शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

राजकीय पालखी ( भाग एक )

राजकीय पालखी ( भाग एक )
बिलासपूरहून फोन होता ..व्यसनी व्यक्तीच्या पत्नीचा ...पतीला ब्राऊन शुगरचे व्यसन आहे ..स्वतःहून उपचारांना यायला तयार नाहीय ..त्याला तुम्ही जबरदस्तीने उचलून उपचारांना नेवू शकाल का ? ..त्यापूर्वी आम्ही महाराष्ट्रातील जवळपासच्या गावातून उपचारांना तयार नसलेल्या अनेकांना जबरदस्तीने उचलून उपचारांना आणलेले होते ..आम्ही सगळे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे व्यसनी असल्याने ..व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेची नेमकी कल्पना आम्हाला असते ..तो घरातील लोकांसाठी कितीही खतरनाक ..डेंजर वगैरे असला तरी ..बाहरेच्या ..किवा अनोळखी लोकांना घाबरून असतो ...हे आम्हाला माहित असते ..असे जबरदस्तीने उचलून आणण्याच्या वेळी ..आम्ही बहुधा व्यसनीच्या घरी मध्यरात्री अथवा पहाटेच्या वेळी पोचतो ..आधी अॅडमिशन फोर्मवर घरातील जवाबदार व्यक्तीची सही घेतली जाते ..आर्थिक बाबी पूर्ण करून ..त्याचे सामान गाडीत ठेवून ..कुटुंबियांना व्यसनी व्यक्तीला दिसणार नाहीत अशा ठिकाणी थांबायला सांगून ..मग आम्ही गाढ ..निर्धास्त झोपलेल्या व्यसनी व्यक्ती जवळ जावून त्याला उठवून ..उचलून सरळ गाडीत नेवून बसवतो ..काय घडतेय याचा विचार करण्याची देखील त्याला संधी मिळत नाही इतक्या वेगाने हे काम करावे लागते ..तो अर्धवट झोपेत असल्याने भांबावतो ...काही वेळा त्याला ओरडण्याचे देखील सुचत नाही ..तर काही वेळा मोठ्याने बोंब मारतो ..मदतीसाठी कुटुंबियांना हाका मारतो ..मात्र कोणीही पुढे यायचे नाही हे कुटुंबियांना सांगितलेले असते ..तो पूर्ण भानावर येईपर्यंत गाडी सुरु झालेली असते ..त्याचा उरला सुरला आत्मविश्वास देखील निघून जातो ..प्रतिकार करणे थांबते ..मग तो आम्हाला प्रश्न विचारतो ..कोण तुम्ही ? मला कुठे नेताय ? किडनॅप करताय का ? वगैरे ...आम्ही त्याला सरळ उत्तरे न देता ..तूच ओळख आम्ही कोण ते ..नीट आठव आपण पूर्वी कुठे भेटलोय ते ..स्मरणशक्तीला ताण दे जरा ..इतक्यात कसा विसरलास ..असे काहीतरी बोलून त्याला अजून गोंधळात टाकतो ...असाच टाईमपास करत गाडी सेंटरला पोचते ..जेव्हा त्याच्या लक्षात येते की आपल्याला फसवून ..उल्लू बनवून ..जबरदस्तीने उचलून व्यसनमुक्ती केंद्रात आणले गेलेय ..तेव्हा तो आधी स्वतःवरच प्रचंड चिडतो ..मी असा कसा उल्लू बनलो याचे त्याला वैषम्य वाटते ..हे सगळे कुटुंबियांच्या सांगण्यावरून झालेले आहे हे लक्षात येवून त्याला धक्काच बसतो ..कुटुंबीयांचा राग येतो त्याला ..आम्हाला धमक्या देतो ..मी पोलिसात तक्रार करीन ...मानव अधिकार आयोगाकडे जाईन..तुमचे केंद्र बंद पाडीन ..जेलची हवा खावी लागेल वगैरे ..हे सगळे उसने अवसान असते हे आम्ही जाणून असतो ..आम्ही बधत नाही म्हंटल्यावर मग जरा नरमतो ..मला बाहेर सोडा ..महत्वाची कामे आहेत ..माझी नोकरी जाईल कामावर नाही गेलो तर ..कुटुंबीय उपाशी मरतील माझे ..माझ्याशिवाय घरात जवाबदार कोणीच नाही ..असे पाप करू नका ..अशी गयावया करतो ..त्याचाही फायदा होत नाही हे पाहून..मी इथे अन्नपाणी ग्रहण करणार नाही ..उपोषण करीन ..स्वतःचे काहीतरी बरेवाईट करून घेईन ..तुम्ही सगळे फसाल मग कायद्याच्या कचाट्यात ..वगैरे ..त्याला वार्डात उपचार घेणारे मग समजावतात ..येथे काहीही फायदा होणार नाही कसलाच ..आम्ही असेच बोललो होतो ..मात्र आता आम्हाला समजतेय की जे चाललेय ते आपल्याच भल्यासाठी आहे ..हे चांगले लोक आहेत ..तुझी काळजी घेतील चांगली ..अशा प्रकारे हळू हळू तो थंड पडतो ..आम्हाला सहकार्य करू लागतो ..
ब्राऊन शुगरचा व्यसनी म्हणजे तब्येतीने खंगलेला असणार ..फारसा प्रतिकार करणार नाही ..सहज उचलून आणता येईल ..असा आमचा अंदाज होता ..आम्ही बिलासपुरला जाण्यास होकार दिला ..नागपूरपासून सुमारे ४५० किलोमीटर दूर जायचे होते ..जावून येवून किमान वीस तास तरी लागणार होते ..सर्वांनाच साहसाची आवड ..नवीन अनुभव घेण्याची खुमखुमी ..मध्यरात्री बिलासपुरला पोचू या हिशोबाने ..दुपारीच जेवणे करून नागपूरहून निघालो .. त्यावेळी नेमके कलकत्ता हायवे चौपदरीकरणाचे काम सुरु होते ..वाटेत अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला ..असंख्य डायव्हर्शनन्स ..ट्राफिक जाम ..असा वैतागवाणा प्रवास झाला ..बिलासपूरला पोचण्याच्या वेळेचा अंदाज चुकलाच ..मध्यरात्री ऐवजी सकाळ झालेली ..भक्क उजाडलेले ..दिलेल्या पत्त्यावर पोचलो ..एक दुमजली घर ..त्याला लागुनच दुसरे एक छोटे घर ..आम्ही व्यसनीच्या पत्नीला फोन लावला तर ती फोन उचलेना ..बहुधा व्यसनी उठला असावा ..त्याला संशय येवू नये म्हणून ती फोन उचलत नव्हती बहुतेक ..नेमके काय करावे ते कळत नव्हते ..सकाळचे साडेसह वाजलेले ..माॅर्निंग वाॅक साठी बाहेर पडलेले लोक सकाळी सकाळी गल्लीत कोण पाहुणे आलेत म्हणून कुतूहलाने आमच्याकडे पाहत होते ..एकदोन जणांनी कोण पाहिजे अशी चोकशी केली ..आम्ही अशा वेळी खरी उत्तरे देत नाही ..उगाच संवाद वाढवत नाही ..त्यामुळे ते लोक संशयाने आमच्याकडे पाहत दूर जावून उभे ..तितक्यात बाजूच्या छोट्या घरातून एक मध्यमवयीन स्त्री बाहेर आली ..नागपूरहून आलात का ? असे विचारू लागली ..आम्ही होकार देताच तिने आम्हाला तिच्या घरात बोलावले ..ते घर व्यसनीच्या मोठ्या भावाचे होते ..आम्ही येणार आहोत याची त्यांना व्यसनीच्या पत्नीने कल्पना दिलेली होती ..आम्हाला घरात बसवून मोठा भाऊ व्यसनीची माहिती सांगू लागला ..खूप हुशार आहे ..मात्र बारावी नंतर शाळा सोडली ..घरची भरपूर शेतीवाडी आहे ..व्यसनीला कुस्तीचा देखील शौक होता.. पूर्वी आखाड्यात नियमित जात असे ..तब्येत अजूनही चांगली धडधाकट आहे ..राजकारणात सक्रीय आहे ..मागील टर्म मध्ये वार्डचा नगरसेवक म्हणून निवडून आला होता ..भरपूर मित्रपरिवार आहे ..आधी दारू ..गांजा ..आणि गेल्या वर्षभरापासून ब्राऊन शुगरचे व्यसन लागलेले ..खूप मुजोर आहे .सदैव भांडायला.. हाणामारीला तत्पर असतो ...म्हणून घरचे कोणी काही बोलत नाहीत ..मोठा भावू त्याच्याच त्रासामुळे बाजूच्या घरात वेगळा रहात होता ..स्वतःहून उपचारांना तयार होणार नाही याची कुटुंबियांना खात्री ...म्हणून आम्हाला बोलावले होते ..आम्हाला पोचायला उशीर झाला होता ..व्यसनी सकाळी सहालाच उठून बाहेर जावून ब्राऊन शुगर घेवून आला होते ..आता तो बाजूच्या घरात वरच्या मजल्यावर एका मित्रासोबत ब्राऊन शुगर पीत एका खोलीत बसलेला आहे ...तो जागा आहे म्हणून त्याची पत्नी घाबरून आमचा फोन उचलत नव्हती ..अशी सविस्तर माहिती मोठ्या भावाने सांगितली ..ही सगळी माहिती आमच्या उरात धडकी भरवणारी होती ..राजकारणी ..नगरसेवक ..कुस्तीगीर ..वगैरे गोष्टी नक्कीच आनंददायी नव्हत्या ...याला उचलून नेणे खूप कठीण जाणार याचा अंदाज आला आम्हाला ..मात्र इतक्या दूर येवून खाली हात परतणे आम्हाला पसंत नव्हते ..बघू काय होईल ते पाहून घेवू ..असा धाडसी विचार आम्ही केला .
तो वरच्या खोलीत ब्राऊन शुगर पीत बसलेला आहे ..आपण जर सध्या वेशातील पोलीस असल्याचे नाटक केले तर त्याला वर जावून ब्राऊन शुगर पिताना रंगेहाथ पकडता येईल ..घाबरवता येईल ..ब्राऊन शुगर बेकायदेशीर असल्याने मोठ्या शिक्षेची तरतूद आहे कायद्यात ..नक्कीच तो घाबरेल ..वगैरे विचार केला आम्ही ..आमच्यातील दोन कार्यकर्ते राजू आणि नरेंद्र हे चांगले सहा फुटाच्या वर उंची असलेले ..तब्येतीने चांगले धडधाकट होते ..त्यांनी पोलीस बनून वरच्या मजल्यावर जायचे आणि आम्ही बाकीचे तीन जण त्याने पळून जायचा प्रयत्न केला तर त्याला पकडायला खाली थांबायचे असे ठरले ..आमच्या सगळ्यांचे केस नेहमी बारीक कापलेले असतात ..त्यामुळे नवीन माणसाला आम्ही पोलीस आहोत असे भासवणे सोपे होते ..अजून रुबाब यावा म्हणून आम्ही भावाच्या घरातून एक काठी मागून ती नरेंद्रच्या हाती दिली ..मग तय्यार झालो ..रेड मारण्यासाठी ..भावाच्या पत्नीने व्यसनीच्या घराचे गेट हळूच आवाज न करता उघडले ..आम्ही खाली उभे राहिलो ..नरेंद्र आणि राजू रुबाबात वर गेले ..सुमारे दहा मिनिटे झाली तरी काही आवाज नाही ..कसली हालचाल नाही ..वर काय चालले आहे हे कळत नव्हते ..आमच्या हृदयाची धडधड वाढलेली .
( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा