रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

चार्ल्स शोभराज ( भाग पाच )


दोन महिन्यांच्या उपचार खर्चाच्या रकमेवर पाणी सोडून देण्यास तयार होऊन आम्ही त्या व्यसनीला पळून जावू देण्याचे ठरवले होते ..एव्हाना त्या कुटुंबाकडून संस्थेला एकूण किमान पन्नास हजारांचा फटका बसला होता ..ठरल्याप्रमाणे त्या दिवशी आम्ही रवी व मी दुपारीजेवणासाठी घरी गेलो त्याच्या पळून जाण्याची व्यवस्था करून ..एरवी आम्ही असे घरी जाण्याच्या वेळी कार्यकर्त्यांना ..उपचारांना कोणी नवीन दाखल होणार असेल ..कोणी पालक चौकशीला येणार असतील ..कोणाचा डिस्चार्ज ठरलेला असेल ..तर तशा व्यवस्थित सूचना देवून घरी जात असू ..तसेच सर्वांवर नीट लक्ष ठेवा ही सूचना नेहमीचीच असते ..या वेळी मात्र त्याला निर्धास्त पळून जावू द्या ..अशी सूचना देताना कसेतरीच वाटत होते ..पण नाईलाज होता ..अजून जास्त नुकसान करून घेण्याची आमची तयारी नव्हती ..तसेच माणूस बदलू शकतो नक्की... अशी सकारात्मक भमिका नेहमी घेणारे आम्ही ..या केस मध्ये ..आणि याच्या कुटुंबियांच्या बाबतीत ..हे लोक कधीच बदलणार नाहीत ..या निष्कर्षाप्रत पोचलो होतो ...संध्याकाळी आम्ही परत सेंटरला आल्यावर ..काम फत्ते झाले ..अशी कार्यकर्त्याने बातमी दिली ..आम्हाला हायसे वाटले ...!
दुसऱ्याच दिवशी आमच्या त्या स्नेह्यांचा फोन आला ..म्हणाले ' अरे ..हा तिथून निघून कसा आला ..इथे आत्ता माझ्यासमोर बसलाय ..पळून आलो म्हणतोय .." ' अहो तो आता खूप नकारात्मक झालाय ..त्याच्या सुधारणेची शक्यता धूसर झालीय ..आम्ही दुपारी जेवणासाठी घरी गेलो असताना .कार्यकर्त्याला फसवून तो पळाला असावा...आता त्याला परत जबरदस्तीने उचलून आणण्यात काही अर्थ नाही ..नाहीतरी तीन महिने उपचार घेतलेच आहेत त्याने ..पाहू कसा राहतो ते बाहेर ..प्यायला लागला तर नंतर ठरवू परत काय करायचे ते " असे सांगून आम्ही त्या स्नेह्यांचे समाधान केले . नंतर तीन महिन्यांनी ..आमच्या एका दुसऱ्या हितचिंतक मित्राचा पुण्याहून फोन आला ..म्हणाला की त्यांचे एक नातलग ..नागपूरला राहतात ..त्यांच्या कंपनीत एक खूप हुशार ..मुलगा काम करतो ..बिचारा दारूच्या व्यसनात अडकलाय म्हणे ..बिझनेस मध्ये लॉस झाला ..जवळचे पैसे संपल्यावर त्याला त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले ..आपण फसवले गेले आहोत या भावनेने बिचारा खूप निराश झालाय म्हणून .. खूप दारू पितो ..त्याला तुमच्याकडे उपचार द्या ...आम्ही होकार देवून ..त्या नातलगांना आमचा फोन नंबर दे असे सांगितले त्या पुण्याच्या मित्राला ..नंतर त्या नागपूरच्या नातलगांचा देखील आम्हाला फोन आला ..आम्ही उपचारांची सर्व माहिती दिली ..म्हणाले त्याची फॅमिली त्याच्याकडे दुर्लक्ष करतेय ..उपचारांचा खर्च आम्हीच करणार आहोत त्याच्या वगैरे .. शेवटी त्यांना कोणाला दाखल करायचे आहे हे नाव विचारले..तर त्यांनी याचेच नाव सांगितले ..आम्ही हादरलोच ..म्हणजे याने नवीन बकरा पकडला होता तर ..रवीने त्यांना सावध केले ..याच्या भानगडीत पडू नका..आणि जमले तर आधी याच्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवा ..हा एक नंबरचा फ्राॅड आहे ..आमच्या कडे तसेच इतर अनेक व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेवून झालेत याचे ..असे सांगून प्रकरण टाळले . नंतर पुन्हा तीन महिन्यांनी याचा स्वतःचाच रविला फोन आला ..सध्या व्यसनमुक्त आहे..पुण्याला एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेवून ..तेथेच कार्यकर्ता म्ह्णून काम करतोय ..संचालकांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला आहे ..वगैरे ..रवीने त्याचे अभिनंदन केले ..असाच चांगला रहा ...असे सांगितले ..रवीने जेव्हा मला हि बातमी सांगितली तेव्हा मी म्हणालो ..याने याने कापून ठेवली तरी हा सुधारतोय यावर माझा विश्वास बसने कठीण आहे ..कारण व्यसन करणे ही याची समस्या नाहीच आहे ...याची समस्या आहे संस्कारांची ..आणि टोपीबाजी ..फसवणूक ..गोड बोलून लोकांना आर्थिक फटका देणे ..ही सगळ्या कुटुंबाचीच समस्या आहे ...हे बाळकडू त्याच्या रक्तात भिनलेय.. जेव्हा किमान पाच वर्षे हा एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात कडक वातावरणात राहील ..तेव्हाच काहीतरी आशा आहे ..तोवर जुने संस्कार पुसून नवे चांगले संस्कार करणे कठीण आहे याच्यावर ..मी उगाचच संशय व्यक्त करतोय असे वाटले असावे रविला असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसले ...
नंतर चार महिन्यांनी याचा फोन आला ..जयपूर येथे आमच्या व्यसनमुक्ती केंद्राची शाखा सुरु करत आहेत ..मला तेथील प्रमुख म्हणून नेमले गेलेय ..आता जयपूरला जातोय ..खूप छान चालले आहे माझे वगैरे ..रवीने मला सांगितले सगळे ..मी नुसतेच स्मित केले ..म्हणालो '' देखते रहो ..आगे आगे होता है क्या " ..नंतर सहा महिन्यांनी हा रवीच्या घरी सकाळी सकाळी हजर ..म्हणाला त्या केंद्रातील नोकरी सोडलीय ..आता तुझी सुधारणा चांगली झालीय ..तू बाहेर नोकरी करायला हरकत नाही असे त्या केंद्राच्या संचालकांनी सांगितले ..सध्या प्राॅपर्टी ब्रोकर म्ह्णून काम सुरु केलेय रवीने त्याला शुभेच्छा दिल्या ..मी समजलो की याने तेथेही भानगडी केल्या असतील म्हणून याला काढून टाकले असावे ..नंतर दोनच महिन्यांनी एका अनोळखी स्त्रीचा फोन आला रविला ..एका व्यक्तीला उपचार द्यायचे आहेत म्हणून ..तिने याचेच नाव घेतले ..याच्या आयुष्यात ही नवीन स्त्री कोण आली स्वतःला फसवून घ्यायला हा प्रश्नच पडला आम्हाला ..रवीने थातूर मातुर कारण देवून टाळले ...आत्ता एक बातमी उडत उडत आमच्या कानावर पडलीय ..कि ज्या आमच्या स्नेह्यांनी याचा भावाला ..वाहिनीला नोकरीला ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवला ..त्या स्नेह्यांना बिझनेस मध्ये नुकसान होवून व्यवसाय डबघाईला आलाय ..म्हणून ..मला खात्री आहे ..त्यातही नक्की या कुटुंबाचा वाटा असणार ..या लोकांनी त्यानाही मोठी टोपी घातली असणार ..हे लोक जिवंत आहेत तोवर हे दुष्टचक्र सुरु रहाणार ..प्रत्येक वेळी नवीन बकरा मिळणार यांना ..
अशा वेळी ..या लोकांना लवकरात लवकर चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना करणे हेच केवळ आपल्या हाती असते !
( समाप्त )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा