मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

महागडे आॅम्लेट ( भाग तीन )


लॉज मध्ये रूम घेवून आम्ही आराम करत त्याच्या वडिलांच्या फोन ची वाट पहात होतो ..सकाळी आठ वाजता.. तो घरी आलाय मात्र एका खोलीत जावून ..दार लावून आत बसलाय असा फोन आला वडिलांचा ..वडील आम्हाला बोलावतील असा त्याला पक्का संशय होता हे सिद्ध झाले ..आम्ही ताबडतोब त्याच्या घरी पोचलो ..त्याला खोलीतून बाहेर कसे काढायचे या बद्दल आम्ही बराच खल केला ..वडिलाना दार वाजवायला सांगितले ..मात्र तो काही केल्या दार उघडायला तयार होईना..आमची गाडी त्याच्या घरी पोचली आहे हे बहुधा त्याच्या गावातील मित्राने त्याला फोन करून संगितले असणार ..तो आतूनच वडिलांना शिव्या घालू लागला ..मैत्रीच्या लोकांना परत पाठवा तरच दार उघडतो असे म्हणून लागला ..आम्ही दाराला धक्के मारले तर आतून ओरडला ..तुम्ही जास्त आग्रह केला तर मी आत फास लावून घेईन स्वतःला ..आम्ही त्याच्याशी बाहेरून बोललो ..तुला काही करत नाही कोणी ..आम्ही नेणार नाही तुला ..फक्त आमच्याशी एकदा समोरासमोर बोल तू ..मात्र तो दार उघडण्यास तयार होईना ..काय करावे काही सुचत नव्हते ..एकदा असेही वाटले की जावू दे आपण परत निघून जावू ..कारण दार उघडण्याचा जास्त आग्रह केला तर तो काही बरेवाईट करेल रूममध्ये..मात्र त्याचे वडील आम्ही त्याला घेवून जावे या बाबत खूप आग्रही दिसले ..त्याला सुरक्षित बाहेर काढण्या साठी मग आम्ही एक आयडिया केली ..मुद्दाम त्याच्या वडिलांशी त्याला ऐकू जाईल असे मोठ्याने बोललो ' अंकल जाने दिजिये ..इस बार इसे छोड देते है..अगर फिर शराब पिया या कोई गडबड की तो दुबारा आयेंगे .." बोलता बोलता आम्ही त्याच्या वडिलांना डोळा मारला ..ते समजले हे नाटक आहे म्हणून ..ते देखील मोठ्याने म्हणाले " लेकीन इसने एक बार पिना शुरू किया तो ये फिरसे अपने आप पार कंट्रोल नही रख पाता है..आप प्लीज और थोडा दर रुकीये .." पुन्हा आम्ही मोठ्याने ओरडलो " अंकल कल शाम से हम नागपुरसे निकले है..वहा मैत्री में भी हमे बहोत काम है..ऐसे इसके पीछे तो सारा दिन निकाल जायेगा ..हम जाते है " असे सांगून आमच्या पैकी दोन जण गाडीत जावून बसले ..तो आत मधून सगळा संवाद ऐकत होता आमचा ..रवीने मुद्दाम गाडी स्टार्ट केल्याचा मोठ्याने आवाज केला ..गाडी थोडी दूर नेली त्याच्या घरापासून ..आम्ही चार जण ..त्याच्या खोलीच्या मागच्या आणि पुढच्या दारांवर गुपचूप उभेच होतो ..गाडी स्टार्ट झाल्याचा मोठा आवाज ..आणि दूर जात असल्याचा आवाज ऐकून तो आत निश्चिंत झाला असावा ..त्याने हळूच खोलीचे मागचे दार उघडले ..बाहेर पडला तसे आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचे बकोट धरले ..त्याला धक्काच बसला ..आपल्याला यांनी उल्लू बनवले हे समजून चुकला तो ..मग म्हणू लागला ..सिर्फ एक बर गलती हो गई..इस बार माफ करो ..अगली बार गलती हुई तो फिर आप कहेंगे उतने दिन रहूंगा मैत्री में..त्याच्या विनवण्या कडे दुर्लक्ष करत आम्ही त्याला गाडीत बसवले ..
वाटेत आम्ही त्याची खूप फिरकी घेतली ..मुर्खा तुला जर फक्त आॅम्लेटच खायचे होते तर ..मग दारू का प्यायला ..यावर तो म्हणाला .." घरसे पैसे चुराने के बादमें मेरे मन में अपराधीपन की भावना जाग गई..बहोत डर लगने लगा..तो डर को मिटाने के लिये शराब पिया " त्याचे म्हणणे अगदी खरे होते ..प्रत्येक व्यसनी खुप भावनाप्रधान असतो ..व्यसनमुक्त राहताना जरी तो दारू पीत नसला तरी ..हे अति भावनाप्रधान असणे लवकर जात नाही..भावनिक संतुलन साध्य करण्यास वेळ लागतो ..तो कुठल्या तरी इछेच्या आहारी जावून काहीतरी चूक करतो मग त्याला पश्चाताप होतो ..अपराधीपणा वाटतो ..त्यातून पुन्हा दारू पिणे सुरु होते ..म्हणून आम्ही केंद्रात उपचार घेणाऱ्या मित्रांना नेहमी सांगत असतो की एखादी कृती करण्यापूर्वीच खूप विचार करा ..त्या कृतीचे काय काय परिणाम होऊ शकतील याचा सर्व बाजूनी विचार करा ...मगच कृती करा ..एकदा कृती करून झाली कि मग ..जर ..तर.. करून फायदा नसतो ..मग फक्त परिणामांना सामोरे जावे लागते ..त्याची आॅम्लेट खाण्याची इच्छा काही फार चुकीची नव्हती ..मात्र त्याच्या घरी ते चालत नव्हते ..अशा वेळी त्याने जर आम्हाला फोन करून सांगितले असते प्रामाणिकपणे.. तर आम्ही त्याच्या वडिलांशी बोलून त्यांना समजावले असते ..त्याला आॅम्लेट खावू द्या असे सांगितले असते ..वडिलांनी आमचे ऐकलेही असते नक्की ..समुपदेशक हा कुटुंबीय आणि व्यसनी यांच्या मधील दुवा म्हणून देखील काम करतो .. व्यसनमुक्तीचे उपचार घेवून घरी व्यसनमुक्त रहात असताना जर कुटुंबीय आणि व्यसनी यांनी वेळोवेळी काही कौटुंबिक न भावनिक समस्या उद्भवल्या असता ..एकमेकात सुसंवाद नसल्याने समुपदेशकाला मध्ये घातले तर अधिक सोपे होते काम .
नंतर त्याने पुन्हा तीन महिने उपचार घेतले आमच्याकडे ..वार्डात सगळे त्याला ' बहोत महेंगा पडा आॅम्लेट ' असे चिडवत असत ..त्याच्या उपचारांच्या दरम्यान आम्ही वडिलांना देखील समुपदेशन केले ..व्यसनमुक्त असला तरी तो अगदी सोज्वळ होईल ताबडतोब असे नसते ..त्याच्या विचारात आणि भावनिकतेत बदल होण्यास बराच वेळ लागतो .,,तुमच्या अपेक्षा त्याच्यावर न लादता सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न केला तर व्यसनमुक्ती बळकट होत जाते ..तुम्ही या पुढे हवे तर घरी अंडी आणू नका मात्र त्याला महिन्यातून एखादेवेळी बाहेर जावून आॅम्लेट खाण्यास परवानगी देण्यास हरकत नाही ..वडिलांना देखील ते पटले .. या वेळी त्याने तीन महिने उपचार घेतले ..पुन्हा एकदा सगळा आजार समजावून घेतला ..कोणत्याही समस्येचे उत्तर दारू पिणे नाही ..दारू प्यायल्याने उलट समस्या वाढते हे त्याला चांगलेच उमगले होते ..या गोष्टीला आता सहा वर्षे झाली ..तो आता छान व्यसनमुक्त रहात आहे ..वडिलांच्याच शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतोय ..लग्नही केलेय त्याने ..अधूनमधून आम्हाला फोन करून खुशाली कळवतो ..मुख्य म्हणजे आता नाॅनव्हेज खाणे बंद केलेय ..उगाच माझ्या एकट्याच्या त्या वर्तनाने कुटुंबियांना दुखः नको असे म्हणतो !
( समाप्त )

महागडे आॅम्लेट ( भाग दोन )


आमच्याकडे जबरदस्तीने उचलून आणून उपचारांना दाखल दाखल केल्यावर बहुतेकांना एकदम साक्षात्कार होतो आपल्या घरातील वाईट वर्तनाचा..दारू पिणे चांगले नाही याचा ..ते लगेचच जाहीर करतात ..आता मी दारू सोडली म्हणून ..अर्थात हे तात्पुरते असते ..व्यसनमुक्ती केंद्रातून ताबडतोब आपल्याला सोडून द्यावे म्हणून व्यसनी वेळ प्रसंग पाहून पावित्रा बदलतो ..यानेही उपचारांच्या दरम्यान आमच्याकडे स्वता:च्या चुकांची कबुली दिली ..सर्व उपचारात सामील होत ..आम्हाला चांगले सहकार्य केले .. ..समुपदेशनाच्या वेळी त्याला आम्ही विचारले त्याच्या पायलट होण्याच्या स्वप्नाबद्दल ..तुझ्या वडिलांचा पगार किती ? तसेच लहान बहिणीच्या लग्नाला येणारा संभाव्य खर्च ..त्यातून तुला पायलट करण्यासाठी लागणारा भरपूर पैसा वडील कोठून आणणार ? यावर त्याच्या कडे उत्तर तयार होते ..वडिलांच्या वाट्याला आलेली तीनचार एकर वडिलोपार्जित जमीन विकून वडिलांनी आपले स्वप्ना पूर्ण करावे असा त्याचा हट्ट दिसला ..बहुतेक व्यसनी व्यक्तींचा वडिलोपार्जित संपत्तीवर डोळा असतो ...तसेच कुटुंबाच्या संपत्तीबाबत तो अतिशय जागरूक असतो ..त्यातील आपला हिस्सा त्याच्या चांगलाच लक्षात असतो ..परंतु निसर्गाने दिलेल्या सगळ्यात किमती शरीराचे महत्व त्याला समजत नाही .. त्याला वडिलोपार्जित जमिनीशी वडिलांच्या भावना भावना कशा निगडीत असतात ..तसेच ती जमीन एखाद्या मोठ्या आजाराच्या वेळी .. आर्थिक अडचणीच्या वेळी उपयोगी येवू शकते म्हणून वडील ती विकण्यास नकार देत आहेत हे त्याच्या गळी उतरवावे लागले ..एकंदरीत सगळे समजून घेतले त्याने ..मग त्याने डी एड करणे वडिलांच्या दृष्टीकोनातून कसे व्यवहार्य आहे ..शिक्षकी पेशा कसा आदर्श आहे ..तू मुळचा हुशार आहेस उत्तम शिक्षक होऊ शकतोस याची वडिलांना खात्री आहे वगैरे ..समजावले ..त्याला सगळे पटतेय असे वाटले ..त्याचे वार्डातील वर्तन देखील चांगलेच होते ..आम्ही वार्डात आमचे गुप्तचर सोडलेले असतात ..ते गुप्तचर कार्यकर्ते ..उपचार घेणाऱ्या प्रत्येक व्यासानीचे बारकाईने निरीक्षण ( क्लिनिकल आॅब्जर्व्हेशन ) असतात ..त्यांचा देखील याच्या बाबतीत सकारात्मक अहवाल मिळाला होता म्हणून आम्ही याला एक महिना उपचार पुरेसा आहे असे ठरवून एका महिन्यांनी डिस्चार्ज दिला ..पालकांना डिस्चार्ज च्या वेळी ..याने परत काही हट्ट केला ..किवा काही गडबड केली तर आम्हाला फोन लावून द्या ..आम्ही त्याला समजावून सांगू अशी सूचना दिली ..
नंतर सुमारे तीन महिने सुरळीत गेले ..हा नोकरी साठी प्रयत्न करतोय असे समजले वडिलांकडून ..चला आता हा मार्गी लागेल असे वाटले आम्हाला ..पण कसचे काय ..चार दिवसांनी वडिलांचा दुपारी फोन आला की तो सकाळ पासून घरातून गायब आहे ..घरातून सकाळी एक हजार रुपये चोरून त्याने पोबारा केला होता ..वडिलांनी सविस्तर माहिती सांगितली फोन वर ..हा म्हणे गेल्या दोन दिवसांपासून मला ' आॅम्लेट ' खायची इच्छा आहे त्यासाठी मला पन्नास रुपये द्या म्हणून मागे लागला होता ..त्यांच्या घरी ' माळकरी ' वातावरण ..वडिलांनी त्याला स्पष्ट नकार दिला ..दारू सोडलीस तसे आता हे नॉनव्हेज खाणे देखील सोड असे बजावले ..बहुधा सर्वच व्यसनींना दारू सोबत ' नॉनव्हेज ' खाण्याची सवय असते ..अनेकदा दारू बंद असली तरी त्यांना ' नॉनव्हेज ' खायची इच्छा होऊ शकते ..यात हा देखील धोका असतो की नॉनव्हेज खाताना दारू प्यायची पण इच्छा होते ..वडिलांनी नकार दिल्यावर दोन दिवस याने कटकट केली घरी ..तेव्हा वडील याला रागावले ..त्याने पूर्वी किती त्रास दिला आहे हे त्याला सुनावले ..त्याला तो अपमान वाटला ..त्याचे डोके फिरले ..सकाळी घरातून एक हजार रुपये चोरून तो पळाला ..तासाभरात वडिलांच्या लक्षात आले चोरी झाल्याचे ..नंतर दुपारी याचा दारू पिवूनच फोन आला ..तुम्ही मला आँम्लेट खायला पैसे दिले नाहीत म्हणून मी एक हजार रुपये घरातून चोरून ..दुसऱ्या गावी मित्राकडे आलोय ..मग वडिलांना त्याने शिव्या घातल्या ..माझ्या आयुष्याचे तुम्ही वाटोळे केले वगैरे आरोप केले ..एकदा याचे पिणे सुरु झाले की याला थांबता येत नाही हे माहित होते वडिलांना ..त्यांनी आम्हाला लगेच संध्याकाळी तुम्ही निघून मागील वेळे सारखे मध्यरात्री पोचा येथे ..तोवर तो हजार रुपयांची वाट लावून ..भरपूर दारू पिवून आणि पोटभर आॅम्लेट खावून घरी आलेला असेल ..त्याला पुन्हा घेवून जा उपचारांना असे सांगितले ..खरेतर आम्ही डिस्चार्जच्या वेळीच वडिलांना सूचना दिल्या होत्या की याने काही कटकट केली तर आम्हाला कळवा ..आम्ही त्याला समजावून सांगू म्हणून ..परंतु वडिलांनी आम्हाला तो ' आॅम्लेट ' खायचा हट्ट करतोय हे कळवले नव्हते ..त्यातून पुढे हे लफडे झालेले ..आम्ही ताबडतोब संध्याकाळी निघालो ..मध्यरात्री त्याच्या घरी पोचलो तेव्हा समजले की तो अजून घरी आलेला नव्हता ..कदाचित वडिलांनी आम्हाला फोन केल्याचा त्याला अंदाज आला असावा ..कारण त्याने एकदा रात्री दहा वाजता फोन करून वडिलांना परत शिव्या घातल्या होत्या ..मैत्रीच्या लोकांना सांगू नका नाहीतर जीवे मारून टाकीन तुम्हाला अशी धमकी दिली होती त्यांना ..इतक्या लांब जावून हात हलवत परतणे आम्हाला मानवणारे नव्हते ..आता कुठेतरी मुक्काम करून त्याच्या घरी परतण्याची वाट पाहणे भाग होते ..त्या छोट्या गावात कोणतेही लॉज नव्हते ..शेवटी पहाटे तीन वाजता आम्ही तेथून जवळ असलेल्या दुसऱ्या गावी जावून तेथील लॉज मध्ये एक खोली घेतली ..तीनचार तास आराम करावा म्हणून मुक्काम केला तेथे .
( बाकी पुढील भागात )

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

महागडे आॅम्लेट ! ( भाग एक )


छत्तीसगढच्या दुर्ग शहराजवळच्या गावातून फोन होता .मुलगा २५ वर्षाचा आहे ..दारूचे व्यसन लागलेय ..कोणाचे ऐकत नाही ..त्याला उपचार घेण्याबद्दल सुचवले मात्र तयार नाहीय ..तुम्ही येवून घेवून जा जबरदस्तीने ..मात्र ..आम्ही फोन केला होता म्हणून . आमचे नाव सांगू नका त्याला नाहीतर नंतर आमचा बदला घेईल तो ..बहुतेक पालक व्यसनीच्या ..उग्र विरोधाला ..त्याच्या रागाला ..आक्रस्ताळेपणाला घाबरतात ..म्हणून असे जबरदस्तीने पालखी करून उचलून आणण्याच्या वेळी ..आमचे नाव अजिबात कळू देवू नका ..नाहीतर नंतर तो आमचा बदला घेईल..अशी भीती आवर्जून व्यक्त करतात ..आम्हाला अशा पालकांना आधी समुपदेशन करावे लागते ...तुम्ही याला घाबरणे बंद करा म्हणून ..प्रत्येक व्यसनी आपल्या व्यसनाच्या आड येणाऱ्या लोकांना आपला शत्रू समजत असतो ..आणि आपले व्यसन निर्धोक सुरु राहावे म्हणून ..घरात दादागिरी करतो ..आरडाओरडा..वस्तूंची फेकाफेक ..आत्महत्येची किवा खुनाची धमकी ." मार डालुंगा ..तोड डालुंगा ..छोडूंगा नही ..सबक सिखाउंगा " ..वगैरे भाषा करतो..सर्वसामान्य माणसे घरात तमाशा नको ..उगाच बाहेरच्या लोकांना शोभा नको ..घराण्याचे नाव बदनाम होईल या भीतीने अथवा ..हा दारू पिवून आहे याच्या कोण नादी लागणार या सुज्ञ विचाराने चूप बसतात ..आणि व्यसनीचा आतंकवाद सुरु राहतो..खरेतर पालखी करून उचलून आणताना जरी आम्ही कोणी फोन केला हे सांगितले नाही तरी त्याला वार्डात उपचार घेताना कळतेच की हे काम पालकांच्या सांगण्याने आणि संमतीनेच झालेय ...आम्ही त्याच्या पालकांना धीर दिला ..मध्यरात्री तो गाढ झोपेत असताना त्याला उचलून आणायचे असे ठरले ..त्यानुसार आम्ही पाच जण संध्याकाळी नागपूरहून निघालो ..३५० किमी जायचे होते ..मध्यरात्री पोचलो ...छोटेखानी बैठे घर होते ..घरचे सगळे लोक जागेच होते .. आवाज न करता अंधारात आमची वाट पाहत बसून होते ..हा दारुडा मस्त मधल्या खोलीत राजासारखा गाढ झोपलेला...आम्ही हे काम कसे करणार याची घरच्यांना काळजी होती ...ती चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारी ..काळजी करू नका ..तुम्ही सगळे बाजूला जा ..त्याच्या समोर येवू नका अजिबात असे त्यांना सांगितले ..आम्ही लाईट लावून त्याला उठवले ..करड्या आवाजात नाव विचारले ..एकदम असे चारपाच धिप्पाड लोक पलंगा भोवती पाहून तो घाबरलाच ..त्याला हे अनपेक्षितच असणार ..त्याने नाव सांगण्यापूर्वीच त्याला उचलले ..तो आई वडिलांच्या नावाने हाका मारू लागला ..मात्र घरातील सगळे लोक आधीच दूर जावून अंधारात त्याला दिसणार नाही असे उभे होते ..काय होतेय हे समजेपर्यंत तो गाडीत पोचला होता ..लगेच गाडी सुरु करून आम्ही निघालो ..
आम्ही नेमके कोण आहोत ..त्याच्या बालेकिल्ल्यात घुसून...त्याला उचलून कोठे घेवून चाललो आहोत या बद्दल मुद्द्दाम काहीच बोलत नव्हतो ..त्यामुळे तो अधिकच घाबरलेला .." आप हमे किडनॅप करके कहा ले जा रहे हो ? असे केविलवाणेपणाने विचारू लागला ..यावर आमचे कार्यकर्ते गमतीशीर उत्तरे देवून त्याला अजून गोंधळात टाकत होते .." आपको परमवीरचक्र मिलनेवाला है...उसी के लिये आपको दिल्ली बुलाया गया ही प्रधानमंत्री कि तरफ से " ..." आपकी दस करोड रुपये की लॉटरी लगी है " ..आप के उपर बलात्कार का इल्जाम लगा है..इसलिये इन्क्वायरी के लिये ले जा रहे है " अशी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे ऐकून तो पार ढेपाळला ..रडू लागला .." मुझे नही चाहिये परमवीरचक..नही चाहिये दस करोड..प्लीज मुझे छोड दिजीये .." अशी हात जोडून विनवणी करू लागला ..कार्यकर्ते त्याची अजून अजून मजा घेत होते .. मग अक्षरश: धाय मोकलून रडू लागला .." मुझे मार डालो ..खतम कर दो .." असे बडबडू लागला ..नंतर वाटेत .. पेशाब लगी है ..जोर की संडास आ रही है..म्हणून गाडी थांबवा अशी विनंती करू लागला ..आम्ही अशा वेळी सुरक्षित जागा पाहूनच गाडी थांबवतो ..कारण तो आरडा ओरडा करून गर्दी जमविण्याची शक्यता असते ..अगदी निर्जन जागा पाहून रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून ..त्याला धरून उतरवून ..मागून पँट पकडूनच लघवी करवली गेली..मला सोडून द्या ..तुम्हाला काय हवे ते देतो .अशी आर्जवे सुरूच होती त्याची ..सकाळी दहाला नागपूरला पोचलो ..आपल्याला जबरदस्तीने उचलून व्यसनमुक्ती केंद्रात आणले गेलेय हे समजल्यावर तो जरा मोकळा झाला ..हे लोक डाकू अथवा पोलीस नाहीत हे कळल्यावर त्याचे ओझे उतरले मनावरचे ..मग मी जास्त दारू पीत नाही ..कधी कधी पितो ..आजपासून सोडली ..असे शपथपूर्वक सांगू लागला .." प्लीज एक फोन करने दो घरको ..मेरे पिताजी बहोत बिमार है..वो चिंता में होंगे..." असे म्हणू लागला ..शेवटी त्याला समजले की येथे आर्जवे .विनंत्या ..रडणे..वगैरेचा काहीही फायदा होणार नाहीय ..तेव्हा नाईलाजाने शांत झाला ..चारपाच दिवसात उपचारात सहभागी होऊ लागला ..
दरम्यान वडिलांकडून आम्ही सगळी माहिती काढली त्याच्या बद्दल ..वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते ..एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना ..हा मोठा ..मॅट्रीक पर्यंत चांगला हुशार ..नंतर ..कॉलेजला गेल्यावर बिघडू लगला ..जेमतेम मार्कांनी बारावी झाला ..मग वडिलांनी त्याला डी.एड करवले ..त्याच काळात केव्हातरी अधून मधून दारू पिणे सुरु झालेले ..मोठी मोठी स्वप्ने पाहू लागला ..त्याचा एक मित्र बारावी करून दिल्लीला खाजगी संस्थेत पायलट होण्याचे ट्रेनिंग घेत होता ..याच्या डोक्यात ते पायलट होण्याचे वेड शिरले..डी.एड झाले तरी नोकरीसाठी प्रयत्न करेना ..दिल्लीला जावून पायलट होणार असा आग्रह करू लागला ..वडील बिचारे प्राथमिक शिक्षक ..याला खाजगी संस्थेत दाखल करून मोठी फी भरून ..होस्टेल मध्ये ठेवून.. पायलट करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते ..मला मनासारखा कोर्स करू देत नाही म्हणून याचे पिणे वाढले ..पिसाळल्यागत झाला ..रात्री बेरात्री घरी येणे ..शिवीगाळ ..आदळआपट..दावेदार असल्यासारखा वागू लागला..शेवटी वडिलांनी कोठून तरी माहिती काढून आम्हाला फोन केला होता ..वडील तसे सरळमार्गी शिक्षक असल्याने याच्या नादी लागले तर अपमान होतो ..एखादेवेळी आपल्यावर हात उचलेल ..या भीतीने चूप बसत होते इतके दिवस ..आणि याची आईला आपल्या मुलाच्या मनासारखे होत नाहीय म्हणून बिचारा दारू पितो या सहानुभूतीच्या भावनेत त्याचे हे वागणे सहन करत होती ..आम्हाला तसा तो घाबरट वाटला ..आईवडील समजतात तितका खतरनाक तर अजिबातच नव्हता ..दारू पिवून उगाच घरी उसने अवसान आणून भांडत असावा ..आमच्याकडे काही दिवसातच सुतासारखा सरळ वागू लागला ..माझी चूक झाली ...या पुढे दारू पिणार नाही ...जवाबदारीने वागेन सांगू लागला.
( बाकी पुढील भागात )

मर्डर ? ? ( भाग दोन )


ती प्रौढ स्त्री त्या व्यसनीची आई होती ..ती अतिशय कळवळून माहिती सांगत होती ..तिच्या चेहऱ्यावर अपराधी पणाचेही भाव दिसले ..व्यसनी मुलाचे तो व्यसनमुक्त होईल या आशेने आपण लग्न करून देवून मोठी चूक केल्याचे तिला उमगले होते ...सकाळपासून पिणे सुरु झाल्यावर याने कामधंदा बंद केला होता ..यांची दोन ताडीविक्री दुकाने होती .एका दुकानावर मोठा भाऊ बसे ..तर दुस-या दुकानावर हा बसत असे ..दहावी झाल्यावर पुढे शिक्षणात रस नाही म्हणून याला दुकान दुकानात बसवायला सुरवात केली होती ..लहान वयात हातात पैसे खेळू लागले ..शिवाय दुकान मालकाचा रुबाब ..अशा वेळी कुसंगत लागायला वेळ लागत नाही ..याच्या खिश्यात खुळखुळते पैसे पाहून वाईट मार्गाला लागलेले भोवती जमू लागले ..मग पार्टी ..सण..उत्सव अशा निमित्ताने दारू पिणे सुरु झाले ..आधी आठवड्या पंधरा दिवसातून एकदा प्रमाण होते ..मग ते वाढत जावून रोज रात्री वर आले ..आणि गेल्या दोन महिन्यांपासून सकाळ संध्याकाळ पिणे सुरु झालेले ..लग्न होऊन खूप स्वप्ने उराशी घेवून आलेल्या पत्नीला याचे पिणे पसंत नव्हते ..ती हा पिवून आला की भांडण करे..उणेदुणे काढे ..याला राग येवून हा तिला चूप बसवण्यासाठी मारझोड करू लागला ..त्या दिवशी सकाळी सकाळी हा पिवून आलेला पाहून ..बायकोने कटकट सुरु केली ..आरोप प्रत्यारोप सुरु झाले ..मोठा भावू घरातच होता ..पत्नी जास्त बडबड करू लागल्यावर याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली .भावाला ते सहन झाले नाही ..भावू मध्ये पडला तर हा भावावरही चाल करून गेला ..आधी शिवीगाळी..धक्काबुक्की ..मग झटापट सुरु झाली ..इकडे पत्नीची बडबड सुरूच होती ..तिला चूप बसवण्यासाठी याने तिचे तोंड दाबून धरले ..मग थांब तुझी बोलती कायमची बंद करतो म्हणून रागात तिचा गळा आवळायला सुरवात केली ..ती अर्धमेली झाली ..भावाने तिला कसेबसे याच्या तावडीतून सोडवून ..याल धरून आतल्या खोलीत नेले ..तेथेही हा सुटकेची धडपड करू लागला ..त्या आवेशात कपाटाच्या आरश्यावर डोके आपटले ..आरसा फुटला ..याच्या डोक्यात काचेचा तुकडा लागून खोल जखम झाली .. आपल्या डोक्यातून येणारे रक्त पाहून हा चिडून भावावरही चाल करून गेला ..कोपऱ्यातील घेवून भावावर धावला ..सुमारे अर्धा तासभर हे नाट्य सुरु होते ..आज नक्कीच कोणाचा तरी बळी जाणार या भांडणात हे म्हातारीला उमगले ..
पूर्वी कधीतरी तिचा एक नातलग आमच्याकडे मैत्री मध्ये दाखल होता उपचारांसाठी ..तेव्हा तिला व्यसनमुक्ती केंद्राबद्दल माहिती मिळालेली ..भविष्यात कधी गरज पडलीच तर जवळ असावा म्हणून तिने आमचा फोन नंबर जपून ठेवलेला ..या सगळ्या गडबडीत तिने घाईने आम्हाला फोन लावला होता .." बरे झाले साहेब आपण याला घेवून आले ..नाहीतर कोणाचा तरी मर्डर नक्की झाला असता " सगळ्या घराला भोगावे लागले असते ..असे म्हणत तिने आमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ..मग आता पुढे कसे या विचाराने कपाळाला हात लावून हताश बसून राहिली ..मोठा भावू निर्व्यसनी होता ..तो समजूतदार वाटला ..साहेब याला वाट्टेल तितके दिवस आपण ठेवा इथे ..मात्र पूर्ण बरा करा ..पुन्हा अजिबात दारू प्यायला नाही पाहिजे असे औषध द्या ..असे सांगू लागला आम्हाला ..आम्ही त्यांना धीर दिला ..आपण नीट उपचार करू ..तुम्ही फक्त आमच्या सूचनांचे पालक करणे आवश्यक आहे असे सांगितले ..त्यांची तशी तयारी होतीच ..तो व्यसनी संध्याकाळी झोपेतून उठल्यावर पूर्ण भानावर आलेला होता ..सकाळी आपल्या हातून काय घडलेय या जाणीवेने मनातून शरमलेला होता ..सुमारे आठवडाभर तो नुसताच उदास कोपऱ्यात बसून राही ..त्याला सर्व उपचारात सहभागी होण्यासाठी वारंवार प्रेरणा द्यावी लागली ..त्याला इकडे आणल्यावर त्याच्या पत्नीला दोन दिवस हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागले होते ..याने गळा आवळल्याने तिला बसलेला मानसिक धक्का फार मोठा होता ..दोन दिवसांनी ती भानावर आल्यावर ..तिचे वडील तिला माहेरी घेवून गेले ..हा स्वभावाने तसा साधाभोळा वाटला ..दारू प्यायला सुरवात करून जेमतेम दोन वर्षे झाली होती ..अजून पूर्णतः कसलेला..खोटारडा ..नाटकी दारुडा झालेला नव्हता ...काही दिवसातच आमच्यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला ..आमच्या सूचनांचे तंतोतंत पालन करू लागला ..उपचारांचा एक महिना पूर्ण झाल्यावर आम्ही त्याला डिस्चार्ज देण्याचे ठरवले ..मात्र त्याला ताडीच्या दुकानावर अजिबात बसू द्यायचे नाही असे कुटुंबियांना बजावले ..शक्य झाले तर काही दिवस याच्या मित्रांपासून दूर ठेवण्यासाठी तसेच पत्नी आणि याच्यात निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी ..त्याच्या मामांकडे गावी पाठवून द्या असे सांगितले ..याने देखील आम्ही आणि कुटुंबीय जे ठरवतील ते मान्य आहे असे सांगितल्यावर त्याला डिस्चार्ज केले गेले ..!
त्या नंतर सुमारे सहा महिन्यांनी तो पत्नीसह भेटायला सेंटरला आला होता ..पत्नी खुश होती खूप ..आमच्या सल्ल्यानुसार हा नागपूर सोडून हैद्राबाद येथे मामाकडेच राहू लागला होता ..तेथे यांची वडिलोपार्जित शेती होती ..त्याचा कारभार सांभाळू लागला .त्यात रमला देखील ..भेटायला आले तेव्हा त्यांच्याकडे खुशखबर होती ..लवकरच ते आई -बाबा बनणार होते ..त्यांच्या चेहऱ्याचे समाधान .आनंद पाहून आम्हालाही खूप छान वाटले ..आमच्या कामाची ही यशस्वी सांगता होती ..त्याच्याकडून आम्हाला मिळालेले सर्वात मोठे बक्षीस म्हणजे त्याची व्यसनमुक्ती ..हे बक्षीस आम्हाला पुढील वाटचालीसाठी मोठी संजीवनी होती ..फरसा शकलेला नसून देखील त्याने व्यसन आपल्यासाठी घातक आहे ..ही सहज सोपी गोष्ट आमच्याकडून शिकून घेतली होती ..जे मोठ्या मोठ्या पदवी धारकांना .अनेक उपचारात शिकता येत नाही.. ते तो केवळ एक महिन्यात शिकला होता ..या गोष्टीला आता सहा वर्षे होऊन गेली ..तो छान व्यसनमुक्त राहत आहे ..एक मुलगी आहे ..मर्डर होऊ शकतो ..या फोनचा शेवट .. " आम्हाला नवजिवन मिळाले " या वाक्याने झाला होता .
( समाप्त )

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

मर्डर ....? ?? ( भाग एक )


" हॅलो ..व्यसनमुक्ती आश्रम ..साहब आपल जल्दी यहाँपे आईये ..नही तो किसी का मर्डर होगा .." रवीने फोन जरा वेगळा आणि संशयास्पद वाटला म्हणून माझ्या हाती दिला ..तर फोन कट झाला ..आम्ही बुचकळ्यात पडलो ..फोन करणारी एक बाई होती असे रवी म्हणाला ..पुन्हा पाच मिनिटांनी तोच फोन आला .." आप निकाल गये क्या ? जल्दी आईये ..बहोत मारामारी हो रही है.." " आप कौन बात कर रही हो ? ..क्या हुवा जरा विस्तार से बताईये.." असे रवीने म्हणताच ..पुन्हा फोन कट झाला ..कोणतातरी बोगस फोन असावा असे मी रवीला म्हणालो ..एक दोन वेळा आम्हाला असा अनुभव आलाय ..आमच्याकडे राहून गेलेला एखादा मित्र दारू पिणे परत सुरु झाले की..आमच्यावर राग काढण्यासाठी असा खोटा फोन करून आम्हाला फोन करून सांगतो की दारू पिणाऱ्याला उपचारांसाठी दाखल करायचे आहे ..तुम्ही लौकर येवून त्याला घेवून जा ..तो स्वतःहून यायला तयार नाहीय ..." मग तो एखादा खोटा पत्ता देतो ..तेथे गेल्यावर आम्हाला समजते की बोगस फोन होता म्हणून ..तसलाच प्रकार असावा हा असे मला वाटले ..पुन्हा पाच मिनिटांनी तोच फोन " साहेब ..आप कब पहुचेंगे ? जरा जल्दी .." रवीने त्यांना पत्ता विचारला ..घाईत त्या बाईने पत्ता सांगितला ..पलीकडून खूप गोंधळ आणि आरडाओरडा एकू येत होता असे रवीने सांगितले ..काय करावे काही कळेना ..पण पलीकडच्या बाईचा आवाज खूप घाबरलेला होता ..शिवाय बायका बहुधा असा खोटा फोन करत नाहीत असा आमचा अनुभव होता .शेवटी बघू तर खरी काय भानगड आहे ते ..म्हणून आम्ही चार कार्यकर्ते घेवून निघालो ..दारुडा नागपूरचाच होता ...सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होता पत्ता सांगितलेला भाग ..आम्ही त्या भागात पोचेपर्यंत पुन्हा दोन वेळा फोन येवून गेला ...तसाच घाबरलेला आवाज ..लवकर या नाहीतर मर्डर होईल अशी घाई करणारा ..
चौकशी करत एका गल्लीत शिरलो ..समोरा समोर बैठे बंगले असलेली ती गल्ली ..गल्लीत शिरताच जाणवले ..येथे काहीतरी घडतेय ..कारण प्रत्येक बंगल्याच्या गेट बाहेर त्या बंगल्यातील माणसे उभी होती ..गाडी पुढे जाऊ लागली तशी अजून गर्दी जाणवली ..अगदी कोपर्यातल्या बंगल्याकडे सगळी गर्दी पाहत होती ..आमची गाडी दिसताच ...त्या शेवटच्या बंगल्यासमोर उभी असलेली एक प्रौढ स्त्री मोठ्याने ओरडत गाडीसमोर आली..ती रडत होती ..केस मोकळे सुटलेले ..कपाळावरचे कुंकू विस्कटलेले ..आम्ही गाडी थांबवून खाली उतरताच ..ती हात जोडू लागली ..पायाजवळ वाकू लागली .." जल्दी अंदर जाईये ..जल्दी ." .तिची घाई सुरूच होती ..बंगल्याचे गेट सताड उघडेच ..दारही उघडे ..आम्ही घाईने घरात शिरलो ..तर समोरच दिवाणावर एक तरुणी उताणी पडलेली होती ...तिचे डोळे खोबणीतून बाहेर पडल्या सारखे उघडे ..मोठ्याने श्वास घेत ..अर्धमेल्या अवस्थेत पडून होती ..तिच्याजवळ जावून आम्ही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला ..पण ती काहीच प्रतिक्रिया देईना ..तिचे डोळे ऊर्ध्व लागलेले ..तितक्यात आतल्या खोलीतून एका माणसाचा शिव्या देण्याचा आवाज ऐकू आला ..मग जमिनीवर काहीतरी आपटल्याचा आवाज ..आम्ही पळतच आतल्या खोलीत गेलो ..पाहतो तर त्या छोट्याश्या बेडरूम मध्ये ..खाली जमिनीवर रक्ताचे थारोळे ..आणि काचांचे तुकडे विखुरलेले ..दोन जणांची एकमेकांशी झटापट चाललेली ..तेथेच एक काठी पडलेली ..आम्ही ते पाहून आरडाओरडा केला ..तेव्हा त्यांची झटापट थांबली ..त्यांच्या पैकी एकाचे डोके फुटलेले असावे बहुधा ..त्याच्या डोक्यातून निघणाऱ्या रक्ताचे ओघळ त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले ..अत्यंत भेसूर चेहरा दिसत होता त्याचा ..त्या खोलीतील्या दुसऱ्या माणसाने .." इसको लेकर जावो साले को " असे आम्हाला ओरडून सांगितले .. खोलीत एकदम चारपाच जण शिरलेले पाहून तो भेसूर दिसणारा तरुण भांबावला ..त्याचा आवेश थंडावला . ..लवकर या असा फोन करणारी ती प्रौढ स्त्री बाई देखील रडत रडत त्या बेडरूम मध्ये आली " चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ येवून भेसूर दिसणाऱ्या तरूणाकडे बोट दाखवून ..याला ताबडतोब घेवून जा म्हणाली ..आम्हाला कळले की हाच व्यसनी असावा ..बेडरूम मधील कपाटाचा आरसा फुटून त्याच्या काचा सगळी कडे विखुरलेल्या आहेत हे दिसले .आम्ही चौघांनी त्याला धरले ..त्याला घेवून बाहेर आलो ..बाहेरच्या खोलीत दिवाणावर उताण्या पडलेल्या त्या तरुणी भोवती आता गर्दी जमलेली होती ..; यांना ताबडतोब दवाखान्यात न्या ..अशी सूचना देवून आम्ही बाहेर पडलो . त्या तरुणाला घेवून गाडीत बसलो .. ..त्याला गाडीत बसवतच देशी दारूचा भपकारा पसरला सगळ्या गाडीत पसरला ..तो आता शांत झाला होता ..मनातून घाबरला देखील असावा ..तो आम्हाला पोलीस समजत होता ....
सेंटरला आल्यावर ..त्या तरुणाला आधी अंघोळ घालून त्याचे कपडे बदलले ..त्याच्या कपाळाच्या वर डोक्याच्या भागात जखम झाली होती ..त्या जखमेचे ओघळ त्याच्या चेहऱ्यावर आले होते मघा.. अगदी टाके घालण्याईतकी मोठी जखम नव्हती ..मात्र खोल खोक पडली होती ..आम्ही त्याला मलमपट्टी केली ...त्याची विचारपूस सुरु केली ..हे कोणी मारले विचारले ..तर म्हणाला की मोठ्या भावाशी झटापट करताना ..माझे डोके कपाटाच्या आरशावर आपटून ..आरसा फुटला त्याची काच लागलीय डोक्याला .. काय घडले ते नीट सविस्तर सांग म्हणाल्यावर ..चूप झाला ..मग हुंदके देत रडू लागला..आता तो काही सांगण्याच्या अवस्थेत नाही हे जाणवले आम्हाला ..त्याला ग्लुकोज पाजून गुंगीचे औषध दिले ..मग तो रडत रडतच झोपला ..सुमारे तासाभराने ती प्रौढ बाई ..त्याचा मोठा भाऊ ..त्याचे कपडे घेवून सेंटरला आले ..अॅडमिशन फॉर्मवर त्यांच्या सह्या घेतल्या..नेमका काय प्रकार घडला ते भावाला विचारले ..तेव्हा भावाने सांगितले ..कि हा गेल्या दोन वर्षांपासून रोज रात्री दारू पितोय ..खूप समजावून सांगितले .पण कोणाचे ऐकत नव्हता ..म्हणून शेवटी लग्न झाले की सुधारेल असे वाटल्याने याचे लग्न करून दिले चार महिन्यापूर्वी .. मामाचीच मुलगी केली ..लग्न झाल्यावर जेमतेम आठवडाभर चांगला राहिला ..नंतर परत पिणे सुरु केले ..याच्या बायकोला याचे पिणे अजिबात आवडत नाही ..हा पिवून आला कि ती कटकट करते ..बडबड करते ..मला फसवले तुम्ही लोकांनी म्हणून आमच्याशी देखील भांडते ..ते याला सहन होत नाही . बायकोने बडबड केली ..की हा तिला एकदोन थपडा मारतो ..गप्प बस म्हणून ओरडतो ..रोजचा घरात हा तमाशा सुरु आहे ..गेल्या महिन्यापासून याने दिवसा देखील दारू पिणे सुरु केलेय .
( बाकी पुढील भागात )

चार्ल्स शोभराज ( भाग पाच )


दोन महिन्यांच्या उपचार खर्चाच्या रकमेवर पाणी सोडून देण्यास तयार होऊन आम्ही त्या व्यसनीला पळून जावू देण्याचे ठरवले होते ..एव्हाना त्या कुटुंबाकडून संस्थेला एकूण किमान पन्नास हजारांचा फटका बसला होता ..ठरल्याप्रमाणे त्या दिवशी आम्ही रवी व मी दुपारीजेवणासाठी घरी गेलो त्याच्या पळून जाण्याची व्यवस्था करून ..एरवी आम्ही असे घरी जाण्याच्या वेळी कार्यकर्त्यांना ..उपचारांना कोणी नवीन दाखल होणार असेल ..कोणी पालक चौकशीला येणार असतील ..कोणाचा डिस्चार्ज ठरलेला असेल ..तर तशा व्यवस्थित सूचना देवून घरी जात असू ..तसेच सर्वांवर नीट लक्ष ठेवा ही सूचना नेहमीचीच असते ..या वेळी मात्र त्याला निर्धास्त पळून जावू द्या ..अशी सूचना देताना कसेतरीच वाटत होते ..पण नाईलाज होता ..अजून जास्त नुकसान करून घेण्याची आमची तयारी नव्हती ..तसेच माणूस बदलू शकतो नक्की... अशी सकारात्मक भमिका नेहमी घेणारे आम्ही ..या केस मध्ये ..आणि याच्या कुटुंबियांच्या बाबतीत ..हे लोक कधीच बदलणार नाहीत ..या निष्कर्षाप्रत पोचलो होतो ...संध्याकाळी आम्ही परत सेंटरला आल्यावर ..काम फत्ते झाले ..अशी कार्यकर्त्याने बातमी दिली ..आम्हाला हायसे वाटले ...!
दुसऱ्याच दिवशी आमच्या त्या स्नेह्यांचा फोन आला ..म्हणाले ' अरे ..हा तिथून निघून कसा आला ..इथे आत्ता माझ्यासमोर बसलाय ..पळून आलो म्हणतोय .." ' अहो तो आता खूप नकारात्मक झालाय ..त्याच्या सुधारणेची शक्यता धूसर झालीय ..आम्ही दुपारी जेवणासाठी घरी गेलो असताना .कार्यकर्त्याला फसवून तो पळाला असावा...आता त्याला परत जबरदस्तीने उचलून आणण्यात काही अर्थ नाही ..नाहीतरी तीन महिने उपचार घेतलेच आहेत त्याने ..पाहू कसा राहतो ते बाहेर ..प्यायला लागला तर नंतर ठरवू परत काय करायचे ते " असे सांगून आम्ही त्या स्नेह्यांचे समाधान केले . नंतर तीन महिन्यांनी ..आमच्या एका दुसऱ्या हितचिंतक मित्राचा पुण्याहून फोन आला ..म्हणाला की त्यांचे एक नातलग ..नागपूरला राहतात ..त्यांच्या कंपनीत एक खूप हुशार ..मुलगा काम करतो ..बिचारा दारूच्या व्यसनात अडकलाय म्हणे ..बिझनेस मध्ये लॉस झाला ..जवळचे पैसे संपल्यावर त्याला त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले ..आपण फसवले गेले आहोत या भावनेने बिचारा खूप निराश झालाय म्हणून .. खूप दारू पितो ..त्याला तुमच्याकडे उपचार द्या ...आम्ही होकार देवून ..त्या नातलगांना आमचा फोन नंबर दे असे सांगितले त्या पुण्याच्या मित्राला ..नंतर त्या नागपूरच्या नातलगांचा देखील आम्हाला फोन आला ..आम्ही उपचारांची सर्व माहिती दिली ..म्हणाले त्याची फॅमिली त्याच्याकडे दुर्लक्ष करतेय ..उपचारांचा खर्च आम्हीच करणार आहोत त्याच्या वगैरे .. शेवटी त्यांना कोणाला दाखल करायचे आहे हे नाव विचारले..तर त्यांनी याचेच नाव सांगितले ..आम्ही हादरलोच ..म्हणजे याने नवीन बकरा पकडला होता तर ..रवीने त्यांना सावध केले ..याच्या भानगडीत पडू नका..आणि जमले तर आधी याच्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवा ..हा एक नंबरचा फ्राॅड आहे ..आमच्या कडे तसेच इतर अनेक व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेवून झालेत याचे ..असे सांगून प्रकरण टाळले . नंतर पुन्हा तीन महिन्यांनी याचा स्वतःचाच रविला फोन आला ..सध्या व्यसनमुक्त आहे..पुण्याला एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेवून ..तेथेच कार्यकर्ता म्ह्णून काम करतोय ..संचालकांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला आहे ..वगैरे ..रवीने त्याचे अभिनंदन केले ..असाच चांगला रहा ...असे सांगितले ..रवीने जेव्हा मला हि बातमी सांगितली तेव्हा मी म्हणालो ..याने याने कापून ठेवली तरी हा सुधारतोय यावर माझा विश्वास बसने कठीण आहे ..कारण व्यसन करणे ही याची समस्या नाहीच आहे ...याची समस्या आहे संस्कारांची ..आणि टोपीबाजी ..फसवणूक ..गोड बोलून लोकांना आर्थिक फटका देणे ..ही सगळ्या कुटुंबाचीच समस्या आहे ...हे बाळकडू त्याच्या रक्तात भिनलेय.. जेव्हा किमान पाच वर्षे हा एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात कडक वातावरणात राहील ..तेव्हाच काहीतरी आशा आहे ..तोवर जुने संस्कार पुसून नवे चांगले संस्कार करणे कठीण आहे याच्यावर ..मी उगाचच संशय व्यक्त करतोय असे वाटले असावे रविला असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसले ...
नंतर चार महिन्यांनी याचा फोन आला ..जयपूर येथे आमच्या व्यसनमुक्ती केंद्राची शाखा सुरु करत आहेत ..मला तेथील प्रमुख म्हणून नेमले गेलेय ..आता जयपूरला जातोय ..खूप छान चालले आहे माझे वगैरे ..रवीने मला सांगितले सगळे ..मी नुसतेच स्मित केले ..म्हणालो '' देखते रहो ..आगे आगे होता है क्या " ..नंतर सहा महिन्यांनी हा रवीच्या घरी सकाळी सकाळी हजर ..म्हणाला त्या केंद्रातील नोकरी सोडलीय ..आता तुझी सुधारणा चांगली झालीय ..तू बाहेर नोकरी करायला हरकत नाही असे त्या केंद्राच्या संचालकांनी सांगितले ..सध्या प्राॅपर्टी ब्रोकर म्ह्णून काम सुरु केलेय रवीने त्याला शुभेच्छा दिल्या ..मी समजलो की याने तेथेही भानगडी केल्या असतील म्हणून याला काढून टाकले असावे ..नंतर दोनच महिन्यांनी एका अनोळखी स्त्रीचा फोन आला रविला ..एका व्यक्तीला उपचार द्यायचे आहेत म्हणून ..तिने याचेच नाव घेतले ..याच्या आयुष्यात ही नवीन स्त्री कोण आली स्वतःला फसवून घ्यायला हा प्रश्नच पडला आम्हाला ..रवीने थातूर मातुर कारण देवून टाळले ...आत्ता एक बातमी उडत उडत आमच्या कानावर पडलीय ..कि ज्या आमच्या स्नेह्यांनी याचा भावाला ..वाहिनीला नोकरीला ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवला ..त्या स्नेह्यांना बिझनेस मध्ये नुकसान होवून व्यवसाय डबघाईला आलाय ..म्हणून ..मला खात्री आहे ..त्यातही नक्की या कुटुंबाचा वाटा असणार ..या लोकांनी त्यानाही मोठी टोपी घातली असणार ..हे लोक जिवंत आहेत तोवर हे दुष्टचक्र सुरु रहाणार ..प्रत्येक वेळी नवीन बकरा मिळणार यांना ..
अशा वेळी ..या लोकांना लवकरात लवकर चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना करणे हेच केवळ आपल्या हाती असते !
( समाप्त )

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

चार्ल्स शोभराज ( भाग चार )



दुसरे लग्न होऊन .पुन्हा घटस्फोट झाला ..आता तरी याचे आणि याच्या कुटुंबियांचे डोळे उघडतील असे वाटत होते ..मात्र तसे झाले नाही ..एकदा तर कहर असा झाला की..त्या व्यसनीच्या आईला जेव्हा रवीने सहज ..व्यसनीच्या भावाने ओव्हरड्राफ्टची सवलत घेवून बुडवलेल्या बँकेच्या भानगडी बद्दल ..नेमके काय झाले असे विचारले ..तेव्हा ती मोठी तोऱ्यात म्हणाली ..बघा ना हे बँकवाले कसे असतात .उगाचच अडकवलेय त्यांनी माझ्या मुलाला त्यात ..त्याने भले ओव्हरड्राफ्ट मागितला असेल ..त्यांनी द्यावाच का त्याला ? आता धंद्यात त्याला नुकसान झाले ..त्यात त्याचा काय दोष ? तिचे असे मुलाचे बाजू घेणे पाहून...आम्ही थक्कच झालो . सगळे कुटुंबच फ्राॅड होते एकंदरीत . नंतर मध्ये एक वर्ष गेले ..त्या काळात हा दोनतीन वेळा आमच्या सेन्टरच्या कार्यकर्त्यांना भेटला बाहेर ..मात्र पिणे सुरु होते ..एका कोणत्यातरी दुसऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचार देखील घेवून झाले एक दोनदा ..मध्ये मध्ये बातम्या ऐकायला मिळत होत्या कि आता सगळे भाड्याच्या घरात राहायला आलेत ..भावू ..वहिनी ..खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत ..हा व्यसनी आपल्या इंग्लिश बोलण्याच्या जोरावर लहान मोठ्या नोकऱ्या मार्केटिंग च्या नोकऱ्या करतो ..दोन तीन महिन्यात नोकरीत काहीतर घोटाळा करून नोकरी सोडून देतो ..पुन्हा पुन्हा पिणे सुरूच रहाते..चला त्याच्या फसवणुकीच्या तडाख्यातून आपले सेंटर तरी सुटले आता... याच समाधानात होतो आम्ही ..पण कसचे काय ..एकदा आमच्या सेंटरला वेळोवेळी आर्थिक मदत केलेल्या ..तसेच सेंटरचे हितचिंतक असणाऱ्या आमच्या स्नेह्यांचा फोन आला आम्हाला ..की मी सदर व्यक्तीला तुमच्या कडे उपचार घेण्यास पाठवतोय ..ते याच्याच बद्दल बोलत होते ..हे समजल्यावर आम्ही त्या हितचिंतकांना स्पष्ट सांगितले ...की ते सगळे फ्राॅड लोक आहेत..फी भरत नाहीत सेन्टरच्या उपचारांची ..खोटे चेक देतात वगैरे ...त्यावर स्वभावाने अतिशय दयाळू असणारे आमचे स्नेही म्हणाले ..त्यांच्या फी ची जवाबदारी मी घेतो ..तेव्हा माझ्या विनंतीला मान देवून त्याला उपचारांसाठी दाखल करून घ्या ..त्या सगळ्या कुटुंबाचीच परिस्थिती आता खूप बिघडलीय ..त्यात याचे दारू पिणे अधिकच त्रासदायक होतेय त्यांना ..सेंटरला मदत करणारे स्नेही म्हणून आम्हाला त्यांचा शब्द मोडता आला नाही ..शिवाय त्याच्या उपचारांचा खर्च करण्याची त्यांनी तयारी दर्शवली होती त्यामुळे नाईलाजाने आम्ही त्याला पुन्हा दाखल करून घेतले ..वारंवार होत असलेल्या रीलॅप्स मुळे तो पूर्ण नकारात्मक विचारसरणीचा झालेला होता ..त्याला समुपदेशन करण्याचा प्रयत्न व्यर्थच होता ..समस्या सगळ्या कुटुंबात होती ..प्रामाणिकपणे नोकरी न करता ..पैंश्याचे घोटाळे करणे..गोड बोलून लोकांकडून उसने पैसे घेवून आपल्या गरजा भागवणे ..क्लब ..उंची कपडे ..वगैरे मौजमजा इतरांच्या पैशावर करणे ..आपण सधन ..समृद्ध आहोत असा देखावा करत रहाणे ..आणि जगात मूर्ख लोक खूप आहेत ..वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांना टोप्या घालणे ..लोकांच्या चांगुलपणावर आपली चूल पेटती ठेवणे ..हा सगळ्या कुटुंबाचाच गुणधर्म बनला होता ..खरे तर त्या व्यसनी पेक्षा त्याच्या कुटुंबियांनाच समुपदेशनाची जास्त गरज होती ...
या वेळी उपचार देण्यात त्या मुलाच्या वाहिनीने पुढाकार घेतला होता म्हणे ..तिने पहिल्या महिन्याच्या फी चा नेहमी प्रमाणे चेकच दिला ..त्यांच्या लौकिकानुसार तो चेक बाउन्स झाला ..आम्ही ताबडतोब रोख पैसे भरा ..नाहीतर याला सोडून देवून असा दम दिल्यावर ..त्याच्या वाहिनीने रोख पैसे आणून दिले पहिल्या महिन्याच्या फी चे ..त्याला याला किमान सहा महिने तरी उपचार द्यावेत असे ..त्या स्नेह्यांनी सांगितले होते ..पुढे दोन महिने ..आज देतो.. उद्या देतो ..असे करत त्यांनी फी देणे टाळले ..व्यसनीला केंद्रात भेटायला येणे देखील बंद केले ..इकडे हा व्यसनी देखील मला डिस्चार्ज हवा असा रोज हट्ट करे शेवटी वैतागून आम्ही ...त्याच्या उपचारांसाठी गळ घालणाऱ्या आमच्या स्नेह्यांकडे गेलो ..त्यांना सर्व परिस्थिती सांगितली ..तेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून थक्क झालो आम्ही ..त्या स्नेह्यांचा मोठा बिझनेस होता ..त्यात त्यांनी व्यसनीच्या बँक बुडवणाऱ्या भावाला ..वाहिनीला नोकरी दिली होती म्हणे ..तसेच या व्यसनीच्या सहा महिन्यांच्या उपचारांचे पैसे ५० , ००० ( पन्नास हजार ) आगाऊ त्याच्या वडिलांकडे त्यांनी दिले होते ..मात्र त्याच्या वडिलांनी ते पैसे आम्हाला न देता मध्येच गडप केले असावेत ..हे सगळे कुटुंब फसवेगिरी करणारे आहे हे मला माहित आहे ..तरी देखील मी त्यांना मदत करतोय ..कारण मला आशा आहे कि हे सुधारतील ..मी त्याच्या आई वडील ..भावू वहिनी ,सर्वांशी बोललो आहे ..की या पुढे तुम्ही प्रामाणिक पणे वागाल तरच मी तुम्हाला मदत करीन ..यावर त्यांनी तसे कबुल केले म्हणून मी त्यांना मदत करतोय असे त्या स्नेह्यांनी आम्हाला सांगितले ..मी देईन तुम्हाला त्याच्या उपचारांचे पैसे सगळे ..असे आश्वासन त्यांनी दिले ..मग आमचा नाईलाज झाला ..याच्या वडिलांनी मुलाच्या व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी मदत म्हणून मिळालेले पैसे देखील गडप केले आहेत ..हे ऐकून माझे डोकेच फिरले ..मी रविला म्हणालो ..यार या लोकांना जो पर्यंत एखाद खट भेटून यांना जेलमध्ये पाठवत नाही तोवर कदाचित यांचे डोळे उघडणार नाहीत ..लोकांच्या चांगुलपणाचा नेहमी गैरफायदा घेतात हे लोक ..जरी उपचार खर्चाचे सगळे पैसे तुम्हाला देतो आमच्या स्नेह्यांनी सांगितले होते तरी ..त्या चांगल्या व्यक्तीला खड्यात घालणे आम्हाला प्रशस्त वाटत नव्हते ..शेवटी मी एक प्लान केला ..या व्यसनीला सेंटर मधून पळून जाण्यास मदत करण्याचा .. व्यसनमुक्ती केंद्राच्या इतिहासात झालेली ही पहिली घटना असावी ..जेथे केंद्राचे प्रमुख कार्यकर्तेच व्यसनीला केंद्रातून पळून जाण्यास मदत करणार होते ..मी माझा प्लान रविला सांगितला ..नाहीतरी याचे वडील पैसे भरणार नाहीत हे नक्की झालेय ..आपले स्नेही कितीही दयाळू असले तरी ..या लबाड कुटुंबाला मदत करण्याच्या नादात आंधळे झालेत ..त्यांच्याकडून याच्या उपचाराचा खर्च पुन्हा मागणे आपल्याला प्रशस्त वाटत नाहीय ..कारण त्यांनी सहा महिन्याच्या उपचारांचे दिलेले पैसे याच्या वडिलांनी गडप केलेत ..आता पुन्हा त्यांना भुर्दंड का द्यायचा आपण ..शिवाय तो व्यसनी देखील केंद्रात नीट शांत राहत नाहीय ..सारखा डिस्चार्ज साठी हट्ट करून डोके खातोय ..तेव्हा याला पळून जावू दिलेले बरे ..रविला पटले माझे म्हणणे ...मग आम्ही आमच्या एका निवासी कार्यकर्त्याला विश्वासात घेवून आमचा प्लान समजावून सांगितला ..दुपारी रवी आणि मी दोघे जेवणासाठी घरी जावू तेव्हा ..मुद्दाम प्रमुख गेट उघडे ठेव ..त्या व्यासानीला बाहेर बोलावून सांग ..की तुला त्याची दया आलीय ..म्हणून तू त्याला पळून जाण्यास मदत करत आहेस ..गेट उघडे आहे ..जा पटकन निघून असे म्हणून त्याला पळून जावू दे घरी .
( बाकी पुढील भागात )

चार्ल्स शोभराज ( भाग ३ )


एव्हाना आम्हाला त्या व्यसनीच्या पालकांची नियत समजली होती ..एकदा उपचारांना दाखल केल्यावर उपचाराचा खर्च देण्याची त्यांची अजिबात दानत नसते ..आपलेच पैसे त्यांना वारंवार फोन करून भिकाऱ्यासारखे मागावे लागतात हे माहित झालेले ... हे लोक देखील नागपुरातील मोठ्या हाय फाय क्लबचे मेंबर आहेत ..बाहेर यांचा मोठा बडेजाव असतो ..वगैरे माहिती मिळाली असल्याने आम्ही ..दुसऱ्या वेळी रीलॅप्स झाल्यावर त्याला घरून उचलून आणण्याच्या आधीच त्याच्या वडिलांना स्पष्ट सांगितले ..आधी रवी कडून उसने घेतलेले पंधरा हजार रुपये ..आणि या वेळच्या उपचारांच्या फी चे पैसे भरावे लागतील म्हणून ..यावर पुन्हा त्याच्या वडिलांनी रविशी गोड बोलून ..उद्या नक्की पैसे आणून देतो ..आज कसेही करून याला घेवून जा ..हा घरात आम्हाला चाकू दाखवतोय ...कोणीतरी मरेल ..अशी गयावया केली ..रविला दया आली शेवटी ..आम्ही घरी जावून त्याला उचलून आणले ..दुसऱ्या दिवशी व्हायचे तेच झाले ..त्याचे वडील काही पैसे भरण्यास आले नाहीत ..आम्ही फोन केला तर आमचा फोन उचलेनात ..रडत खडत जेमतेम अर्धे पैसे भरले उपचारांचे ..राविकडून यांनी उसने घेतलेले पैसे दिलेच नाहीत ..या वेळी देखील तो व्यसनी डे-केअर साठी सेंटरला अधून मधून येवू लागला ..भावाच्या जुन्या कार विकत घेवून त्या विकण्याच्या धंद्यात मदत करू लागला ....पाच सहा महिन्यांनी भावाच्या ऑफिस मध्ये एका मुलीशी प्रेमसंबंध जुळलेत सांगू लागला ..तिच्याशी लग्न करणार म्हणू लागला ..खरे तर किमान एक ते दोन वर्षे व्यसनमुक्त असल्याशिवाय लग्न करू नकोस असे आमचे म्हणणे पडले ..मात्र त्याचे पालक अतिशय उत्साहात..घटस्फोट झालेल्या मुलाचे पुन्हा लग्न करून देण्यासाठी आतुर ...हुरळलेले ..तो एकदा त्या मुलीला सेंटरला पण घेवून आला ..आमच्याशी ओळख करून दिली ..साधी मध्यमवर्गीय घरातील मुलगी ..याचे राहणीमान ..पालकांचा बंगला ..याच्या भावाचे पाॅश ऑफिस या गोष्टीना भुलली असावी बहुतेक ..शिवाय याचे गोड बोलणे ..छाप पडणारे व्यक्तिमत्व होतेच ..अगदी मोठ्या भपक्यात नागपूरच्या प्रसिद्ध हॉटेलच्या हाॅल मध्ये..लग्न सोहळा पार पडला त्यांचा ..आम्ही सेंटरचे सगळे कार्यकर्ते गेलो होतो ..माझ्या मनात उगाचच शंकेची पाल चुकचुकत राहिली ..त्या मुलीची काळजी वाटत राहिली मनात ..छे ..आपण उगाचच या कुटुंबाचा राग करतोय ...प्रत्येक व्यसनी व्यसनाच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करतोच ..मी देखील केले होते ..पण आता हा सुधारण्याचा प्रयत्न करतोय ..नक्कीच सगळे चांगले होईल ..आपण फालतू शंका घेतो ..असे स्वतःला समजावले ..तरीही त्याचा पालकांचा आणि त्याचाही पूर्वीचा अनुभव मला शंका घ्यायला भाग पाडत राहिला .. ?
लग्नानंतर दोन महिन्यातच याचा पत्नीचा रविला फोन आला ..याचे दारू पिणे सुरु झालेय ..तुम्ही काहीतरी मदत करा म्हणून ..त्याचे आईवडील दुर्लक्ष करतात ..तुला नवऱ्याला नीट सांभाळता येत नाही म्हणून मलाच बोलतात ..त्यांनी मलाच तुम्हाला फोन करायला सांगितलेय ..आम्ही फी बद्दल सांगितले तेव्हा म्हणाली ..याचे वडील अजिबात पैसे खर्च करायला तयार नाहीत ..मलाच करावे लागतील ..माझ्या कडे पुरेसे पैसे नाहीत आत्ता ..आहेत ते देते ..पण कृपया याला घरून घेवून जा ..तो स्वतःहून येणार नाही उपचारांना ..शेवटी या नवीन लग्न झालेल्या मुलीची दया आली आम्हाला ..असुदे कमी पैशात उपचार देवू म्हणून त्याला घेवून आलो ..एक महिना राहून तो बाहेर पडला आणि चौथ्याच दिवशी .नवी मोटार सायकल घेवून फॉलोअपला आला ..माझ्या पत्नीने नवी मोटार सायकल घेवून दिली म्हणाला मला ..त्याच्या पत्नीचा पगार फारसा नव्हता ..तसेच घरची देखील ती श्रीमंत नव्हती हे आम्हाला माहित होते ..मग समजले कि याने सगळ्यांकडे गाड्या आहेत ..माझ्याकडेच नाही ..म्हणून मला वाईट वाटते ..मग मी दारू पितो ..असे इमोशनल ब्लॅकमेल केले पत्नीला ..तिने बिचारीने डाऊनपेमेंट देवून ..बाकी पैसे स्वताच्या पगारातून हप्ते भरून फेडू म्हणून याला गाडी घेऊन दिलेली ..जेमतेम तीनचार महिने चांगला राहिला हा ..नंतर अचानक बातमी आली की याच्या भावाने कोणत्यातरी सहकारी बँकेतून ओव्हरड्रॉफ्टची सवलत घेवून मोठी रक्कम काढली ..नंतर ती रक्कम परत भरली नाही ... दिवाळखोरी दाखवली ..बँक बुडाली ..याच्या भावावर पोलीस केस झाली ..जप्ती आली ..भावाचा बंगला ..वडिलांचा बंगला विकावा लागला ...सारे जप्त झाले .. याचे पिणे सुरूच होते ...वाढलेही होते ..पुन्हा त्याच्या बायकोने गयावया केली म्हणून रवीने कमी पैश्यात उपचार देण्याची तयारी दर्शवून ..त्याला उपचार दिले ..पुन्हा दोनच महिन्यात बातमी आली की हा दारू पिवून खूप त्रास देतो ..याचे पालक पत्नीलाच दोष देतात ..तुम्ही तुमचे पहा काय ते ..तुझाच काहीतरी दोष असेल म्हणून तो दारू पितो वगैरे ..शेवटी पत्नीने घटस्फोट घेण्याचे ठरवले ..कोर्टात केस टाकली ..आम्ही कार्यकर्ते यावर चर्चा करत असताना ..आता पत्नीला पोटगी द्यावी लागेल ..हे लोक कुठून भरतील असे कार्यकर्ते बोलत होते ..तेव्हा एकंदरीत यांची प्रवृत्ती समजल्याने मी गमतीने म्हणालो ..तिने पोटगी मागू नये म्हणून हे लबाड लोक.मुलगा व्यसनी आहे ..कमावत नाही काही ..मुलगी नोकरी करतेय तेव्हा तिनेच याला दरमहा खर्चाला पैसे द्यावेत म्हणून कोर्टाला विनंती करण्यास कमी करणार नाहीत ..यावर सगळे हसले ..मग असेही समजले की याच्या वडिलांनी ज्या हॉटेल मध्ये मोठ्या भपक्यात याचे लग्न लावले ..त्या हॉटेल मालकाला दिलेला चेक देखील बाउन्स झालाय म्हणून ..ती पण केस सुरु झालीय ..घटस्फोटाच्या बाबतीतही मी गमतीने म्हणालो तेच झाले ..यांच्या परिचित वकिलाने ..हा दारुडा आहे ..कंगाल आहे .घरचे दिवाळखोर आहेत ..असे सांगून त्या मुलीनेच याला दरमहिना काही पैसे द्यावेत असा अर्ज दिला म्हणे कोर्टात ..शेवटी घाबरून त्या मुलीने मलाही देवू नका आणि मी पण देणार नाही या विचाराने पोटगीचा अर्ज मागे घेतला ..अजून पुढची कमाल म्हणजे नंतर समजले म्हणजे की कोर्टात घटस्फोटाची केस यांच्या बाजूने लढवून ..पोटगीच्या दाव्यातून यांना मुक्त करून केस जिंकून देणाऱ्या वकिलाला देखील यांनी त्याच्या फी चा खोटाच चेक दिला .
( बाकी पुढील भागात )

चार्ल्स शोभराज ! ( भाग २ )

चार्ल्स शोभराज ! ( भाग २ )
त्या दिवशी चौकशीला आलेले ते दोन जण माझ्याशी भांडण करून निघून गेल्यावर दोन महिने निघून गेलेले ..एके दिवशी रविला फोन आला की आम्ही आमच्या मुलाला आपल्या केंद्रात दाखल करण्यासाठी येत आहोत ..त्या नुसार त्या मुलाला दाखल केले गेले ..मी त्याच्या दाखल होण्याच्या वेळी नेमका बाहेर गेलो होतो ..नंतर मला समजले की तो हाच मुलगा आहे ज्याचे पालक माझ्याशी भांडण करून गेले होते ...साधारण तिशीचा मुलगा असेल तो ..याच्यात काय ' स्पेशल ' आहे . हे पाहण्याची उत्सुकता होतीच मला ..त्या नुसार मी त्याचे बारकाईने निरीक्षण करू लागलो ..प्रत्येक व्यसनी व्यक्ती बोलण्यात अतिशय चतुर असतो ..बुद्धिमान असतो ..आपल्या वागण्या बोलण्याने इतरांवर छाप पाडण्यात तसेच इतरांना मॅन्यूप्युलेट करण्यात हुशार असतो ..तसाच हा देखील होता ..तरतरीत ..हे गुण बहुधा सर्व व्यसनी लोकांमध्ये असतातच ..जेव्हा माझ्याशी याची ओळख झाली तेव्हा त्याने स्वतःची ओळख करून देताना इंग्रजी भाषा वापरली .. मी सावध झालो ..महाराष्ट्रात राहणारा ..इंग्रजी ही मातृभाषा नसलेला ..तसेच ज्याच्याशी आपण बोलतोय त्याचीही मातृभाषा इंग्रजी नसताना देखील... जेव्हा संभाषण इंग्रजीत सुरु केले जाते तेव्हा लक्षात येते की आपण खूप शिकलेले आहोत ..तसेच इंग्रजी चांगले बोलू शकतो ..आणि इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचा हा अट्टाहास असतो ..खरेतर ज्या लोकांना लहानपणापासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते त्यांचे इंग्रजी हे ..इतर भाषेत शिक्षण घेतलेल्या इतरांच्या तुलनेत चांगलेच असते .. हल्ली व्यवहारात इंग्रजी भाषा बोलता येणे हे जरी उत्तम मानले गेले असले तरी ..इंग्रजी बोलता न येणे हा काही कमीपणाचा मुद्दा नसतो ..मात्र तरीही अनेकांना आपल्याला इंग्रजी बोलता येते याचा उगाचच अभिमान वाटतो ..ते येता जाता गरज नसतांना इंग्रजी झाडत असतात ..त्या लोकांपैकी हा होता हे उघड झाले ..मी त्याला विचारले " तुझी मातृभाषा इंग्रजी आहे का ? " तो नाही म्हणाला .." मग सरळ हिंदीत किवा मराठीत बोल की तू .." या वर तो खजील झाला ..जेव्हा मी याच्या पालकांनी उपचारांच्या फी चे पैसे पूर्ण भरले आहेत का ? याची माहिती घेतली तेव्हा समजले की त्या लोकांनी चेक दिलेला आहे ..पंधरा दिवसातच तो ' चेक ' बँकेत वठला नाही हे समजले ..मी ताबडतोब रवीला सावध केले ..म्हणालो ' हे लोक फ्राॅड वाटतात ..इतका मोठा बडेजाव दाखवतात मात्र यांचा चेक वठत नाही यातच सर्व आले ..रवीने ताबडतोब त्यांना चेक वठला नाही हे कळवले ..यावर त्याच्या वडिलांनी .." वो अचानक बिझनेस के लिये पैसे निकालने पडे ..इसलिये बँक में बॅलन्स नाही था ..वगैरे मखलाशी केली ..नंतर त्याला भेटायला येईन तेव्हा पूर्ण पैसे भरेन असे आश्वासन दिले ..
जेव्हा ते लोक पालक सभेला व आपल्या मुलाला भेटायला आले ..तेव्हा सर्व पालक बसले आहेत त्या ठिकाणी जावून न बसता ..बाहेर ऑफिसातच थांबले ..मी त्यांना ' आत वार्डमध्ये पालक मिटिंग सुरु आहे ..पालकांसाठी काही सूचना दिल्या जात आहेत ..आपण आत जावून बसा असे सांगताच ..त्यांनी आत जाण्यास नकार दिला ..छान नटून थटून आलेल्या त्या व्यसनीच्या आईने तर चक्क कानाच्या टोकापर्यंत नाक मुरडले ..म्हणाली... हमे वहां जाने के लिये ऑकवर्ड लगता है..आप हमे यही ऑफिस में सूचना दिजीये ..उसको भी यही मिलेंगे..रवीने जास्त विषय न वाढवता ..त्यांना ऑफिसातच बसू दिले ..एक महिना उपचार घेवून डिस्चार्ज झाल्यावर त्या मुलाने रोज सकाळी ' मैत्री ' मध्ये ' डे -केअर ' करिता यायचे ..संध्यकाळी परत घरी जायचे असे ठरले ..त्याची व्यसनमुक्ती बळकट होण्यासाठी हे आवश्यक होते ..त्या दिवशी देखील त्यांनी उपचारांचे पैसे बरोबर आणलेले नव्हतेच ..शेवटी डिस्चार्ज च्या वेळी पैसे भरावे लागले त्यांना ..नंतर तो व्यसनी नियमित ' डे-केअर ' साठी येवू लागला ..तो या पूर्वी मुंबईत दोन ठिकाणी उपचारांना दाखल होता असेही समजले .. तेथून तो पळून आलेला ..आमच्याकडे मात्र आमच्याकडे रमला ..रवी बहुतेक सेंटरची बाहेरची कामे करत असे .. हा बोलायला हुशार म्हणून रवी त्याला आपल्या सोबत नेत असे ..त्यावेळी रवी कडे मोटारसायकल होती ..मोटार सायकल वर रवीच्या मागे बसून हा फिरण्याचे काम करी ..खरे तर तो सेंटरला रोज त्याची व्यसनमुक्ती बळकट करण्यासाठी येत होता ..रवी सोबत मोटार सायकल वर बसून फिरण्यात काही मोठेपणा नसतो ...परंतु आपण नेहमी सेंटरच्या संचालाकांसोबत फिरतो याचा त्याला ' अभिमान ' वाटे ..लवकरच तो आपण कोणीतरी महत्वाचे व्यक्ती आहोत असे भासवू लागला ..इतर ' स्टाफ ' शी ताठ्याने बोलू लागला .. अर्थात माझ्याशी नम्रपणे बोले ..कारण त्यानेही हे पाणी वेगळे आहे हे जोखले असावे ..एकदा त्याचे वडील रवी कडून जरा बिझनेस मध्ये अडचण आहे म्हणून उसने पंधरा हजार रुपये घेवून गेले हे मला नंतर रवी कडून समजले ..त्याच्या वडिल प्राॅपर्टी एजंट म्हणून तसेह एल आय सी एजंट म्हणून काम करत असत ..भावाचा कोणतातरी व्यवसाय होता ..भावाचे लग्न होऊन भावू वेगळा राहत होता ..तर व्यसनीचे ' लव्ह मॅरेज ' होऊन .नंतर याच्या व्यसनाधीनते मुळे ' घटस्फोट ' देखील झालेला ..सुमारे आठ महिने तो नियमित डे-केअर ला येई ..रवी सोबत फिरत असल्याने ..तो कार्यकर्त्याच्या अविर्भावातच वावरत असे ..दहा दिवसात परत देतो पैसे म्हणून त्याच्या वडिलांनी रवी कडून उसने नेलेले पैसे अजूनही परत केलेले नव्हतेच ..एकदा तो अचानक सेंटरला येईनासा झाला ..त्याच काळात समजले कि त्याने ..सेंटरच्या संबंधित एका समाजकल्याण अधिकाऱ्या कडून १२ हजार रुपये ..तुम्हाला ..स्वस्तात चारचाकी मिळवून देतो म्हणून घेतले ..आणि त्या अधिकार्याचे काम केले नाही ..पैसेही परत केले नाहीत .. चार दिवसांनी वडिलांचा फोन आला कि त्याचे पिणे सुरु झालेले आहे ..तो स्वतःहून उपचारांना यायला तयार नाहीय ..तुम्ही त्याला उचलून घेवून जा ..त्याच्या आर्थिक भानगडी समजल्या असल्याने मी रवी ला सावध केले ..आधी तुझ्याकडून उसने घेतलेले पैसे मागून घे असे संगितले ..
( बाकी पुढील भागात )

खानदानी चार्ल्स शोभराज ! ( भाग एक )

खानदानी चार्ल्स शोभराज ! ( भाग एक )
भरतनगरला सेंटर होते ..मी त्यावेळी तेथे निवासी कर्मचारी म्हणून काम करत होतो ..सुमारे २० जण उपचारांसाठी दाखल होते ...एकदा संध्याकाळी दोन जण चौकशीला आले ..इथे प्रमुख कोण आहे हे विचारू लागली ..रवी बाहेर गेलेला होता ..सर्व जवाबदारी माझ्यावरच होती ..मी सेंटरच्या आत राहत असताना बहुधा बर्म्युडा व टी शर्ट अथवा बनियन वर वावरत असे ..कारण अगदी स्वैपाक घरापासून ते समूह उपचार घेणे पर्यंत अश्या सर्वच पातळीवर काम करावे लागत असे...त्या दिवशी मी बनियन आणि बर्म्युडा घालून अंगणात बसलो होतो ..चौकशीला आलेले लोक गेट जवळ दिसले तसे मी पुढे होऊन दार उघडले ..प्रमुख कोण आहे हे त्यांनी विचारल्यावर ..मी सांगितले ..संचालक रवी पाध्ये सध्या बाहेर गेलेले आहेत..त्यांच्या अनुपस्थितीत मी इथला सगळा कारभार पाहतो ..आपल्याला हवी ती माहिती मी नक्की देवू शकेन ..माझा अवतार पाहून त्यांचा चेहरा पडलेला दिसला ..माझ्या गळ्यात किचन ..व इतर सर्व चाव्यांचा जुडगा एका साखळीत लावून अडकवलेला होता ..मी त्यांना ऑफिस मध्ये घेवून आलो .." बोला ..काय माहिती हवी होती ? ".... " एका व्यसनीला येथे उपचारांसाठी दाखल करायचे आहे..दारूचे व्यसन आहे .." त्यांच्या पैकी एक जण म्हणाला ..यावर मी त्यांना व्यसनाधीनता एक मनो - शारीरिक आजार कसा आहे ..आमच्याकडे उपचार घेणाऱ्या मित्रांसाठी ..योग ..प्राणायाम ..समूह उपचार ..व्यक्तिगत समुपदेशन वगैरे एक वेळापत्रक कसे आहे .. कसे समुपदेशन केले जाते ...उपचार खर्च काय असतो ..वगैरे माहिती दिली ..त्यावर व्यसनीचे वडील म्हणाले ..माझ्या मुलाला येथे दाखल करायचे आहे ..मात्र तो खूप हुशार आहे ..येथून पळून जाणार नाही याची तुम्ही खात्री देवू शकाल का ? ..यावर मी त्यांना ..आम्ही सगळे कार्यकर्ते कसे पूर्वाश्रमीचे व्यसनी होतो ...कसे खोटारडे होतो ..विश्वासघातकी होतो ..वगैरे सांगून ..आम्ही त्याच्यावर बारीक लक्ष ठेवू अशी त्यांना खात्री दिली ..ते म्हणाले ..तुम्ही फक्त येथून तो येथून पळून जाणार नाही या कडे लक्ष ठेवा ...बाकी समुपदेशन वगैरे नाही केले तरी चालेल ..तसेच त्याची येथे राहण्या जेवण्याची सगळी चांगली व्यवस्था झाली पाहिजे ..त्याल स्पेशल रूम असेल तर द्या ..आम्ही देवू काय लागतील ते पैसे ..दोघांच्याही बोलण्यातून अहंकार स्पष्ट दिसत होता ..त्या पैकी एक जण नागपूरच्या अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसचा सदस्य आहे हे समजले ..तोच घेवून आला होता व्यसनीच्या पालकांना ..मी ए. ए . चा सदस्य आहे हे त्याने सांगितल्यावर .. म्हणालो ..मग तुम्हाला तर सगळी माहितीच आहे या आजाराबद्दल ..त्याचा अहंकार सुखावल्या सारखा वाटला ..मात्र तो पुढे जे बोलला त्याने माझी सटकली ..
तो म्हणाला ..मला माहित आहेत सगळी व्यसनमुक्ती केंद्रे काय काम करतात ते ..आम्ही जो व्यसनी येथे आणणार आहोत तो स्पेशल आहे ..तुमच्या आवाक्यातील नाही ..त्याला समुपदेशन वगैरेचे काम तुम्ही नका करू ..ते काम आम्ही करू ..त्याचे बोलणे ऐकून मी दुखावलो ..त्याने व्यसनीचा ' स्पेशल ' असा उल्लेख करून ..अल्कोहोलिक्स अॅनानिमसच्या मूळ तत्वाशीच प्रतारणा केली होती .." अहो ' व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्व ' हे अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसचे एक प्रमुख तत्व मानले जाते .व्यसनी व्यक्ती कोणत्या जाती-धर्माचा आहे . किती शिकलेला आहे ..किती बुद्धिमान आहे ..त्याचे कौटुंबिक व सामाजिक स्थान काय आहे वगैरे बाबी ए . ए .मध्ये गौण मानल्या जातात ..तो केवळ एक व्यसनी आहे ..आजारी आहे ..त्याला सुधारणेचे गरज आहे ..भावनिक दृष्ट्या कमकुवत आहे ..त्याच्या व्यक्तीमत्वात असलेल्या काही दोषांमुळेच तो व्यसनी झालाय ..तसेच व्यसनामुळे देखील त्याच्यात अनेक स्वभावदोष निर्माण होऊन ..तो दांभिक ..ढोंगी .खोटारडा ..अहंकारी ..अप्रामाणिक बनतो ..याच दृष्टीकोनातून त्याच्याकडे पहिले तरच तुम्ही त्याला चांगली मदत करू शकाल " असे मी सांगू लागताच तो ए . ए . सदस्य म्हणाला ..ही सगळी फालतुगिरी तू मला शिकवू नकोस ..मी तुझ्या पेक्षा जास्त सिनियर आहे ..त्या व्यसनीचे वडील देखील त्या ए . ए . सदस्याची री ओढत म्हणाले ..माझ्या मुलात काही स्वभावदोष वगैरे नाहीत ..आम्ही श्रीमंत व खानदानी लोक आहोत ..तू माझ्या मुलाचे डीग्रेडेशन करतो आहेस ..अचानक मला जाणवले की या अनोळखी लोकांशी मी आदराने अहो -जाहो असे संबोधून बोलत होतो ..ते दोघेही मात्र मला ऐकेरी संबोधत होते ..माझ्याशी कोणातरी ' रामागडी ' समजून तुच्छतेने बोलत होते ..कदाचित माझ्या बर्म्युडा ..बनियन या वेषामुळे ते मला फालतू समजत होते ..मलाही अपमान वाटला ..सटकलेली होतीच ..मी स्पष्ट म्हणालो " हे पहा ..तुमच्या मुलाला आमच्या कडे उपचारांना दाखल करा म्हणून मी निमंत्रण घेवून आलो नव्हतो तुमच्याकडे ..तुम्ही चौकशीला आलात म्हणून मी सविस्तर माहिती देतोय तुम्हाला ..मी तुम्हाला आदरार्थी बोलतोय ..तुम्ही मात्र माझा एकेरी उल्लेख करून मला अपमानित करत आहात ..अनोळखी व्यक्तीशी कसे बोलावे हे देखील शिकावे लागेल तुम्हाला ..तुम्ही आता इथून गेलात तर अधिक चांगले होईल .."
यावर तो ए ए चा सदस्य साऊथच्या सिनेमातील हिरो प्रमाणे ओरडला " ऐ...मी या केंद्राच्या संचालकांना सांगून तुझी नोकरी घालविन ..तुला धडा शिकवीन " .." अबे जा बे साल्या ..तुझ्यासारखे मी फाट्यावर मारतो ..चल फुट इथून " मी पण ओरडून प्रत्युत्तर दिले ..आरडओरडा ऐकून वार्डातील उपचार घेणारे मित्र बाहेर आले ..माझ्याशी कोणीतरी अनोळखी लोक भांडत आहेत हे त्यांना आवडले नाही ..ते रागाने त्या दोघांकडे पाहू लागले ..ते पाहून ते दोघे घाबरले ..घाईने गेटच्या बाहेर पडले ..बाहेर ठेवलेल्या आपल्या स्कूटरला किक मारत तो ए ए सदस्य म्हणाला " तू मला भेट कधी बाहेर ..म्हणजे तुला इंगा दाखवतो माझा "..मी चारदोन अस्सल शिव्या हासडत पुढे धावलो ..तसे ते भुर्रकन स्कूटर सुरु करून फरार झाले ..रात्री रवी भेटल्यावर मी त्याला घडलेला प्रकार सांगितला ..त्या ए. ए . सदस्याचे नाव सांगितले ..त्यावर रवी म्हणाला " अहो तुषारभाऊ ..तो छपरी ए . ए मेंबर आहे ..जास्त मनावर घेवू नका तुम्ही ..मी ओळखतो त्या ए . ए मेंबरला..तो खूप अहंकारी आहे "
( बाकी पुढील भागात )

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

पुनर्जन्म ! ( चमत्कार - भाग तीन )

पुनर्जन्म ! ( चमत्कार - भाग तीन )
ठरल्याप्रमाणे त्याला रातोरात आम्ही न्युरोलाॅजीस्ट कडे हलवले ..अगदी अंतिम घरघर लागल्यासारखी त्याची अवस्था झालेली ...तेथे त्याला एकदम आयसीयू मध्येच ठेवले गेले ..इकडे आम्ही काळजीत होतोच ..काही दिवसांचा का होईना ..सहनिवास होता आमचा त्यामुळे स्नेहबंध तयार झालेले ..दुस-या दिवशी सकाळी बहिणीकडून बातमी समजली की तो अजूनतरी आहे ..तपासण्या होत आहेत ..मग अजून एक दिवस असाच अवस्थतेत गेला..एकदाचा डेलीरियम मधून बाहेर पडला अशी खबर आली आमच्याकडे ..मात्र हरवल्या सारखी अवस्था झाली होती त्याची ..लघवी संडासचा कंट्रोल सुटलेलाच होता ..बहिण आणि पत्नी मोठ्या धीराच्या होत्या ..दिवसातच त्या हॉस्पिटलचे बिल जवळ जवळ तीस हजार इतके झाले ..थोडा भानावर येतोय म्हंटल्यावर ..बहिणीने त्याला घरी नेण्याऐवजी पुन्हा आमच्याकडे आणले ..आता पुन्हा त्याची काळजी घेणे सुरु झाले ..वेळच्या वेळी गोळ्या देणे ..जेवणाची पथ्ये सांभाळणे ..आठवणीने त्याला लाघवी संडासला घेवून जाणे ..कारण त्याला लाघवी किवा संडास होतेय हे समजतच नव्हते ..त्याने खराब केलेले कपडे आम्हालाच धुवावे लागत ..पुन्हा पुन्हा नवीन कपडे कोठून आणणार ..म्हणून म्काग दर दोन तासांनी त्याला आठवणीने लघवीचा पाॅट देणे ..चार तासांनी हाताला धरून संडासला घेवून जाणे कामे आम्ही आळीपाळीने करू लागलो .. कधी कधी लघवीचा पाॅट हाती धरून ..तो केव्हा लाघवी करतोय याची वाट पाहत बसावे लागे ..मग एखादा गमतीने ..त्याला लवकर कर लघवी ..असा आग्रह करी ..त्याने लवकर लघवी करावी म्हणून ...लहान मुलाला लघवीला उभे केल्यावर जसे ..शूऊउउउ ..शूउउउउ असा आवाज काढतात तसा आवाज आम्ही काढत असू ..हसत खेळत त्याची सेवा चालली होती एकंदरीत ..एकदा मोठा जोक झाला ..एकाने त्याला लघवीसाठी पाॅट लावला होता .पंधरा मिनिटे झाली तरी हा लघवी करेना ..त्याला लवकर कर ..लवकर कर ..असा आग्रह सूर झाला ..त्याला त्याचे वाईट वाटले खूप ...स्वताच्या असहायतेबद्दल जाणीव होऊन त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ..तसे पाॅट हातात धरून असलेला म्हणाला ..' अहो ..डोळ्यातून नाही हो ..मी इथे पाॅट मध्ये पाणी काढायला सांगतोय " सगळे हसू लागले ..त्यालाही जोक समजला तो देखील तशाहीहसू लागला ..
असे सुमारे पंधरा वीस दिवस गेले ..आता तो थोडा थोडा नॉर्मल होऊ लागला होता ...हळू हळू लघवी ..संडासचे भान येवू लागले होते ..जेवणही नीट होऊ लागले..लवकरच बिलीरुबीन नॉर्मल येईल अशी लक्षणे दिसू लागली ..मग त्याचे आता घरी जाऊ द्या असे टुमणे सुरु झाले ..मात्र पोटचा घेर कमी होत नव्हता ..त्याला पोटातील पाणी सुकवण्यासाठी औषधे सुरु होतीच ..पुन्हा दोन वेळा जेथून आला होता त्या हॉस्पिटल मध्ये टॅपिंग करावे लागले ..पूर्ण भानावर आल्यावर ..तो आमच्या मस्करीत सामील होऊ लागला होता ..म्युझिक थेरेपीला थोडा वेळ तबला वाजवू शकत लागला त्याचा तबल्याच्या तीन परीक्षा झालेल्या होत्या .. .. बहिण भेटल्यावर त्याने घरी घेवून चल असा हट्ट करूनही कुटुंबीय ठाम राहिले ..मग त्याने आता येथे अजून काही दिवस राहावे लागेल हे स्वीकारले ..मग तो आम्हाला छोट्या छोट्या कामात मदत देखील करू लागला..आम्ही त्याच्या कडे वार्ड तसेच ..अंगण ..जेवणानंतर खरकटे नीट काढले जातेय की नाही .. इतर साफ सफाई करण्याची पाळी असलेले लोक नीट काम करत आहेत की नाहीत हे लक्ष ठेवायची जवाबदारी आली ..तो आनंदाने आणि काटेकोरपणे हे काम करू लागला ..त्याला वार्डातील उपचारी मित्रांनी गमतीने ' व्हिजीलन्स ऑफिसर ' असे नाव ठेवले ...त्याच्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी ..त्याला कंचे( खेळण्याच्या गोटया ) आणून दिले व ते कंचे जमिनीवर टाकून एक एक करून उचलायचे असा व्यायाम रोज पंधरा मिनिटे करायला सांगितला गेला ..त्यानेही विनातक्रार हा व्यायाम सुरु केला ..मग आम्ही त्याला तू रोज हे हजार फुटांचे अंगण सकाळ संध्याकाळ झाडत जा असा सल्ला दिला ..तो देखील त्याने पाळला ..फक्त घरचे लोक भेटायला आले की घरी जाण्यसाठी थोडा हट्ट करी ..पण बहिण आणि पत्नी ठाम राहिल्या ..पाहता पाहता त्याचे वजन वाढू लागले ..पोटाचा घेर कमी होत गेला ..८४ सेंटीमीटर वरून ७० वर आला ..मग ६० वर आला ..असे एकंदरीत सहा महिने गेले ..मग त्याने सेन्टरचे स्वागत कक्ष सांभाळण्याचे देखील काम केले ..व्हरांड्यात एक छोटासा टेबल आणि खुर्ची घेवून तो सकाळ संध्याकाळ तेथे बसे ..चौकशीसाठी आलेल्या लोकांना माहिती देण्याचे काम करे ..एकूण आठ महिने सेंटरला राहिल्यावर मग त्याचा डिस्चार्ज झाला ..मात्र त्याला इतक्यात कामावर जायचे नाही ..घरून सकाळी नाष्टा करून इथे यायचे..आणि इथेच दिवसभर राहून रात्री परत घरी जायचे असे बंधन घातले आम्ही ..तो नियमित डे- केयर ला येवून फॉलोअप ठेवू लागला ..पाहता पाहता त्यचे व्यसन मुक्तीचे एक वर्ष पूर्ण झाले ..आम्ही सेंटरला त्याच्या पुनर्जन्माचा वाढदिवस साजरा केला ..
नंतर त्याने पुन्हा त्याची टायपिंगची नोकरी सुरु केली ..मात्र संध्याकाळी तेथून सुटल्यावर नियमित सेंटरला येत असे तो ..सगळे स्थिर होऊ लागले .. तो जेव्हा जुन्या डॉक्टरना भेटायला गेला तेव्हा त्यांनी त्याला मिठीच मारली ..पुनर्जन्म झालाय तुमचा खरेच .असे म्हणाले ..या गोष्टीला आता सुमारे १० वर्षे होऊन गेली ..तो उत्तम स्टेनो असल्याने त्याला नंतर एका कॉलेजमध्ये नोकरी मिळाली ..दोन वर्षात पुन्हा जास्ती पगाराची दुसरी नोकरी मिळाली ..आता तो अॅडमीनीस्टूेशन ऑफिसर म्हणून गेल्या तीन चार वर्षांपासून काम करतोय एका आर्किटेक्चर कॉलेजमध्ये . मारुती व्हॅन विकत घेतली होती..ती विकून आता सेन्ट्रो घेतोय ..मुलगा सी ए करणार आहे ..पत्नी देखील खुश आहे ..सेंटरचा काही कार्यक्रम असला आणि त्याला बोलावले तर आवर्जून येतो ..एकंदरीत सगळे कुटुंबच पुन्हा स्थिरावलेय !..त्याची बिघडलेली अवस्था ज्या लोकांनीपहिली होती ..त्यांच्या सर्वांच्या दृष्टीने तो आज जिवंत राहून व्यसनमुक्त आहे हा एक मोठाच चमत्कार आहे !

' डेलीरियम ' चा चक्रव्यूह ( चमत्कार - भाग दोन )

' डेलीरियम ' चा चक्रव्यूह ( चमत्कार - भाग दोन )
नवीन पाहुणा जरी शरीराने खंगलेला ..मृत्यूपंथाला लागलेला असला तरीही बुद्धीने तल्लख आहे हे जाणवले त्याच्या बोलण्यातून ..पदवीधर होता ..विवाहित असून त्याची पत्नी सरकारी नोकरी करते ..एक मुलगा आहे ..जो सध्या पाचवीत शिकतोय ..अशी माहिती त्याच्या बोलण्यातून मिळाली ..हा एका खाजगी टायपिंग इनस्टीटयुट मध्ये कामाला होता ..मराठी आणि इंग्रजी टायपिंगची कामे करीत असे ..मात्र व्यसनामुळे अनेक दिवसांपासून नोकरीवर गैरहजर होता ..त्यामुळे आर्थिक स्थिती यथातथाच राहिलेली ..आईवडील गेलेले .त्याची विवाहित असलेली मोठी बहिण नागपूरच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये पॅथाॅलॉजीस्ट होती .. त्याला झालेल्या कावीळी बद्दल तिला शास्त्रीय माहिती होती ..तसेच त्याच्या सर्व रिपोर्ट्स वर ती बारकाईने लक्ष देत असे ..याचे बिलीरुबीन नॉर्मल झाल्याशिवाय याच्या जीवाला असलेला धोका कायम राहील हे ती जाणून होती ..म्हणून तिने त्याची औषधे ..खाण्यापिण्याची पथ्ये यावर आम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायला बजावले होते ..त्याच्यासाठी हळद ..तिखट ..तेल नसलेले जेवण वेगळे काढून ठेवत असू आम्ही ..अनेकदा तो हे मिळमिळीत जेवण नको म्हणून रुसून बसत असे ..मग कोणाशी काही न बोलता तोंडावर पांघरूण घेवून सोफ्यावर पडून राही ..जेवणासाठी त्याच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत ..खूप अशक्त असल्याने लघवी ..संडास ..अंघोळ वगैरे ला जाण्यासाठी त्याला मदत करावी लागे ..कारण तो तोल जावून पडला असता तर कॉम्पलीकेशन्स वाढली असती ..हा स्वभावाने ' हेकडी ' वर्गातला होता ..म्हणजे स्वताचे म्हणणे खरे करणारा ..किवा ' असेल तर सुत..नाहीतर भूत ' ..' खाईन तर तुपाशी ..नाहीतर उपाशी ' या प्रकारचा ..चालण्यासाठी कोणाची मदत मागणे ..किवा मदत घेणे याला मनापासून पसंत नव्हते ..म्हणून तो अचानक कोणालाही काही न सांगता ..संडासला किवा लघवीला जायला उठे आणि तुरुतुर चालू लागे ..मग त्याला आधार देण्यासाठी आमची धावपळ होई ..त्याच्या सुजलेल्या पायातून सतत पाझरणारे पाणी दर चार तासांनी पुसून ..पाय कोरडे करून ..त्यावर लावायला डॉक्टरनी लिहून दिलेले मलम लावण्याचे काम आम्ही चिकाटीने करत होतो ..हॉस्पिटल मध्ये ' दोन तीन वेळा " टॅपिंग ' करून त्याच्या पोटातले पाणी काढलेले होते . ..तरीही पुन्हा पोटात पाणी जमा होई ..त्यामुळे पोट फुगलेले ..लिव्हरची कार्यक्षमता जवळ जवळ संपुष्टात आलेली ..एकदा गम्मत म्हणून त्याच्या पोटाचा घेर मोजला आम्ही तर तो " ८४ " सेंटीमीटर भरला ..आणि त्याचे वजन फक्त ३२ किलो ..एकंदरीत कठीणच होते सगळे ..त्याचे सगळे शरीर कावीळीमुळे पिवळसर दिसे ..जसे नवरा नवरीच्या लग्नात लावलेली हळद चारपाच दिवस चेहऱ्यावर आणि हाता पायांवर उठून दिसते तसे ..
सुमारे आठ दिवस व्यवस्थित गेले ..मात्र नंतर अचानक त्याचे पोटाचे दुखणे वाढले ..त्याला ताप आला ..अगदी उठून बसण्याचीही ताकद राहिली नाही ..संडास.. लघवीचे सेन्सेशन गेले ..कपडे खराब करू लागला .. आणि रात्री ' हॅलुस्नेशन ' मध्ये गेला ( भ्रमाच्या अवस्थेत..याला डॉक्टर डेलीरियम देखील म्हणतात ) स्थळकाळाचे भान हरपले ..ओळख विसरला ..मला या क्षेत्रातला दीर्घ अनुभव असल्याने ..त्याचा सांभाळ करण्याची जवाबदारी माझ्यावर आली ....सेन्टरच्या फिजिशियननी कावीळ डोक्यात गेली असा निष्कर्ष काढला ..तो सारखा ' नाना ..नाना ..नाना ' असे ओरडू लागला ..बाकी काहीच बोलत नसे ..त्याच्याशी काहीही बोलायचा प्रयत्न केला तर तो फक्त ' नाना ..नाना ..नाना ' असेच विविध पट्टीत ..आणि वेगवगळ्या तालासुरात ओरडत राही ...' नाना ' म्हणजे त्याचे गेलेले वडील ..त्यांच्या नावाने तो हाका मारत होता ..बहुधा वडिलांचा हा खूप लाडका असावा ..सुमारे चार पाच दिवस त्याच्या नाना या शब्दाने उच्छाद मांडला होता ..अजिबात झोपत नसे तो ..रात्रीचा अचानक उठून चालू लागे ..तोंडाने ' नाना ..नाना ' चा जप ..त्याच्यामुळे इतर उपचारी मित्रांना त्रास होऊ नये ..म्हणून रात्री त्याला वेगळ्या खोलीत बांधून ठेवावे असे ठरले ..मात्र खूप अशक्त असल्याने बांधून ठेवला तर ..रक्तवाहिन्या बंद होण्याची भीती होती ..तसेच बंधन सोडवण्यासाठी त्याने केलेल्या उपजत प्रेरणेच्या हालचालींमुळे त्याच्या हातापायांना जखमा होण्याची भीती होतीच ..शेवटी त्याच्या खोलीत मी रात्रभर थांबण्याची जवाबदारी घेतली ..त्याच्या पलंगाच्या अगदी जवळ माझी गादी घातली ..सारखा गोंधळ सुरु होता त्याचा ..तोंडाने ' नाना ' चा पट्टा सुरु ...वर हा दर पाच मिनिटांनी अचनक उठून चालू लागे ..मग त्याला धरून पुन्हा पलंगावर झोपवणे ..हे काम मला रात्रीतून किमान वीस वेळा तरी करावे लागे ..त्याला झोपेची इंजेक्शने ..झोपेच्या गोळ्या पण देवू शकत नव्हतो त्याच्या अशक्तपणामुळे ..एकदा झोपला तर परत उठणारच नाही अशी भीती होती ..' नाना च्या जपापासून पासून बचाव करण्यासाठी मी रात्री माझ्या कानात कापूस घालून ठेवत असे ..तसेच त्याच्या ओरडण्याने इतरांची झोपमोड होऊ नये म्हणून खोलीचे दर बंद ठेवावे लागे ..त्याला जेवणाचे देखील भान उरलेले नव्हते ..जबरदस्ती भरवावे लागे ..तरी चावणे व गिळणे या साठी त्याचा काहीच प्रतिसाद नसे ..तोंडात घास नुसता फिरवून पुन्हा बाहेर काढून टाकी ,,त्याला पपईचे छोटे छोटे तुकडे करून ..भरवावे लागले ..बाहेर घास काढू लागला की ओरडावे लागे ..सलाईन लावण्यासाठी शीर सापडणे कठीण झाले ..असे चारपाच दिवस गेल्यावर त्याचा आवाज क्षीण होत गेला ..तब्येत अजून ढासळली ..पलंगावरून उठून बसण्याची देखील क्षमता नष्ट झाली .' ब्रेन ' चा स्कॅन करून नेमकी समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्याच्या ' डेलीरियम ' मधून बाहे काढण्यासाठी त्याला नागपूरमधील सुप्रसिद्ध ' न्युरोलोजीस्ट ' कडे हलवावे असे ठरले ..त्यानुसार त्याला तेथे हलवले ..
( बाकी पुढील भागात )

चमत्कार ..! ( भाग एक )

चमत्कार ..! ( भाग एक )
२००३ सालची गोष्ट ..आधी मैत्री व्यसनमुक्ती केंद्र नागपूरपासून ३० किलोमीटर वर असलेल्या मंगरूळ गावी सुरु झालेले ..नंतर खूप दूर अंतरावर असल्याने आठ महिन्यातच तेथून सेंटरची जागा बदलून सेंटर अमरावती रोडवर भरत नगर येथे नव्या जागेत हलवलेले ... सेंटर सुरु करण्याच्या वेळी रवी पाध्येने ( संचालक ) स्थानिक पेपर मध्ये व्यसनाधीनता या आजाराबद्दल काही लेख लिहिलेले असल्याने तसेच ..नंतर मी नागपूरला गेल्यावर.. आम्ही पथनाट्ये वगैरे करून नागपूर शहरात बर्यापैकी जनजागृती केलेली होतीच ..भरतनगरला चार मोठ्या खोल्या आणि समोर प्रशस्त अंगण असलेला बंगलाच भाड्याने घेतला होता ..१२ जण उपचारांसाठी दाखल होते ..मी .आणि इतर दोन कार्यकर्ते .. ..असे तीन जण मुख्य निवासी कार्यकर्ते म्हणून सेंटरला रहात असू ..रवी दिवसभर सेंटरला थांबून रात्री जेवायला आणि झोपायला घरी जाई ..दिवसभरच्या सर्व थेरेपिज..स्वैपाक करणे ..जेवणे वाढणे ..उपचारी मित्रांची देखभाल करणे ..वगैरे कामे सगळे मिळून करत होतो ..एकदा रविला दुपारी फोन आला ..दारूचा व्यसनी असलेल्या एकाची बहिण बोलत होती फोनवर ..पेशंट कावीळ झाल्यावरही दारू न थांबवल्याने जास्त सिरीयस झाला म्हणून त्याला एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते ..मात्र कावीळ लास्ट स्टेजवर जावून जलोदर झालेला ( असायटीस ) ..हॉस्पिटल मध्ये सुमारे पंधरा दिवस राहूनही प्रकृतीत फारशी सुधारणा दिसत नव्हती ....एव्हाना सुमारे लाखभर रुपये खर्च झालेले होते कुटुंबियांचे..मध्यमवर्गीय कुटुंब ..अजून किती दिवस लागतील सुधारणेला ..तोवर किती पैसा खर्च करावा लागेल याची चिंता होतीच ..शिवाय दवाखान्यात उपचार घेत असणारा व्यसनी देखील घरी घेवून चला म्हणून हट्ट करत होता ..शेवटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कुटुंबियांना बोलावून ..हा काही वाचणार नाही ..उगाच खर्च करण्यापेक्षा याला घरी घेवून जा असे सांगितलेले ..मात्र बहिणीला आणि पत्नीला ते पटेना ..हा घरी नेल्यावर परत ताबडतोब दारू पिणार आणि लगेच मरणार अशी भीती त्यांच्या मनात होती ,,तेव्हा कोणीतरी त्यांना मैत्री बद्दल सुचवले ..घरी नेवून दारू पिण्यापेक्षा याला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले तर बरे या विचाराने बहिणीने रविला फोन केला होता ..तिने एकंदरीत परिस्थिती सांगितल्यावर ..एकदा पेशंटला पाहून तर घेवू म्हणून रवी हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेला ..
बेडवर डोळे खोल गेलेला ..हातापायाच्या काड्या आणि पोटाचा मोठा नगारा झालेला पेशंट ..पायावर सूज आलेली ..आणि त्या सुजलेल्या त्वचेतून खाजवल्या सारख्या जखमा होऊन त्यातून थोडे थोडे पाणी बाहेर येत होते..मात्र त्याचे डोळे अगदी बोलके ..रवीने केसबद्दल ताजी माहिती घेण्यासाठी डॉक्टरांची भेट घेतली ..डॉक्टरना जेव्हा समजले की याला व्यसनमुक्ती केंद्रात नेणार आहेत ..तेव्हा त्यांनी खेदाने मान हलवली ..रविला म्हणाले ..तुम्ही प्रयत्न करत आहात हरकत नाही काही ..पण हा हाती लागणे कठीणच आहे ..रवी संभ्रमात पडलेला ..तरी देखील बहिणीने खूप विनंती केली ..हा व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्त अवस्थेत मेला तरी चालेल आम्हाला ..मात्र अशा अवस्थेत घरी जावून हा दारू पिवून मेलेला आम्हाला नकोय ..तुम्ही जमेल ते प्रयत्न करा ..रविशी फोनवर बोलून तसेच प्रत्यक्ष भेट घेवून त्याच्या बहिणीची रवि वर श्रद्धा बसलेली ..शेवटी त्याला संध्यकाळी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज करून कुठे नेतोय हे न सांगता ..दोघे मित्र सेंटरला घेवून येतील असे ठरले ..सेन्टरच्या गेटसमोर ऑटो थांबली ..मी आणि रवी पुढे गेलो .ऑटोमध्ये पेशंटच्या दोन्ही बाजूला दोन जण बसलेले ..जवळ जाताच त्या दोघांच्या तोंडाचा दारूचा वास आला ..ते प्यायलेले होते ..मात्र ज्याला दाखल करायचे तो पेशंट न प्यायलेला ..माझ्या आठवणीत व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेली ही पहिली केस अशी होती की त्याला दाखल करण्यास सोबत आलेले दोघेही दारू प्यायलेले आणि ज्याला दाखल करायचे आहे तो न प्यायलेला ..मात्र गंभीर आजारी ..मला रवीने आधी केसबद्दल कल्पना दिलेली असल्याने ..मी गोड बोलून पेशंटला ऑटोतून खाली उतरवले ..इथे जरा एक दोन तपासण्या करायच्या आहेत असे सांगितले ..त्याला आमच्या हवाली करून मित्र निघून गेले ..बाकी फाॅर्मालिटीज बहिण दुसऱ्या दिवशी पूर्ण करेल असे ठरले होते .. पेशंटची शरीरयष्टी पाहून हा रात्र तरी काढेल की नाही याची आम्हाला शंकाच होती ..परंतू चालतोय ..बोलतोय म्हंटल्यावर आमची भीती थोडी कमी झालेली ..सेन्टरच्या आत मध्ये आल्यावर एकंदरीत काय प्रकार आहे हे पेशंटला समजलेच ..तो मला घरी जायचेय म्हणून मागे लागला ..नेमकी त्या दिवशी शनिवार असल्याने ..मुझिक थेरपी होती सेंटरला..आता जाऊ नंतर जाऊ करत त्याला मुझिक थेरेपीची गाणी ऐकून.. थोडे जेवण करून घरी जा असे सांगितले ..त्यावेळी ..आमच्या कडे संगीत उपचारांची माईक ..स्पीकर ..वगैरे साधने नव्हती ..तसेच कोंगो ..बोंगो ..सिंथेसायझर वगैरे नव्हता ..फक्त एक हार्मोनियम आणि एक तबला डग्गा ..त्यातही तबला वाजवणारे कोणीच नव्हते ..हार्मोनियम रवी वाजवत असे ..
मी सुरवातीलाच ' या जन्मावर या जगण्यावर.. शतदा प्रेम करावे ' हे गाणे सुरु केले ..तसे समोर खुर्चीवर बसलेल्या नवीन मित्राचे डोळे चमकले ..तो लक्षपूर्वक गाणे ऐकू लागला ..तसेच त्याने हाताने गुडघ्यावर ताल धरला हे दाखील जाणवले ..एकंदरीत गडी संगिताचा शौकीन आहे हे जाणवले ..माझे गाणे म्हणून झाल्यावर त्याने मला सुधीर फडकेंचे ' अशी पाखरे येती ..आणिक स्मृती ठेवुनी जाती ' हे गाणे येते का विचारले ..येत असल्यास गाण्याची फर्माईश केली .मला सुधीर फडके आणि अरुण दातेंची बहुतेक गाणी येत होतीच ..मी होकार देवून गाणे सुरु केले ..गडी भलताच खुशीत आला ..पुन्हा ताल धरला बोटांनी गुडघ्यावर ..मी ' देवघरातील समईमधुनी ..अजून जळती वाती ' या उंच नेलेल्या आर्त स्वरावर .." वा " अशी दाद दिली त्याने ..ते गाणे संपल्यावर ..खुर्चीवरून उठून माझ्या बाजूला झाकून ठेवलेल्या तबल्या जवळ गेला ..चवड्यावर बसून त्यावरचे कव्हर काढले ..मग मग चक्क तबला लावत असल्यासारखे तबला आणि डग्गा यावर जरा बोटे मारली .." तुम्हाला येतो का वाजवता ? " असे आम्ही विचारले ..त्याने क्षीण हसून होकारार्थी मान डोलावली ..थोड्याश्या हालचालींनी देखील त्याला थकवा आल्यासारखे झालेले दिसले ..नंतर वाजवा तुमची तब्येत बरी झाल्यावर असे सांगून त्याला पुन्हा धरून खुर्चीवर नेवून बसवले ..मग हो ना करता करता तो आमच्या सोबत सेंटरला रहायला तयार झाला ...थोडासा भात खाल्ला सगळ्यांसोबत ..त्याला डॉक्टरानी रोज सकाळ संध्याकाळ घ्यायच्या म्हणून गोळ्या लिहून दिलेल्या होत्या ..त्या सोबत होत्याच ..एका वेळचा डोस आठ गोळ्यांचा होता ..गोळी खायच्या वेळी कंटाळा आलाय मला इतक्या गोळ्या खाण्याचा असे म्हणून जीवावर आल्या सारख्या गोळ्या घेतल्या ..आणि हॉल मध्ये असलेल्या एका सोफ्यावर जावून पाय पोटाशी घेवून कुशीवर पडून राहिला ..रात्री लघवी..संडासला जायला त्याला मदत म्हणून मी सोफ्याच्या बाजूलाच माझी गादी टाकून झोपलो ..तो मध्ये मध्ये हलकेच कण्हत होता हे जाणवले ..त्याला काय होतेय हे विचारल्यावर पोटात दुखतेय असे म्हणाला ..दोन तीनवेळा त्याची हालचाल झाली तसा सावध होऊन त्याला लघवीला नेले ...मेंटल हॉस्पिटल मध्ये रहिल्याने माझी झोप खूप सावध आहे .. मेंटल हॉस्पिटल मध्ये एखादा मनोरुग्ण आपण झोपेत असताना काही खोडी करेल की काय आपली ..याची भीती असे मनात ..म्हणून झोप तेव्हापासून सावध झालेली !
( बाकी पुढील भागात )

राजकीय पालखी ( दोन )

राजकीय पालखी ( दोन )
सुमारे पंधरा मिनिटे आम्ही खाली अवस्थतेने वाट पहात होतो ..शेवटी आमची प्रतीक्षा संपली ..जिन्यावरून आमचे कार्यकर्ते एका तगड्या व्यक्तीला घेवून येताना दिसले ..नरेंद्रने मागून त्याची पँट कमरेजवळ घट्ट पकडलेली ..तर राजूने त्याचे बखोट धरलेले ..अॅडमिशन फॉर्म वर पालकांची सही ..वगैरे सोपस्कार आधीच उरकलेले होते ..पटकन आम्ही त्याला गाडीत बसवून गाडी सुरु केली . व्यसनीला त्याने काही गडबड करू नये म्हणून एकदम मागच्या सीट वर बसवले ..त्याच्या दोन्ही बाजूला नरेंद्र आणि राजू बसले ..पालखी साठी आम्ही नेहमी मोठी गाडी नेतो जेणेकरून आमचे पाच सहा कार्यकर्ते आणि व्यसनी आरामात प्रवास करू शकतील ..त्यावेळी आमच्याकडे मारुती ' वर्सा ' गाडी होती ..आता ' झायलो ' घेतलीय ..आमची पोलिसी भूमिका नीट वठण्यासाठी अशा प्रसंगी आम्ही पोलिसी खाक्यानुसार मोजकेच बोलतो ..मी नरेंद्रला विचारले " झडती ली क्या उसकी ? कुछ हथियार मिले या नही ? .." नही सहाब ..हथियार नही मिले ..लेकीन ब्राऊन शुगर की पुडिया मिली है..ये ब्राऊन शुगर बेचता है..एक ग्राहक भी था इसके साथ में..उसको छोड दिया ..वो बेचारा पीनेवाला था .." नरेंद्रने त्याला ' बेचनेवाला ' असे संबोधून ' पेडलर ' वर्गात टाकले ..तो अजूनच घाबरला ..गरीब आदमी हू ..मै बेचता नही ..केवल पिता हु ..आप चाहे तो बिलासपुर के सभी बेचनेवालो के नाम पते बताता हु आपको अशी गयावया करू लागला ..मग आम्ही पोलिसी रूबाबत त्याचे घरदार .नातलग ..कामधंदा ..जमीन जुमला याची चौकशी करू लागलो ..त्याला विचार करायला वेळ मिळू नये म्हणून सारखा प्रश्नांचा भडीमार करावा लागतो ..त्याने नातलगांबद्दल खरी खुरी माहिती दिली ..मात्र जमीन जुमला ..कामधंदा वगैरे बद्दल खोटे सांगू लागला ..बेरोजगार हु ..भाडे के घर में रहेता हु ..वगैरे सांगू लागला ..आपण पोलिसांच्या ताब्यात आहोत याचे त्याल भान होते ..आपण श्रीमंत ..शेतीवाडी वाले आहोत ..हे सांगणे टाळले त्याने ..कदाचित आम्ही मोठी ' तोडी ' करू नये याची खबरदारी घेत होता ..गरीब हु ..मुझे छोड दो .. आपको खुश करुंगा ..असे म्हणू लागला ' साले रिश्वत की बात करता है म्हणून आम्ही त्याला झापले ..अशा वेळी सेंटरला पोचे पर्यंत..किमान नागपूर शहरात प्रवेश करेपर्यंत ..आम्हाला पोलीस असल्याचे नाटक आमच्या एकमेकांच्या संवादातून सूर ठेवावे लागते ..वाटेत आम्ही नैसर्गिक विधी ..जेवण ..नाश्ता..या करता थांबणे टाळतो..हे सगळे आधीच उरकून घेतो .
सुमारे अकरा तास प्रवास करून आम्ही एकदाचे सेंटरला पोचलो ..त्याला आम्ही पोलीस नसून व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यकर्ते आहोत हे समजले तेव्हा .धक्काच बसला ..बराच वेळ तो नुसताच स्तब्ध राहिला ..आपण असे कसे फसलो ..इतके कसे मूर्ख बनलो .या बद्दलचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता ..मग आम्हला धमक्या वगैरे दिल्या .अमुक ढमुक मंत्री माझा नातलग आहे ..तुम्हाला खूप पश्चाताप करावा लागेल वगैरे ..आम्ही त्याला सांगितले ..सध्या तू आमच्या ताब्यात आहेस ..तुझ्या नातलगांच्या संमतीनेच तुला येथे आणले आहे ..तुला जे काही करायचे ते तू बाहेर गेल्यावर करू शकतोस ..तोवर तुला आमचे म्हणणे ऐकावे लागेल ..असे बजावले ..त्याचा नाईलाज झाला ..मात्र आता बाहेर पडल्यावर सर्वात आधी बायकोला घटस्फोट देणार असे त्याने जाहीर केले ..तसा निरोप द्या तिला माझ्यातर्फे असे सांगितले ..आम्हाला हे सर्व अपेक्षितच असते ..त्याला आम्ही ब्राऊन शुगरची ' टर्की ' जास्त होऊ नये म्हणून व्यवस्थित औषधे दिली ..तो चारपाच दिवसांनी उपचारात सहभागी होऊ लागला ...योग ..प्राणायाम ..समूह चर्चा ..व्यक्तिगत समुपदेशन या मुळे मनातील नकारात्मक विचार कमी होत गेले ..त्याला किमान दोन काहीने तरी उपचार द्यावे असे कुटुंबियांचे म्हणणे होते ..मध्ये एकदा नातलग भेटून गेले तेव्हा त्याने हट्ट केलाच घरी जाण्याचा ..परंतु नातलग ठाम राहिले ..एक महिना तरी रहावेच लागेल असे त्याला सांगितले ..
उपचारांचा एक महिना पूर्ण होऊन गेल्यावरही आपल्याला सोडत नाही हे पाहून त्याने .. तब्येत बिघडल्याची नाटक केले ..मुद्दाम चक्कर येवून पडल्यासारखे खाली पडला ..मग तसाच उताणा डोळे मिटून बेशुद्ध झाल्यासारखा पडून राहिला ..आमच्या उपचारी मित्रांनी ..कार्यकर्त्यांनी खूप हाका मारल्या ..त्याला हलवले तरी डोळे उघडायला तयार नाही गडी..कार्यकर्त्यांनी मला बोलावले ..मी त्याच्या डोळ्याच्या पापण्या बोटांनी उघडून बुबुळे पहिली ..तर बुबुळे चांगलीच फिरत होती ..हे नाटक आहे हे मला समजले ..काही नाही ..याला बांधून ठेवा पलंगाला दोन दिवस असे मुद्दाम मोठ्याने कार्यकर्त्यांना सूचना दिली ..तसे तो हालचाल करू लागला ..अभी ठीक हु असे म्हणू लागला . दोन महिने पूर्ण झाल्यावर त्याचा डिस्चार्ज झाला ..या दरम्यान तो आमचा मित्र बनला ..या घटनेला आता नऊ वर्षे उलटून गेली ..तो छान व्यसनमुक्त रहात आहे ..राजकारण आपला प्रांत नाही म्हणून सोडून दिलेय ..शेतीवाडीत लक्ष देतोय .. नंतर त्याने बिलासपुर हून सुमारे दहा जण उपचारांना पाठवले आमच्याकडे

राजकीय पालखी ( भाग एक )

राजकीय पालखी ( भाग एक )
बिलासपूरहून फोन होता ..व्यसनी व्यक्तीच्या पत्नीचा ...पतीला ब्राऊन शुगरचे व्यसन आहे ..स्वतःहून उपचारांना यायला तयार नाहीय ..त्याला तुम्ही जबरदस्तीने उचलून उपचारांना नेवू शकाल का ? ..त्यापूर्वी आम्ही महाराष्ट्रातील जवळपासच्या गावातून उपचारांना तयार नसलेल्या अनेकांना जबरदस्तीने उचलून उपचारांना आणलेले होते ..आम्ही सगळे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे व्यसनी असल्याने ..व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेची नेमकी कल्पना आम्हाला असते ..तो घरातील लोकांसाठी कितीही खतरनाक ..डेंजर वगैरे असला तरी ..बाहरेच्या ..किवा अनोळखी लोकांना घाबरून असतो ...हे आम्हाला माहित असते ..असे जबरदस्तीने उचलून आणण्याच्या वेळी ..आम्ही बहुधा व्यसनीच्या घरी मध्यरात्री अथवा पहाटेच्या वेळी पोचतो ..आधी अॅडमिशन फोर्मवर घरातील जवाबदार व्यक्तीची सही घेतली जाते ..आर्थिक बाबी पूर्ण करून ..त्याचे सामान गाडीत ठेवून ..कुटुंबियांना व्यसनी व्यक्तीला दिसणार नाहीत अशा ठिकाणी थांबायला सांगून ..मग आम्ही गाढ ..निर्धास्त झोपलेल्या व्यसनी व्यक्ती जवळ जावून त्याला उठवून ..उचलून सरळ गाडीत नेवून बसवतो ..काय घडतेय याचा विचार करण्याची देखील त्याला संधी मिळत नाही इतक्या वेगाने हे काम करावे लागते ..तो अर्धवट झोपेत असल्याने भांबावतो ...काही वेळा त्याला ओरडण्याचे देखील सुचत नाही ..तर काही वेळा मोठ्याने बोंब मारतो ..मदतीसाठी कुटुंबियांना हाका मारतो ..मात्र कोणीही पुढे यायचे नाही हे कुटुंबियांना सांगितलेले असते ..तो पूर्ण भानावर येईपर्यंत गाडी सुरु झालेली असते ..त्याचा उरला सुरला आत्मविश्वास देखील निघून जातो ..प्रतिकार करणे थांबते ..मग तो आम्हाला प्रश्न विचारतो ..कोण तुम्ही ? मला कुठे नेताय ? किडनॅप करताय का ? वगैरे ...आम्ही त्याला सरळ उत्तरे न देता ..तूच ओळख आम्ही कोण ते ..नीट आठव आपण पूर्वी कुठे भेटलोय ते ..स्मरणशक्तीला ताण दे जरा ..इतक्यात कसा विसरलास ..असे काहीतरी बोलून त्याला अजून गोंधळात टाकतो ...असाच टाईमपास करत गाडी सेंटरला पोचते ..जेव्हा त्याच्या लक्षात येते की आपल्याला फसवून ..उल्लू बनवून ..जबरदस्तीने उचलून व्यसनमुक्ती केंद्रात आणले गेलेय ..तेव्हा तो आधी स्वतःवरच प्रचंड चिडतो ..मी असा कसा उल्लू बनलो याचे त्याला वैषम्य वाटते ..हे सगळे कुटुंबियांच्या सांगण्यावरून झालेले आहे हे लक्षात येवून त्याला धक्काच बसतो ..कुटुंबीयांचा राग येतो त्याला ..आम्हाला धमक्या देतो ..मी पोलिसात तक्रार करीन ...मानव अधिकार आयोगाकडे जाईन..तुमचे केंद्र बंद पाडीन ..जेलची हवा खावी लागेल वगैरे ..हे सगळे उसने अवसान असते हे आम्ही जाणून असतो ..आम्ही बधत नाही म्हंटल्यावर मग जरा नरमतो ..मला बाहेर सोडा ..महत्वाची कामे आहेत ..माझी नोकरी जाईल कामावर नाही गेलो तर ..कुटुंबीय उपाशी मरतील माझे ..माझ्याशिवाय घरात जवाबदार कोणीच नाही ..असे पाप करू नका ..अशी गयावया करतो ..त्याचाही फायदा होत नाही हे पाहून..मी इथे अन्नपाणी ग्रहण करणार नाही ..उपोषण करीन ..स्वतःचे काहीतरी बरेवाईट करून घेईन ..तुम्ही सगळे फसाल मग कायद्याच्या कचाट्यात ..वगैरे ..त्याला वार्डात उपचार घेणारे मग समजावतात ..येथे काहीही फायदा होणार नाही कसलाच ..आम्ही असेच बोललो होतो ..मात्र आता आम्हाला समजतेय की जे चाललेय ते आपल्याच भल्यासाठी आहे ..हे चांगले लोक आहेत ..तुझी काळजी घेतील चांगली ..अशा प्रकारे हळू हळू तो थंड पडतो ..आम्हाला सहकार्य करू लागतो ..
ब्राऊन शुगरचा व्यसनी म्हणजे तब्येतीने खंगलेला असणार ..फारसा प्रतिकार करणार नाही ..सहज उचलून आणता येईल ..असा आमचा अंदाज होता ..आम्ही बिलासपुरला जाण्यास होकार दिला ..नागपूरपासून सुमारे ४५० किलोमीटर दूर जायचे होते ..जावून येवून किमान वीस तास तरी लागणार होते ..सर्वांनाच साहसाची आवड ..नवीन अनुभव घेण्याची खुमखुमी ..मध्यरात्री बिलासपुरला पोचू या हिशोबाने ..दुपारीच जेवणे करून नागपूरहून निघालो .. त्यावेळी नेमके कलकत्ता हायवे चौपदरीकरणाचे काम सुरु होते ..वाटेत अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला ..असंख्य डायव्हर्शनन्स ..ट्राफिक जाम ..असा वैतागवाणा प्रवास झाला ..बिलासपूरला पोचण्याच्या वेळेचा अंदाज चुकलाच ..मध्यरात्री ऐवजी सकाळ झालेली ..भक्क उजाडलेले ..दिलेल्या पत्त्यावर पोचलो ..एक दुमजली घर ..त्याला लागुनच दुसरे एक छोटे घर ..आम्ही व्यसनीच्या पत्नीला फोन लावला तर ती फोन उचलेना ..बहुधा व्यसनी उठला असावा ..त्याला संशय येवू नये म्हणून ती फोन उचलत नव्हती बहुतेक ..नेमके काय करावे ते कळत नव्हते ..सकाळचे साडेसह वाजलेले ..माॅर्निंग वाॅक साठी बाहेर पडलेले लोक सकाळी सकाळी गल्लीत कोण पाहुणे आलेत म्हणून कुतूहलाने आमच्याकडे पाहत होते ..एकदोन जणांनी कोण पाहिजे अशी चोकशी केली ..आम्ही अशा वेळी खरी उत्तरे देत नाही ..उगाच संवाद वाढवत नाही ..त्यामुळे ते लोक संशयाने आमच्याकडे पाहत दूर जावून उभे ..तितक्यात बाजूच्या छोट्या घरातून एक मध्यमवयीन स्त्री बाहेर आली ..नागपूरहून आलात का ? असे विचारू लागली ..आम्ही होकार देताच तिने आम्हाला तिच्या घरात बोलावले ..ते घर व्यसनीच्या मोठ्या भावाचे होते ..आम्ही येणार आहोत याची त्यांना व्यसनीच्या पत्नीने कल्पना दिलेली होती ..आम्हाला घरात बसवून मोठा भाऊ व्यसनीची माहिती सांगू लागला ..खूप हुशार आहे ..मात्र बारावी नंतर शाळा सोडली ..घरची भरपूर शेतीवाडी आहे ..व्यसनीला कुस्तीचा देखील शौक होता.. पूर्वी आखाड्यात नियमित जात असे ..तब्येत अजूनही चांगली धडधाकट आहे ..राजकारणात सक्रीय आहे ..मागील टर्म मध्ये वार्डचा नगरसेवक म्हणून निवडून आला होता ..भरपूर मित्रपरिवार आहे ..आधी दारू ..गांजा ..आणि गेल्या वर्षभरापासून ब्राऊन शुगरचे व्यसन लागलेले ..खूप मुजोर आहे .सदैव भांडायला.. हाणामारीला तत्पर असतो ...म्हणून घरचे कोणी काही बोलत नाहीत ..मोठा भावू त्याच्याच त्रासामुळे बाजूच्या घरात वेगळा रहात होता ..स्वतःहून उपचारांना तयार होणार नाही याची कुटुंबियांना खात्री ...म्हणून आम्हाला बोलावले होते ..आम्हाला पोचायला उशीर झाला होता ..व्यसनी सकाळी सहालाच उठून बाहेर जावून ब्राऊन शुगर घेवून आला होते ..आता तो बाजूच्या घरात वरच्या मजल्यावर एका मित्रासोबत ब्राऊन शुगर पीत एका खोलीत बसलेला आहे ...तो जागा आहे म्हणून त्याची पत्नी घाबरून आमचा फोन उचलत नव्हती ..अशी सविस्तर माहिती मोठ्या भावाने सांगितली ..ही सगळी माहिती आमच्या उरात धडकी भरवणारी होती ..राजकारणी ..नगरसेवक ..कुस्तीगीर ..वगैरे गोष्टी नक्कीच आनंददायी नव्हत्या ...याला उचलून नेणे खूप कठीण जाणार याचा अंदाज आला आम्हाला ..मात्र इतक्या दूर येवून खाली हात परतणे आम्हाला पसंत नव्हते ..बघू काय होईल ते पाहून घेवू ..असा धाडसी विचार आम्ही केला .
तो वरच्या खोलीत ब्राऊन शुगर पीत बसलेला आहे ..आपण जर सध्या वेशातील पोलीस असल्याचे नाटक केले तर त्याला वर जावून ब्राऊन शुगर पिताना रंगेहाथ पकडता येईल ..घाबरवता येईल ..ब्राऊन शुगर बेकायदेशीर असल्याने मोठ्या शिक्षेची तरतूद आहे कायद्यात ..नक्कीच तो घाबरेल ..वगैरे विचार केला आम्ही ..आमच्यातील दोन कार्यकर्ते राजू आणि नरेंद्र हे चांगले सहा फुटाच्या वर उंची असलेले ..तब्येतीने चांगले धडधाकट होते ..त्यांनी पोलीस बनून वरच्या मजल्यावर जायचे आणि आम्ही बाकीचे तीन जण त्याने पळून जायचा प्रयत्न केला तर त्याला पकडायला खाली थांबायचे असे ठरले ..आमच्या सगळ्यांचे केस नेहमी बारीक कापलेले असतात ..त्यामुळे नवीन माणसाला आम्ही पोलीस आहोत असे भासवणे सोपे होते ..अजून रुबाब यावा म्हणून आम्ही भावाच्या घरातून एक काठी मागून ती नरेंद्रच्या हाती दिली ..मग तय्यार झालो ..रेड मारण्यासाठी ..भावाच्या पत्नीने व्यसनीच्या घराचे गेट हळूच आवाज न करता उघडले ..आम्ही खाली उभे राहिलो ..नरेंद्र आणि राजू रुबाबात वर गेले ..सुमारे दहा मिनिटे झाली तरी काही आवाज नाही ..कसली हालचाल नाही ..वर काय चालले आहे हे कळत नव्हते ..आमच्या हृदयाची धडधड वाढलेली .
( बाकी पुढील भागात )