शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

चमत्कार ..! ( भाग एक )

चमत्कार ..! ( भाग एक )
२००३ सालची गोष्ट ..आधी मैत्री व्यसनमुक्ती केंद्र नागपूरपासून ३० किलोमीटर वर असलेल्या मंगरूळ गावी सुरु झालेले ..नंतर खूप दूर अंतरावर असल्याने आठ महिन्यातच तेथून सेंटरची जागा बदलून सेंटर अमरावती रोडवर भरत नगर येथे नव्या जागेत हलवलेले ... सेंटर सुरु करण्याच्या वेळी रवी पाध्येने ( संचालक ) स्थानिक पेपर मध्ये व्यसनाधीनता या आजाराबद्दल काही लेख लिहिलेले असल्याने तसेच ..नंतर मी नागपूरला गेल्यावर.. आम्ही पथनाट्ये वगैरे करून नागपूर शहरात बर्यापैकी जनजागृती केलेली होतीच ..भरतनगरला चार मोठ्या खोल्या आणि समोर प्रशस्त अंगण असलेला बंगलाच भाड्याने घेतला होता ..१२ जण उपचारांसाठी दाखल होते ..मी .आणि इतर दोन कार्यकर्ते .. ..असे तीन जण मुख्य निवासी कार्यकर्ते म्हणून सेंटरला रहात असू ..रवी दिवसभर सेंटरला थांबून रात्री जेवायला आणि झोपायला घरी जाई ..दिवसभरच्या सर्व थेरेपिज..स्वैपाक करणे ..जेवणे वाढणे ..उपचारी मित्रांची देखभाल करणे ..वगैरे कामे सगळे मिळून करत होतो ..एकदा रविला दुपारी फोन आला ..दारूचा व्यसनी असलेल्या एकाची बहिण बोलत होती फोनवर ..पेशंट कावीळ झाल्यावरही दारू न थांबवल्याने जास्त सिरीयस झाला म्हणून त्याला एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते ..मात्र कावीळ लास्ट स्टेजवर जावून जलोदर झालेला ( असायटीस ) ..हॉस्पिटल मध्ये सुमारे पंधरा दिवस राहूनही प्रकृतीत फारशी सुधारणा दिसत नव्हती ....एव्हाना सुमारे लाखभर रुपये खर्च झालेले होते कुटुंबियांचे..मध्यमवर्गीय कुटुंब ..अजून किती दिवस लागतील सुधारणेला ..तोवर किती पैसा खर्च करावा लागेल याची चिंता होतीच ..शिवाय दवाखान्यात उपचार घेत असणारा व्यसनी देखील घरी घेवून चला म्हणून हट्ट करत होता ..शेवटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कुटुंबियांना बोलावून ..हा काही वाचणार नाही ..उगाच खर्च करण्यापेक्षा याला घरी घेवून जा असे सांगितलेले ..मात्र बहिणीला आणि पत्नीला ते पटेना ..हा घरी नेल्यावर परत ताबडतोब दारू पिणार आणि लगेच मरणार अशी भीती त्यांच्या मनात होती ,,तेव्हा कोणीतरी त्यांना मैत्री बद्दल सुचवले ..घरी नेवून दारू पिण्यापेक्षा याला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले तर बरे या विचाराने बहिणीने रविला फोन केला होता ..तिने एकंदरीत परिस्थिती सांगितल्यावर ..एकदा पेशंटला पाहून तर घेवू म्हणून रवी हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेला ..
बेडवर डोळे खोल गेलेला ..हातापायाच्या काड्या आणि पोटाचा मोठा नगारा झालेला पेशंट ..पायावर सूज आलेली ..आणि त्या सुजलेल्या त्वचेतून खाजवल्या सारख्या जखमा होऊन त्यातून थोडे थोडे पाणी बाहेर येत होते..मात्र त्याचे डोळे अगदी बोलके ..रवीने केसबद्दल ताजी माहिती घेण्यासाठी डॉक्टरांची भेट घेतली ..डॉक्टरना जेव्हा समजले की याला व्यसनमुक्ती केंद्रात नेणार आहेत ..तेव्हा त्यांनी खेदाने मान हलवली ..रविला म्हणाले ..तुम्ही प्रयत्न करत आहात हरकत नाही काही ..पण हा हाती लागणे कठीणच आहे ..रवी संभ्रमात पडलेला ..तरी देखील बहिणीने खूप विनंती केली ..हा व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्त अवस्थेत मेला तरी चालेल आम्हाला ..मात्र अशा अवस्थेत घरी जावून हा दारू पिवून मेलेला आम्हाला नकोय ..तुम्ही जमेल ते प्रयत्न करा ..रविशी फोनवर बोलून तसेच प्रत्यक्ष भेट घेवून त्याच्या बहिणीची रवि वर श्रद्धा बसलेली ..शेवटी त्याला संध्यकाळी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज करून कुठे नेतोय हे न सांगता ..दोघे मित्र सेंटरला घेवून येतील असे ठरले ..सेन्टरच्या गेटसमोर ऑटो थांबली ..मी आणि रवी पुढे गेलो .ऑटोमध्ये पेशंटच्या दोन्ही बाजूला दोन जण बसलेले ..जवळ जाताच त्या दोघांच्या तोंडाचा दारूचा वास आला ..ते प्यायलेले होते ..मात्र ज्याला दाखल करायचे तो पेशंट न प्यायलेला ..माझ्या आठवणीत व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेली ही पहिली केस अशी होती की त्याला दाखल करण्यास सोबत आलेले दोघेही दारू प्यायलेले आणि ज्याला दाखल करायचे आहे तो न प्यायलेला ..मात्र गंभीर आजारी ..मला रवीने आधी केसबद्दल कल्पना दिलेली असल्याने ..मी गोड बोलून पेशंटला ऑटोतून खाली उतरवले ..इथे जरा एक दोन तपासण्या करायच्या आहेत असे सांगितले ..त्याला आमच्या हवाली करून मित्र निघून गेले ..बाकी फाॅर्मालिटीज बहिण दुसऱ्या दिवशी पूर्ण करेल असे ठरले होते .. पेशंटची शरीरयष्टी पाहून हा रात्र तरी काढेल की नाही याची आम्हाला शंकाच होती ..परंतू चालतोय ..बोलतोय म्हंटल्यावर आमची भीती थोडी कमी झालेली ..सेन्टरच्या आत मध्ये आल्यावर एकंदरीत काय प्रकार आहे हे पेशंटला समजलेच ..तो मला घरी जायचेय म्हणून मागे लागला ..नेमकी त्या दिवशी शनिवार असल्याने ..मुझिक थेरपी होती सेंटरला..आता जाऊ नंतर जाऊ करत त्याला मुझिक थेरेपीची गाणी ऐकून.. थोडे जेवण करून घरी जा असे सांगितले ..त्यावेळी ..आमच्या कडे संगीत उपचारांची माईक ..स्पीकर ..वगैरे साधने नव्हती ..तसेच कोंगो ..बोंगो ..सिंथेसायझर वगैरे नव्हता ..फक्त एक हार्मोनियम आणि एक तबला डग्गा ..त्यातही तबला वाजवणारे कोणीच नव्हते ..हार्मोनियम रवी वाजवत असे ..
मी सुरवातीलाच ' या जन्मावर या जगण्यावर.. शतदा प्रेम करावे ' हे गाणे सुरु केले ..तसे समोर खुर्चीवर बसलेल्या नवीन मित्राचे डोळे चमकले ..तो लक्षपूर्वक गाणे ऐकू लागला ..तसेच त्याने हाताने गुडघ्यावर ताल धरला हे दाखील जाणवले ..एकंदरीत गडी संगिताचा शौकीन आहे हे जाणवले ..माझे गाणे म्हणून झाल्यावर त्याने मला सुधीर फडकेंचे ' अशी पाखरे येती ..आणिक स्मृती ठेवुनी जाती ' हे गाणे येते का विचारले ..येत असल्यास गाण्याची फर्माईश केली .मला सुधीर फडके आणि अरुण दातेंची बहुतेक गाणी येत होतीच ..मी होकार देवून गाणे सुरु केले ..गडी भलताच खुशीत आला ..पुन्हा ताल धरला बोटांनी गुडघ्यावर ..मी ' देवघरातील समईमधुनी ..अजून जळती वाती ' या उंच नेलेल्या आर्त स्वरावर .." वा " अशी दाद दिली त्याने ..ते गाणे संपल्यावर ..खुर्चीवरून उठून माझ्या बाजूला झाकून ठेवलेल्या तबल्या जवळ गेला ..चवड्यावर बसून त्यावरचे कव्हर काढले ..मग मग चक्क तबला लावत असल्यासारखे तबला आणि डग्गा यावर जरा बोटे मारली .." तुम्हाला येतो का वाजवता ? " असे आम्ही विचारले ..त्याने क्षीण हसून होकारार्थी मान डोलावली ..थोड्याश्या हालचालींनी देखील त्याला थकवा आल्यासारखे झालेले दिसले ..नंतर वाजवा तुमची तब्येत बरी झाल्यावर असे सांगून त्याला पुन्हा धरून खुर्चीवर नेवून बसवले ..मग हो ना करता करता तो आमच्या सोबत सेंटरला रहायला तयार झाला ...थोडासा भात खाल्ला सगळ्यांसोबत ..त्याला डॉक्टरानी रोज सकाळ संध्याकाळ घ्यायच्या म्हणून गोळ्या लिहून दिलेल्या होत्या ..त्या सोबत होत्याच ..एका वेळचा डोस आठ गोळ्यांचा होता ..गोळी खायच्या वेळी कंटाळा आलाय मला इतक्या गोळ्या खाण्याचा असे म्हणून जीवावर आल्या सारख्या गोळ्या घेतल्या ..आणि हॉल मध्ये असलेल्या एका सोफ्यावर जावून पाय पोटाशी घेवून कुशीवर पडून राहिला ..रात्री लघवी..संडासला जायला त्याला मदत म्हणून मी सोफ्याच्या बाजूलाच माझी गादी टाकून झोपलो ..तो मध्ये मध्ये हलकेच कण्हत होता हे जाणवले ..त्याला काय होतेय हे विचारल्यावर पोटात दुखतेय असे म्हणाला ..दोन तीनवेळा त्याची हालचाल झाली तसा सावध होऊन त्याला लघवीला नेले ...मेंटल हॉस्पिटल मध्ये रहिल्याने माझी झोप खूप सावध आहे .. मेंटल हॉस्पिटल मध्ये एखादा मनोरुग्ण आपण झोपेत असताना काही खोडी करेल की काय आपली ..याची भीती असे मनात ..म्हणून झोप तेव्हापासून सावध झालेली !
( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा