूनही परत केलेले नव्हतेच ..एकदा तो अचानक सेंटरला येईनासा झाला ..त्याच काळात समजले कि त्याने ..सेंटरच्या संबंधित एका समाजकल्याण अधिकाऱ्या कडून १२ हजार रुपये ..तुम्हाला ..स्वस्तात चारचाकी मिळवून देतो म्हणून घेतले ..आणि त्या अधिकार्याचे काम केले नाही ..पैसेही परत केले नाहीत .. चार दिवसांनी वडिलांचा फोन आला कि त्याचे पिणे सुरु झालेले आहे ..तो स्वतःहून उपचारांना यायला तयार नाहीय ..तुम्ही त्याला उचलून घेवून जा ..त्याच्या आर्थिक भानगडी समजल्या असल्याने मी रवी ला सावध केले ..आधी तुझ्याकडून उसने घेतलेले पैसे मागून घे असे संगितले ..
( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा